श्री गुरूंप्रती अपार भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांच्‍या बळावर वय अन् शारीरिक त्रास यांच्‍या मर्यादा ओलांडून झोकून देऊन गुरुसेवा करणार्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता शास्‍त्री (वय ७१ वर्षे) !

वर्ष २००१ मध्‍ये नागपूर येथे सनातनचा सत्‍संग चालू झाला. तेव्‍हापासून सौ. नम्रता शास्‍त्री सत्‍संगाला येऊ लागल्‍या. त्‍यांनी लगेचच सत्‍सेवा करण्‍यास आरंभ केला. त्‍या मोठ्या पदावर नोकरीला होत्‍या. सांसारिक दायित्‍व पार पाडत त्‍यांनी साधना करून साधनेतही प्रगती केली. शारीरिक मर्यादा असतांनाही त्‍यांनी झोकून देऊन गुरुसेवा कशी केली ? ते पाहूया.

‘झोकून देऊन आणि तळमळीने गुरुसेवा केली की, भगवंत शारीरिक त्रासांवर मात करण्‍याचे बळ देतो अन मोठ्या प्रमाणात समष्‍टी कार्य करून घेतो’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या सौ. नम्रता शास्‍त्री !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘अनेक साधकांना वयोमान, शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रास, यांमुळे सेवा अन् साधना करायला मर्यादा आहेत’, असे वाटते; मात्र ‘श्री गुरूंप्रती भाव आणि गुरुसेवेची तळमळ असेल, तर वय अन् शारीरिक त्रास यांच्‍या मर्यादा ओलांडूनही सेवा करता येते’, हे सौ. शास्‍त्री यांनी दाखवून दिले आहे. ‘सौ. शास्‍त्री यांच्‍या उदाहरणातून शिकून झोकून देऊन आणि तळमळीने गुरुसेवा केली की, भगवंत शारीरिक त्रासांवर मात करण्‍याचे बळ देतो अन् आपल्‍याकडून मोठ्या प्रमाणात समष्‍टी कार्य करून घेतो,’ याची अनुभूती साधकांना घेता येईल.’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सौ. नम्रता विनय शास्‍त्री

१. मुलांवर साधनेचे संस्‍कार करणे

‘काकूंनी त्‍यांच्‍या दोन्‍ही मुलांवर साधनेचे संस्‍कार केले. त्‍यांनी मुलांकडूनही साधना करून घेतली. त्‍यांच्‍या मोठ्या मुलाला (श्री. चैतन्‍य यांना) तीव्र आध्‍यात्मिक त्रास आहे. काकूंनी चैतन्‍यदादांना पुष्‍कळ आधार दिला. काकूंचा लहान मुलगा (श्री. आदित्‍य) काही कालावधीसाठी नोकरीनिमित्त अमेरिका येथे होते. ते साधनेत टिकून रहाण्‍यासाठी काकूंनी प्रयत्न केले. काकूंनी काही कालावधीनंतर त्‍यांना भारतात बोलावून पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. काकूंनी त्‍यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍यास पाठवले. काकूंच्‍या प्रोत्‍साहनामुळे आणि तळमळीमुळे श्री. आदित्‍य आता कोल्‍हापूर येथे प्रचारसेवा करत आहेत.

२. गुरुसेवेची तीव्र तळमळ

२ अ. अल्‍प साधकसंख्‍या असूनही विविध सेवा करणे : नागपूर येथे साधकसंख्‍या अल्‍प आहे, तसेच तेथील साधक वयस्‍कर आहेत. असे असूनही काकू साधकांना सेवांचे उत्तम प्रकारे नियोजन करून देऊन त्‍यांच्‍याकडून सेवा करून घेतात. एखाद्या दायित्‍व असणार्‍या साधकाने आपल्‍या अंतर्गत असणार्‍या साधकांकडून सेवा करून घेणे, ही त्‍याच्‍यासाठी एक परीक्षाच असते. सौ. शास्‍त्रीकाकूंसाठी ही मोठी परीक्षाच आहे; कारण त्‍यांच्‍याकडे मुळातच साधकसंख्‍या अल्‍प आणि वयस्‍कर साधकच अधिक आहेत. काकूंकडे प्रतिकूल परिस्‍थितीकडेही संधी म्‍हणून पहाण्‍याचे कौशल्‍य आहे. साधकत्‍व असल्‍यास कोणत्‍याही परिस्‍थितीत तळमळीने सेवा करता येते, हे काकूंच्‍या उदाहरणातून शिकता येते.

साधकसंख्‍या अल्‍प असली, तर दायित्‍व असणार्‍या साधकांना वाटते की, आपल्‍याकडे साधक नसल्‍याने एखादी सेवा पूर्ण होणार नाही. त्‍यामुळे साधक सेवेसाठी माघार घेतात. अशा साधकांनी शास्‍त्रीकाकूंकडून शिकायला हवे.

२ आ. धर्मरथावर सेवेला असणार्‍या साधकांचे उत्तम प्रकारे नियोजन करणे : विविध सेवांसाठी धर्मरथ अनेक ठिकाणी जात असे. काकूंनी नागपूर येथे धर्मरथावर सेवेला असणार्‍या साधकांचे उत्तम प्रकारे नियोजन केले. महाराष्‍ट्र आणि कर्नाटक या राज्‍यांमध्‍ये धर्मरथावर सेवेला असणार्‍या साधकांचे सर्वांत उत्तम नियोजन नागपूर येथे केले जात असे.

