भारताची चंद्रझेप यशस्वी !

भारताने केला विश्‍वविक्रम !

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची महत्त्वपूर्ण योजना असणार्‍या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यामुळे केवळ भारताच नव्हे, तर जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर त्यांचे यान उतरवले असले, तरी ते दक्षिण ध्रुवावर यान उतरवू शकले नव्हते. नुकताच २० ऑगस्ट या दिवशी दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा प्रयत्न करतांना रशियाला अपयश आले होते. त्याचे ‘लुना-२५’ हे यान चंद्रावर कोसळले होते.

भारत, मी माझे ध्येय गाठले आणि तूही ! – चंद्रयान-३

‘चंद्रयान-३’ चंद्रभूमीवर यशस्वीरित्या उतरल्यावर ‘इस्रो’ने ट्वीट करत लिहिले, ‘‘भारत, मी माझे ध्येय गाठले आणि तूही !’, असे चंद्रयान-३ म्हणत आहे. चंद्रयान-३ ने यशस्वीरित्या चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिग’ केले. भारताचे अभिनंदन !’’

‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले !
Former Isro scientist Nambi Narayanan on Chandrayaan-3’s success and more

धूळ खाली बसल्यावर बाहेर पडणार ‘प्रज्ञान रोव्हर’ !

अ. १४ जुलै या दिवशी चंद्रयान-३ ने चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपण केले होते. काही दिवस पृथ्वीच्या भोवती फेर्‍या मारल्यानंतर १ ऑगस्ट या दिवशी हे यान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले होते.

आ. चंद्राच्या कक्षेत पोचल्यानंतर २३ ऑगस्टच्या सायंकाळी ५.४४ वाजेपर्यंत ते चंद्राला फेर्‍या मारत होते.

इ. काही दिवसांपूर्वी ‘चंद्रयान-३’च्या मुख्य भागातून ‘विक्रम लँडर’ स्वतंत्र झाले होते आणि ते चंद्राच्या भोवती फेर्‍या मारू लागले होते. या काळात २ वेळा ‘विक्रम लँडर’ने त्याची गती न्यून (डिबुस्टिंग) केली होती.

इ. चंद्रावर उतरण्यापूर्वी ‘विक्रम लँडर’ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरून चंद्राला फेर्‍या मारत होते. या काळात त्याने चंद्राची अनेक छायाचित्रे ‘इस्रो’ला पाठवली होती.

उ. २३ ऑगस्टला ‘विक्रम लँडर’ने पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे इस्रोच्या वैज्ञानिकांनी ‘विक्रम लँडर’ने कुठे उतरायचे ती जागा निवडली.

ऊ. सायंकाळी ५.४४ नंतर हळूहळू चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया चालू केली आणि सायंकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. ही सर्व प्रक्रिया ‘विक्रम लँडर’मधील संगणकीय सूचनांप्रमाणे म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (‘ए.आय.’द्वारे) करण्यात आली. यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. या काळात विक्रम लँडरने त्याची गती न्यून करत आणली होती.

ए. चंद्रावर ‘विक्रम लँडर’ उतरल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात धूळ उडू लागली. ही धूळ शांत झाल्यानंतर ‘विक्रम लँडर’मधील ‘रोव्हर प्रज्ञान’ला बाहेर पडण्याचा आदेश देण्यात येणार आहे. यासाठी २ ते ८ घंटे इतका कालावधी द्यावा लागू शकतो.

पुढील १४ दिवस करणार सर्वेक्षण

‘विक्रम लँडर’मधून रोव्हर प्रज्ञान बाहेर पडल्यानंतर पुढील १४ दिवस म्हणजे दक्षिण ध्रुवावर सूर्याचा उदय असेपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांच्याकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. येथील माती, दगड आदींची माहिती गोळा करण्यात येणार आहे. याद्वारे ‘चंद्रावर पाणी अस्तित्वात आहे का ?’, ‘तेथे कोणती खनिजे आहेत?’, हेही अभ्यासले जाणार आहे. १४ दिवसानंतर चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे कार्य बंद पडणार आहे. सौर ऊर्जेद्वारे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ कार्यरत रहाणार आहेत. सूर्यास्त झाल्यावर तेथे अंधार होऊन तापमान नीचांकी (उणे २३० डिग्री सेल्सिअस) होत असल्याने या काळात ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे कार्य पूर्णपणे ठप्प होईल आणि त्यानंतर ते कोणतेही काम करू शकणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाईन उपस्थित !

