श्रावण मास आणि आगामी काळात येणारे सण, व्रते अन् उत्सव !
श्रावणमास म्हणजे सण, व्रते आणि पर्वणीचा काळ आहे. खरेतर व्रते ही देवतांसाठी करायची नसून आपल्यावर चांगले संस्कार होण्यासाठी करतात. त्या अनुषंगानेच आगामी काळात येणारे सण, व्रते आणि उत्सव यांची माहिती येथे देत आहोत.
१. मंगळागौरी पूजन
विवाहानंतर श्रावण मासात प्रत्येक मंगळवारी अन्नपूर्णामातेचे पूजन नवविवाहित मुली करतात. हे व्रत विवाहानंतर सलग ५ वर्षे करण्याची पूर्वापार प्रथा आहे. या पूजेसाठी नवीन विवाह झालेल्या मुलींना बोलावण्यात येते. रात्रभर वेगवेगळे खेळ (उदा. झिम्मा, फुगडी इत्यादी) खेळून सर्वजण देवीचा जागर करतात. आधुनिक पिढीसह हिंदु धर्माची परंपरा जपणे, हा या व्रतामागील उद्देश असतो.
२. जिवती पूजन
प्रत्येक श्रावण शुक्रवारी जिवतीपूजन (जिवंतिकादेवीचे पूजन) करतात. त्या दिवशी सवाष्णीला जेवायला सांगून पुरणपोळीचा नैवेद्य करतात. जिवतीचे चित्र भिंतीवर लावतात. त्याला आघाडा आणि फुले यांची माळ वाहतात. स्त्रीमधील मातृत्वाच्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी आई आपल्या मुलांना कुंकू लावून ओवाळते.
३. श्रावण शनिवार
हे हनुमानाचे व्रत आहे. त्याच्याकडून प्रचंड शक्ती, सेवागुण, बुद्धीमत्ता, उपासना हे गुण स्वतःसाठी मागायचे असतात.
४. रक्षाबंधन
बहीण-भावाचे प्रेम. भावाने बहिणीचे रक्षण करणे, हा या सणाचा उद्देश असतो. कोणत्याही परिस्थितीत बहिणीच्या सुरक्षिततेसाठी प्रतीक म्हणून रेशमी धागा बहीण भावाच्या हाताला बांधते.
५. श्रीकृष्ण जन्माष्टमी
श्रीकृष्ण म्हणजे आनंद, उत्तम मित्र, उत्तम कलाकार, उत्तम राजा होय. श्रीमंत-गरीब हा भेद कधी श्रीकृष्णाने मानला नाही.
६. बैलपोळा
या दिवशी ६४ योगिनी आणि बैल यांची पूजा केली जाते. योगिनींची पूजा ही ज्ञानाची, तर बैलांची पूजा ही कष्टाची पूजा आहे. या दिवशी बैलांना पुरणपोळी खाण्यास देतात. बैलांच्या पायावर दूध आणि पाणी घालून बैलाला कुंकू लावतात. त्याच्या गळ्यांत फुलांची माळ घालून त्याला रंग लावून सजवतात.
७. गणेशचतुर्थी
कोणत्याही कार्यारंभी मंगलमूर्ती गणपतीचे पूजन केले जाते. गणपतीला रिद्धि-सिद्धि आणि समृद्धी यांचा दाता मानतात.
८. गौरीपूजन
भाद्रपद मासात तळ्याच्या काठी जाऊन दोन खडे आणावेत. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. ते खडे ऊन (कोमट गरम) पाण्याने धुवावेत. त्यांची पूजा करावी. तांदुळाचे घावन करावे. खीर पुरीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्ण जेवायला सांगून तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदी-कुंकू करावे, म्हणजे अक्षय सुख मिळते. कुणाकुणाकडे उभ्या गौरी असतात. गौरीचे सिद्ध साचे असतात. त्या साच्यावर गौरीचा मुखवटा ठेवतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना जरीची साडी नेसवतात. नाकात नथ, गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या घालून त्यांना सजवतात. खणा-नारळाने गौरीची ओटी भरतात. गौरीजवळ तिचे बाळ ठेवतात. त्याला खण लावतात. दुसर्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य करतात. सवाष्ण जेवायला सांगतात आणि हळदी-कुंकू करतात. दिव्यांची रोषणाई करतात.
