छत्रपती संभाजीनगर येथे लाभार्थी नसतांना ४० सहस्र घरांची निविदा !

दिशा समिती’च्‍या बैठकीत वाद !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – देशात ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत लाभार्थींना घरे देण्‍यात आली; परंतु छत्रपती संभाजीनगर येथे अजूनही निविदा प्रक्रियाच चालू आहे. यावर २१ ऑगस्‍टला महापालिकेच्‍या स्‍मार्ट सिटी सभागृहात झालेल्‍या ‘दिशा समिती’च्‍या बैठकीत मंत्री, नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्‍यात जोरदार वाद झाला आहे. लाभार्थी नसतांना ४० सहस्र घरांची निविदा का काढण्‍यात आली ? असा जाब लोकप्रतिनिधींनी संंबंधित अधिकार्‍यांना विचारला.

घरकुल योजनेच्‍या नियोजित १२६ हेक्‍टरपैकी ९० हेक्‍टर जागा वापरण्‍यायोग्‍य नाही. उर्वरित ३६ हेक्‍टरवर अतिक्रमण आणि आरक्षण असल्‍याने केवळ २४ हेक्‍टरच जागा वापरता येऊ शकते. त्‍यामुळे लोकप्रतिनिधींनी अधिकार्‍यांना धारेवर धरत ४० सहस्र घरांची निविदा कशाच्‍या आधारावर काढली ? ७ वर्षांत एकही घर का बांधले गेले नाही ? अशा प्रश्‍नांचा भडिमार केला.

३ मंत्री, विरोधी पक्षनेते आणि खासदार यांच्‍या उपस्‍थितीत दीड घंटा चर्चा होऊनही घरकुल योजनेवर ठोस निर्णय झाला नाही. त्‍यामुळे आता १ सप्‍टेंबर या दिवशी पुन्‍हा बैठक घेण्‍यात येणार आहे.

या वेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, अल्‍पसंख्‍यांकमंत्री अब्‍दुल सत्तार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्‍तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय शिरसाट यांच्‍यासह जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पांडेय, महापालिकेचे आयुक्‍त जी. श्रीकांत, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्‍थित होते.

महापालिकेच्‍या अधिकार्‍यांमध्‍ये प्रचंड अनास्‍था !

खासदार इम्‍तियाज म्‍हणाले की, पंतप्रधानांच्‍या नावाने योजना चालू असूनही महापालिका अधिकार्‍यांमध्‍ये प्रचंड अनास्‍था आहे. ऑक्‍टोबरनंतर १० मासांनी दिशा समितीची बैठक झाली. ती ३ मासांत होणे अपेक्षित होते. (अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक) यावर अधिकारी निरुत्तर झाले. मंत्री रावसाहेब दानवे म्‍हणाले की, आम्‍ही योजनेचा आढावा घेतला आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात अडचणी आल्‍या. त्‍यानुसार अधिकार्‍यांना सूचना दिल्‍या आहेत. ही योजना पूर्ण केली जाईल.