श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍टच्‍या वतीने ‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाच्‍या अंतर्गत १ लाखांहून अधिक राख्‍या सीमेवर पाठवण्‍याचा संकल्‍प ! – किशोर घाटगे

‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाची माहिती देतांना श्री. किशोर घाटगे (डावीकडून तिसरे), तसेच अन्‍य मान्‍यवर

कोल्‍हापूर, २२ ऑगस्‍ट (वार्ता.) – ‘श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या वतीने कारगील युद्धापासून गेली २४ वर्षे ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍टच्‍या वतीने ‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाच्‍या अंतर्गत १ लाखांहून अधिक राख्‍या सीमेवर पाठवण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला आहे. हा उपक्रम २८ ऑगस्‍टला सकाळी ११ वाजता महादेव मंदिर, मराठा बटालियन या ठिकाणी होणार आहे. तरी इच्‍छुकांनी विविध संकलन केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत राख्‍या पाठवाव्‍यात, असे आवाहन ‘श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’चे श्री. किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी सर्वश्री राजा मकोटे, महेश कामत, अशोक लोहार, कमलाकर किलकिले, डॉ. सायली कचरे, सौ. सीमा मकोटे, माधुरी नकाते यांसह उपस्‍थित होते.

श्री. किशोर घाटगे पुढे म्‍हणाले, ‘‘देशरक्षकांचे नैतिक बळ वाढवण्‍यासाठी विविध शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, व्‍यक्‍ती, संस्‍था यांच्‍याकडून या राख्‍या गोळ्‍या करून थेट सीमेवर पाठवण्‍यात येत आहेत. शहरातील विविध ठिकाणी या राख्‍या संकलित करण्‍यात येणार आहेत.’’