भारतावर अमृतवर्षाव ! – पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

आपले जीवन धन्य झाले. राष्ट्रीय चेतनेने भारित हा क्षण चिरंजीव होईल. ‘चंद्रयान-३’चे यश म्हणजे विकसित भारताचा शंखनाद आहे. ‘चंद्रयान-३’च्या यशामागे १४० कोटी भारतियांच्या मनांचे सामर्थ्य आहे. अमृत काळाच्या आरंभी आपल्यावर झालेली ही अमृतवर्षा आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्गहून (दक्षिण आफ्रिका) ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांना संबोधित करतांना काढले.

‘ग्लोबल साऊथ’चे देशही अशा प्रकारचे यश संपादन करू शकतात !

या वेळी जागतिक मानवसमुहाला उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, भारताची यशस्वी मोहीम हे केवळ भारताचे यश नसून संपूर्ण जगाचे यश आहे. ‘जी-२०’ परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारताचा ‘एक पृथ्वी एक कुटुंब एक दृष्टी’ या उद्देशाला अनुसरून ही मोहीम यशस्वी झाली. आमची ‘चंद्रयान-३’ मोहीम याच मानवकेंद्रित दृष्टीकोनातून करण्यात आली. हे संपूर्ण मानवतेचे यश आहे. तसेच या माध्यमातून ‘ग्लोबल साऊथ’मधील देशही अशा प्रकारचे यश संपादन करू शकतात, हे सिद्ध झाले आहे.

इस्रोच्या बेंगळुरू येथील नियंत्रण कक्षात इस्रोचे प्रमुख सोमनाथ, माजी प्रमुख सिवान आदी शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स देशांच्या परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथून ऑनलाईन इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी जोडले होते.

इस्रोच्या नियंत्रण कक्षात ‘वन्दे मातरम्‌’च्या घोषणा !

लँडर विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर इस्रोच्या नियंत्रण कक्षात मोठ्या संख्येत उपस्थित शास्त्रज्ञांनी उत्स्फूर्तपणे ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा दिल्या.

आपण चंद्रावर पोचलो ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्‌. सोमनाथ

‘चंद्रयान-३’चा विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यावर ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ यांनी म्हटले, ‘आपण चंद्रावर आहोत !’ त्यांच्या या वक्तव्याने इस्रोच्या नियंत्रण कक्षात टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त करण्यात आला.

मी अतिशय आनंदी आहे ! – के. सिवन, माजी प्रमुख, इस्रो

इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, आम्ही बर्‍याच काळापासून या क्षणाची वाट पहात होतो. मी अतिशय आनंदी आहे.

काँग्रेसकडून देशवासियांना शुभेच्छा !

काँग्रेसने ट्वीट करून म्हटले की, चंद्रयान-३ यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याने सर्व देशवासियांना शुभेच्छा !

पंडित नेहरू यांनी इस्रोची स्थापना केली होती. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे की, आज भारत जगात संशोधनाच्या क्षेत्रात कीर्तीमान स्थापन करत आहे.

आम आदमी पक्षाकडूनही शुभेच्छा !

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही ट्वीट केले. ते म्हणाले की, हे यश इस्रोच्या इच्छाशक्तीचे प्रमाण आहे. त्याची कटीबद्धता आणि कठोर श्रम यांमुळे भारतियांचे हृदय अभिमानाने फुलले आहे.


हे ही वाचा –

भारताचा चंद्र‘विक्रम’ ! – संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/713825.html