९. नवरात्र (घटस्थापना)
सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती करतात. हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. शक्ती स्वरूपिणीचे नवरात्र हा आदिमाया, आदिशक्तीच्या प्रार्थनेचा काळ आहे. चौकाचौकात मंडप टाकून देवीपुढे रास, गरबा, दांडिया खेळतात.
१०. विजयादशमी (दसरा)
घराघरांत सर्वांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात.
११. धनत्रयोदशी
या दिवशी व्यापारी वर्ग खातेवह्या नवीन घेतात. धनतेरसदेवतेला चंद्राच्या समान मानले आहे. या दिवशी पणत्या लावतात. धन्वन्तरि नावाची देवता अमृतकलशाच्या समवेत समुद्रमंथनातून उत्पन्न झाली. धने म्हणजे व्यक्तीची उन्नती आणि धन संपदेत वृद्धीचे प्रतीक आहे.
१२. नरकचतुर्दशी
सूर्योदयापूर्वी स्नान करणे. दिवाळीसाठी गोड-तिखट पदार्थ केले असतील, ते घरातील थोर, लहान मंडळींनी एकत्र बसून त्याचा स्वाद घेतला जातो.
१३. लक्ष्मीपूजन
लक्ष्मी प्रसन्न झाली की, प्रकाश स्वतः पसरतो. घराच्या दरवाज्याला केळीचे खांब लावतात. झेंडूच्या फुलांच्या आणि आंब्याच्या पानांच्या माळा लावतात. लक्ष्मी स्थिरता, विवेक बुद्धीने रहाते. बुद्धीची देवता गणपति म्हणून लक्ष्मीसमवेत त्याची पूजा करतात. वही खात्याची पूजा करतात. लक्ष्मीला कमळाचे फूल वाहतात. पेढे-बत्तासेचा नैवेद्य दाखवतात. चांदीची पूर्वीची नाणी, रुपये असतील, तर त्यांची पूजा करतात.
१४. बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
विष्णूने वामन अवतार घेतला. बटु रूप घेऊन बळी राजाकडे दान मागत ३ पावले पुरतील एवढी भूमी मागितली. बळीचे गुरु शुक्राचार्य म्हणाले, ‘‘या मागण्यामागे कपट आहे.’’ औदार्याचा पुतळा असलेल्या बळीने प्रत्यक्ष विष्णु भगवान याचक म्हणून येणार. मी त्यांना सर्वस्व दान करीन. बटु वामनाने प्रचंड रूप घेतले आणि दोन पावलांनी विश्व व्यापले. तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले. बळीला पाताळात गाडले. बळीच्या औदार्यावर प्रसन्न होऊन त्याला वामनाने ‘आजची तिथी बलिप्रतिपदा ओळखली जाईल’, असे वचन दिले. या दिवशी लग्न झालेली स्त्री आपल्या पतीला ओवाळते. पती पत्नीला भेटवस्तू देतात.
१५. भाऊबीज
भावाचे नाते दृढ करणारा दिवस. यानिमित्त यम-यमुना यांची कहाणी पुढे दिली आहे.
‘यमराज स्वतः गोलोकात गेले. विश्राम घाटावर यमुनेची भेट झाली. भावाला पाहून यमुनेला आनंद वाटला आणि तिने भावाला जेवायला घातले. यमाने म्हटले, ‘‘वर माग.’’ त्यावर यमुनाने वर मागितला आणि यमाने ‘जे लोक भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे जेवतील आणि मथुरा विश्राम घाटावर स्नान करतील, ते यमलोकांत जाणार नाहीत. जो कुणी बहिणीच्या घरी जेवणार नाही, त्यांना बांधून यमपुरीला नेईन. तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील त्यांना स्वर्गात जागा मिळेल’, असा वर दिला. तेव्हापासून भाऊबीज करण्याची पद्धत चालू झाली. बहिणीने भावाला आपल्या घरी जेवायला बोलवावे. भावाला ओवाळावे आणि त्याला आवडेल, असा गोड पदार्थ करावा. भावाने बहिणीला ओवाळणी स्वरूपात भेटवस्तू द्यावी.
– सौ. सुलभा शिवराम कोल्हटकर, मध्यप्रदेश
(साभार : मासिक ‘ललना’, जून २०१८)