गोवा : वर्ष १९७० मध्येच ‘वास्को’ शहराचे नामांतर ‘संभाजी’ झाले होते !

२० नोव्हेंबर १९७० या दिवशी काढलेल्या राजपत्रात आहे नोंद !

पणजी – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कारकीर्दीतच गोव्याच्या सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या शहराचे पोर्तुगिजांनी ठेवलेले कलंकित समुद्री चाचा ‘वास्को द गामा’ हे नाव राष्ट्रीय दृष्टीकोनातून पालटून ‘संभाजी’ असे ठेवण्यात आले होते. याचा पुरावा म्हणजे तत्कालीन महसूल विभागाचे सचिव डॉ. जे.सी. आल्मेदा यांची स्वाक्षरी असलेले २० नोव्हेंबर १९७० या दिवशी काढलेले आदेशपत्र होय. हिंदू महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ही वस्तूस्थिती उघड केली आहे.

प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, मधल्या काळात कुणीतरी लोकभावनेशी धोकेबाजी करून योजनाबद्धपणे हा आदेश अव्हेरण्याचे कारस्थान केलेले आहे. हिंदू रक्षा महाआघाडीची सध्याच्या भाजप सरकारकडे अशी मागणी आहे की, त्यांनी या जुन्या आदेशाची तात्काळ कार्यवाही करण्यासाठीचे प्रशासकीय सोपस्कार युद्धपातळीवर पूर्ण करावेत आणि मुक्त गोव्याची ‘वास्को द गामा’ या दरोडेखोराच्या नावामुळे लागलेल्या कलंकातून मुक्तता करावी.

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करून त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षात त्यांना अनुरूप श्रद्धांजली द्यावी, अशी समस्त गोमंतकियांची अपेक्षा भाजप सरकारने पूर्ण करावी.