२ इ. सेवेचा आढावा देणे आणि अडचणी कळवणे : काकू त्‍यांच्‍याकडे असणार्‍या सेवांचा आढावा वेळोवेळी उत्तरदायी साधकांना देतात. एखादी सेवा वेळेत न होण्‍यामागे काही अडचण असल्‍यास तसेही त्‍या कळवतात आणि पुढील समयमर्यादेत ती सेवा पूर्ण करतात.

२ ई. घरी एकटीने राहून निरपेक्षभावाने सेवा करणे : काकूंचे यजमान (श्री. विनय शास्‍त्री) बांधकामाच्‍या सेवेसाठी गोवा येथे जाण्‍याच्‍या वेळी काकूंची शारीरिक स्‍थिती बरी नव्‍हती. त्‍या वयोमानामुळे थकल्‍या होत्‍या, तरीही काकूंनी त्‍यांना गोव्‍याला जातांना सहकार्य केले. काकू ५ – ६ वर्षे एकट्याच घरी राहिल्‍या. ‘गुरूंच्‍या कृपेमुळेच मला दायित्‍वाच्‍या सेवा मिळाल्‍या आहेत’, या भावाने त्‍यांनी घरी राहून सेवा केली. त्‍या वेळी काकूंनी ‘घरी एकटीने न रहाता मुलांच्‍या समवेत राहूया’, असा आग्रह केला नाही. त्‍यांना ‘गुरुसेवा महत्त्वाची आहे’, असेच नेहमी वाटत असल्‍यामुळे त्‍यांनी निरपेक्षभावाने सेवा केली.

३. साधकांच्‍या अडचणी सोडवून त्‍यांना आधार देणे

नागपूर शहर आकारमानाने मोठे आहे. काकू साधकांना भेटण्‍यासाठी आणि साधकांच्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी प्रवास करायच्‍या. काकूंचा स्‍वभाव प्रेमळ आणि मनमोकळा असल्‍यामुळे साधकांना त्‍यांचा आधार वाटतो. ते काकूंना अडचणी सांगू शकतात. त्‍या साधकांच्‍या ‘आध्‍यात्मिक हेल्‍पलाईन’ आहेत.

४. पायाचा अस्‍थिभंग झाल्‍याने शारीरिक मर्यादा येऊनही दायित्‍व घेऊन तळमळीने सेवा करणे

मे २०२२ मध्‍ये पायाचा अस्‍थिभंग झाल्‍यानेे काकू (गोवा) येथील स्‍वतःच्‍या निवासस्‍थानी रहात आहेत. आधुनिक वैद्यांनी त्‍यांना काही मास विश्रांती (बेडरेस्‍ट) घ्‍यायला सांगितली होती. तेव्‍हा त्‍यांनी अशा स्‍थितीतही आपल्‍या सेवेत खंड पडू दिला नाही. त्‍यांनी भ्रमणभाषच्‍या माध्‍यमातून दायित्‍व घेऊन सेवा चालूच ठेवली. ‘जून २०२२ मधील अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन आणि शिबिर’ यांमध्‍येही त्‍या ‘ऑनलाईन’ सहभागी झाल्‍या होत्‍या. त्‍या गोवा येथे राहून नागपूर येथील अध्‍यात्‍मप्रसार (‘ऑनलाईन’) करणे, साधकांच्‍या सेवांचे नियोजन करणे, आढावे आणि सत्‍संग घेणे, अशा सेवा तळमळीने करतात.

५. नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍या’च्‍या संबंधित सेवांचे नियोजन घरी राहून बारकाईने करणे

२१.१२.२०२२ या दिवशी नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍या’च्‍या संबंधित सेवांचे नियोजन त्‍यांनी घरी राहून केले. त्‍यांनी या सेवेतील प्रत्‍येक लहान-सहान पैलू विचारात घेऊन बारकाव्‍यांनिशी नियोजन करून साधकांकडून सेवा करून घेतली. काकू गोवा येथे रहात असूनही नागपूर येथील साधकांना त्‍यांचा आधार वाटला.

६. देहाने गोवा येथे असूनही मनाने नागपूर येथील सेवा आणि साधक यांच्‍याशी एकरूप झालेल्‍या अन् कर्तेपणा त्‍यागणार्‍या सौ. नम्रता शास्‍त्री !

काकू देहाने गोवा येथे आहेत; पण मनाने नागपूर येथील त्‍यांच्‍या सेवा आणि साधक यांच्‍याशी एकरूप झाल्‍या आहेत. त्‍यामुळे नागपूर येथील गुरुपौर्णिमा, तसेच मोर्चा यांच्‍यासारखे लहान-मोठे उपक्रम यशस्‍वी होत आहेत. याचे श्रेय काकू स्‍वतःकडे कधीच घेत नाहीत. त्‍यांचा ‘ही केवळ प.पू. डॉक्‍टरांची कृपा आहे,’ असाच भाव असतो.

७. काकूंना पुष्‍कळ शारीरिक त्रास होत असले, तरीही काकूंचा चेहरा सतत आनंदी असतो. त्‍या अखंडपणे तीव्र तळमळीने करत असलेल्‍या सेवा आणि साधना यांमुळे त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील तेज वाढत चालले आहे.

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२२.४.२०२३)