गोवा : अब्दुल करोल आणि सहकारी यांच्या शुक्रवारी होणार्या धार्मिक कार्यक्रमावर बंदी घाला !
वेर्ला-काणका ग्रामसभेत नागरिकांची मागणी
म्हापसा, २१ ऑगस्ट (वार्ता.) – डिमेलोवाडा, काणका येथे प्रभाग क्रमांक २ मध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनधिकृत प्रकार चालू आहेत. या ठिकाणी गोव्याबाहेरील शेकडो लोक जमा होत असतात. अब्दुल खालीद करोल आणि त्याचे सहकारी या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी आणि इतर दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे सहकार्यांना संबोधित करतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत चालू असतो. यामुळे गावातील शांतता भंग होत आहे. या प्रकारावर कायदेशीर कारवाई करून तो बंद करावा, अशी मागणी वेर्ला, काणका गावातील नागरिकांनी पंचायतीच्या ग्रामसभेत केली. सरपंच आरती च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.
डिमेलोवाडा, काणका येथील नागरिकांनी सर्वांच्या सह्यांनिशी एक निवेदन सरपंचांना सुपुर्द केले आहे. ग्रामसभेत ग्रामस्थ लवू कोनाडकर म्हणाले, ‘‘संबंधित ठिकाणी काय चालले आहे ? हे कुणालाही ठाऊक नाही. पंचायतीच्या अनुमतीविना नियमितपणे मोठ्या प्रमाणात लोक कसे जमा होत असतात ? या प्रकारामुळे पुढे गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.’’ ग्रामस्थ प्रशांत रेडकर, ग्रामस्थ तथा गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनीही संबंधित प्रकाराला आक्षेप घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थ सुदेश किनेळकर म्हणाले, ‘‘संबंधित लोक दुपारी आणि रात्री उशिरा जमा होतात. नियमबाह्यरित्या दुचाकीवर तिघे जण बसतात आणि अशी वाहने जोराने हाकली जातात. त्यांच्याकडे ओळखपत्र आणि वाहन परवाना नसतो. त्यांना खडसावल्यास उडावाउडवीची उत्तरे दिली जातात.’’ पंचसदस्य वासुदेव कोरगावकर म्हणाले, ‘‘काणका गावात रहाणारे भाडेकरू आणि दुकान व्यावसायिक यांचा तपशील पंचायतीकडे नाही. संबंधितांना एका मासाच्या आत पंचायतीकडे नोंदणी करण्यासाठी नोटीस पाठवणार आहे.’’