गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा !
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे आवाहन
पुणे – गणेशोत्सव, दहीहंडी, तसेच अन्य आगामी सण- उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत, त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा अन् मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगामी काळात साजरे करण्यात येणारे गणेशोत्सव, दहीहंडी यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सिद्ध करण्यात येणार्या नियमावलींविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
श्रीमती गोर्हे पुढे म्हणाल्या की, गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने वर्ष २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी अनुमती घेतलेली नाही, अशांनी नव्याने अर्ज करावेत. नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे मनपा आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. प्राप्त सूचनांवर प्रशासनाच्या वतीने सकारात्मक नोंद घेऊन त्याचे निराकरण करण्यात येईल. दहीहंडी या सणाला ‘साहसी खेळ’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सुरक्षितेतच्या दृष्टीने मंडळाला मार्गदर्शनपर जनजागृतीपर प्रात्यक्षिके घेण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत. (दहीहंडी फोडण्याची परंपरा कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानेच आहे. तो साहसी खेळ कसा असेल ? या साहसात प्रत्येक वर्षी युवकांचे मृत्यू होतात किंवा त्यांचे हात-पाय मोडतात, त्याचे काय ? – संपादक)
वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करा !
सणांच्या काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहील, या दृष्टीने पोलीस अन् जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. शहरातील वाहतूक कोंडी अल्प करण्यासाठी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करावे, त्यादृष्टीने वाहतूक कोंडीच्या जागेची पहाणी करावी. वाहतुकीतील पालटाविषयी नागरिकांना अवगत करावे. भाविकांना गणेशोत्सव आणि दहीहंडी बघता यावे, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू खुल्या ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. |