जपान फुकुशिमा अणूऊर्जा प्रकल्पातील पाणी समुद्रात सोडणार : चीन-दक्षिण कोरियाचा विरोध

फुकुशिमा अणूऊर्जा

टोकियो – जपान त्याच्या निकामी झालेल्या फुकुशिमा अणूऊर्जा प्रकल्पातील १३३ कोटी लिटर पाणी २४ ऑगस्टपासून प्रशांत महासागरात सोडणार आहे. जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी २२ ऑगस्ट या दिवशी मंत्र्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिन यांनी हा विश्‍वासभंग असल्याचे म्हटले आहे. समुद्रात पाणी सोडणे, हा उपाय नाही. त्याचा प्रभाव नंतर पालटता येत नाही, असे वेनबिन यांनी सांगितले. जपानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ दक्षिण आफ्रिकेतही मोर्चा काढण्यात आला होता.

जपानच्या मत्स्य उद्योगाच्या नेत्यांना भीती वाटते की, एकदा अणूप्रकल्पातून पाणी सोडणे चालू केले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहक त्यांचे मासे स्वीकारण्यास नकार देतील. जपान सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पामधील सर्व पाणी सोडण्यासाठी अनुमाने ३० वर्षे लागतील. या प्रकल्पामध्ये सध्या १३३ कोटी लिटर पाणी अनुमाने १ सहस्र निळ्या टँकरमध्ये साठवले गेले आहे.