हिंदूंच्या हिताचे निर्णय घेणारे राज्यकर्ते हवेत ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे
चिपळूण, २३ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदूंना कायम गृहीत धरले जाते. बहुसंख्य हिंदूंचा हिंदूंच्याच देशात कायम अपमान केला गेला. त्याला आपले अज्ञान आणि शांतता कारणीभूत आहे. याने उद्याचा भारत कसा घडेल? आपल्या भूमीवर आणि राष्ट्रावर प्रेम करा. प्रत्येक सामान्य माणसाने राष्ट्रसेवा करायला हवी. देशहिताला प्राधान्य द्यायला हवे. आज हिंदू बहुसंख्य आहेत; म्हणून ते सुखाने जगत आहेत. उद्या ते (अन्य धर्मीय) बहुसंख्य होतील, तेव्हा धर्मनिरपेक्षता संपलेली असेल. देश टिकला, तरच आपण जगू शकतो. आपल्याला केवळ भारतातच मानाचे स्थान आहे, इतर देशात दुय्यमच वागणूक मिळते. आपल्याला दुसरा एकही देश किंवा भूमी नाही. त्यासाठी हिंदूंचे असे हे राष्ट्र टिकणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी हिंदूंच्या हिताचे निर्णय घेणारे राज्यकर्ते हवेत, असे परखड मत श्री. शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
चतुरंग प्रतिष्ठानने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली, या निमित्ताने प्रतिष्ठानकडून समाजातील मान्यवरांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सव पार्श्वभूमीवर ‘भारत काल, आज आणि उद्या’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शहरातील ब्राह्मण साहाय्यक संघ सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला चिपळूणवासियांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी व्याख्यानात श्री. पोंक्षे बोलत होते. याच दिवशीच्या सकाळी डी.बी.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीही श्री. पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
श्री. शरद पोंक्षे पुढे म्हणाले,
१. जपानचे देशप्रेम आपण शिकायला हवे. जेव्हा अमेरिकेतील व्यक्ती जपानमध्ये व्यवसाय करू लागली. तेव्हा त्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत तेथील नागरिकांनी त्यांच्याकडील साहित्य विकत घेण्याचे टाळत त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
२. इतिहास घडवण्यासाठी पूर्व इतिहासाचा अभ्यास हवा. हिंदू इथे जन्मले. आज पाश्चिमात्य देश ज्या योगाचे महत्त्व आता आपल्याला सांगत आहेत, तो ‘योग’ ते याच भूमीतून घेऊन गेले.
३. अमेरिका डॉलरमध्ये आकडा सांगतात; पण त्यासाठी आवश्यक शून्य हे भारताने जगाला दिले आहे. मूळ आपले; पण श्रेय मात्र ते घेतात. पंचमहाभूताची उपासना आपणच शिकवली. अन्य कुणी नाही.
४. सध्या भारताविषयी अभिमान वाटावा, असे शिक्षण दिले जात नाही, हे दुर्दैव आहे.
५. हुण, शक, ग्रीक, पाच पातशाह्या, ब्रिटीश, पोर्तुगीज, काँग्रेस या सर्वांकडून देशाची लुटमार झाली. तरीही संपत्ती संपलेली नाही. एवढा आपला देश वैभवशाली आहे. आपली अस्मिता जागी ठेवण्याचे प्रयत्न शिक्षण संस्थांनी करायला हवे होते. पण स्वातंत्र्यापासून ५-६ केंद्रीय शिक्षणमंत्री मुसलमान होते, मग ते कोणता इतिहास शिकवणार ? त्यामुळे हे असेच होणार.
६. शहराचे नामांतर करायला ७५ वर्षे लागली. एवढा कालावधी खरच अपेक्षित होता का ? आमदार, खासदार हे करतील, ही मानसिकता पालटायला हवी. सर्वसामान्य भारतियांची उदासीनता कारणीभूत आहे. देशाच्या हितासाठी प्रार्थना करण्यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण करायला हव्यात; पण त्याविषयीही आपण उदासीन आहोत.
श्री. शरद पोंक्षे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेटया वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना २८ ऑगस्ट या दिवशी चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे होणारे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरील मार्गदर्शनासंबंधी माहिती दिली. |