‘कोरोना’ विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी गुरुदेवांनी सांगितलेला ‘दुर्गा-दत्त-शीव’ यांचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती
‘२८.६.२०२१ या दिवशी सायंकाळी मी नेहमीप्रमाणे कोरोना महामारीच्या कालावधीत रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी सांगितलेला ‘दुर्गा-दत्त-शीव’ यांचा नामजप करत होतो. मी प्रार्थना केली. त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विराट रूप डोळ्यांसमोर आणूया’, असा विचार माझ्या मनामध्ये आला. त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृष्य दिसले.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विराट रूपातील हातांच्या ओंजळीत सनातन संस्थेत असलेले सर्व साधक बसलेले दिसणे : जप चालू केल्यानंतर ‘परात्पर गुरुदेवांनी मला त्यांच्या ओंजळीत घेतले असून तिच्यात बसून मी नामजप करत आहे’, असे मला जाणवले. त्यांची ओंजळ इतकी मोठी होती की, तिच्यात मला सनातन संस्थेत असलेले सर्व साधक बसलेले दिसत होते. गुरुदेवांचे हात पुष्कळ मोठे असून त्यांचे विराट रूप कल्पनेपेक्षाही मोठे दिसत होते.
२. ‘परात्पर गुरुदेवांनी पृथ्वीला घट्ट धरून ठेवल्यामुळे तिचा विनाश टळला आहे’, असा विचार मनात येणे : ‘परात्पर गुरुदेवांनी संपूर्ण पृथ्वीला घट्ट धरले आहे’, असे मला दिसले. ‘सध्याचा आपत्काळ इतका घनघोर आहे की, संपूर्ण पृथ्वीच त्यामध्ये नष्ट होईल’, असे वाटते. ‘केवळ गुरुदेवांनी आतापर्यंत पृथ्वीला धरून ठेवले आहे; म्हणूनच तिचा विनाश टळला आहे’, असा विचार माझ्या मनात आला आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. परात्पर गुरुदेवांच्या भव्य चरणांवर स्वतः आणि सर्व साधक बसलेले असून घनघोर आपत्काळात गुरुदेवांनी सर्वांना त्यांच्या चरणांशी ठेवले असल्याचे दिसणे : त्यानंतर मला गुरुदेवांचे दोन मोठे चरण दिसले. ते चरण इतके मोठे होते की, मी त्यापुढे धुळीच्या कणाप्रमाणे दिसत होतो. ‘मी सर्व साधकांसमवेत त्यांच्या चरणांवर बसलो होतो. साहजिकच गुरुदेव जेथे जात होते, तेथे त्यांच्या समवेत आम्हाला जायला मिळत होते. सर्व साधक आनंदी होते. ‘या घनघोर आपत्काळात गुरुदेवांनी सर्व साधकांना त्यांच्या चरणांशी ठेवले आहे’, या विचाराने सर्वजण कृतज्ञता व्यक्त करत होते.
४. परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपाच्या सावलीखाली साधक असून परात्पर गुरुदेव आपत्काळात साधकांचे रक्षण करणार असल्याचा विचार मनात येणे : नंतर मला सर्वत्र गुरुदेवांची सावली दिसत होती. ‘त्या विराट सावलीत सनातन संस्थेचे सर्व साधक सामावलेले आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘जी व्यक्ती या सावलीखाली येईल, तिचे संपूर्ण दायित्व गुरुदेव घेणार आहेत आणि तिला आपत्काळापासून वाचवणारच आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोकुळवासी त्या पर्वताखाली आश्रयाला आले. त्याप्रमाणे ‘आम्हा सर्व साधकांवर परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपाची सावली आहेे. ‘सनातन संस्था’ म्हणजे गुरुदेवांची सावली असून गुरुदेव आमची सर्वार्थाने काळजी घेणारच आहेत’, या विचाराने मी निश्चिंंत झालो.
५. ‘भाववृद्धी सत्संगा’तील भावप्रयोगात कधीही परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपाचे दर्शन न होणे; मात्र या अनुभूतीतून ते अनुभवता येणे : ऑनलाईन ‘भाववृद्धी सत्संगा’त बर्याच वेळेला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रार्थना किंवा भावप्रयोग करतांना ‘आता आपण परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपाचे स्मरण करूया’, असे सांगतात. आतापर्यंत मला गुरुदेवांचे विराट रूप स्पष्टपणे कधीच दिसले नव्हते. केवळ त्यांचे स्मरण व्हायचे. या अनुभूतीतून मला गुरुदेवांचे विराट रूप अनुभवायला मिळाले आणि ‘विविध भावप्रयत्न कसे करायचे ?’, हेसुद्धा शिकायला मिळाले. याबद्दल परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अपूर्व प्र. ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |