मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !
मुंबई – नियमित मासे खाल्ल्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे डोळे सुंदर झाले आहेत. त्याप्रमाणे मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असे वादग्रस्त विधान राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी २ दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात केले. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवण्यात आली असून ३ दिवसांत याविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
या वेळी विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले होते. याविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रूपाली चाकणकर म्हणाल्या की, गावित यांनी केलेला उल्लेख महिलांचा अपमान करणारा आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विजयकुमार गावित यांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये विधानभवनातही होऊ नयेत, यासाठी आयोगाकडून विधानसभा अध्यक्षांशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व संबंधित पक्षाच्या प्रमुखांनी नेतेमंडळी किंवा मंत्री यांना अशा प्रकारणी वक्तव्ये न करण्याची ताकीद द्यावी; म्हणजे स्त्रियांचा सन्मान राखला जाईल.