सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ठाणे येथील सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !
सौ. नम्रता ठाकूर यांच्या समवेत सेवा करणार्या ठाणे येथील सहसाधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. ज्योती राजेश कांबळे, बोईसर
१ अ. सौ. नम्रता ठाकूर यांना नामजपादी उपाय सांगण्याच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क होणे : ‘२५.७.२०२३ या दिवसापासून सद़्गुरु अनुराधाताईंनी (सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनी) मला सौ. नम्रता ठाकूर यांच्यासाठी नामजपादी उपायांचे नियोजन करण्याची सेवा दिली. या सेवेच्या माध्यमातून माझा श्री. ठाकूरकाका आणि त्यांच्या कुटुंबियांशी परिचय झाला. ही सेवा करतांना ‘हे कुटुंब गुरुमाऊलीला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे सनातनचे आदर्श कुटुंब आहे’, असे मला कळले.
१ आ. ‘सौ. ठाकूरकाकूंच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर साधनेचे सखोल संस्कार झाले असून त्यांच्यात साधनेमुळे स्थिरता आली आहे’, असे जाणवणे : या सेवेच्या निमित्ताने माझे ठाकूरकाकूंच्या कुटुंबियांशी बोलणे होत असे. तेव्हा मला त्यांच्यातील साधकत्व अनुभवता आले. इतक्या कठीण प्रसंगातही श्री. ठाकूरकाका स्थिर आणि शांत राहून प्रत्येक सूत्र विचारून काकूंविषयीचा निर्णय घेतात अन् घेतलेला निर्णय लगेच साधकांना कळवतात. ठाकूरकाकूंच्या मुलाशी एकदा माझे बोलणे झाले. त्याने शांत आणि स्थिर राहून मला त्याच्या आईची स्थिती सांगितली. ती ऐकतांना दादाने ‘हा प्रसंग स्वीकारला असून तो स्थिर आहे’, असे मला वाटले. त्यातून ‘साधनेमुळे कठीण प्रसंगातही कसे स्थिर रहाता येते आणि देवाला विचारून निर्णय घेता येतो’, हे मला शिकता आले.
यातून ‘या कुटुंबियांवर साधनेचे संस्कार किती खोलवर रुजले आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
१ इ. सौ. ठाकूरकाकूंना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांची ओढ लागणे अन् परिणामस्वरूप सद़्गुरु अनुराधा वाडेकर त्यांना भेटायला येणे : ठाकूरकाकूंना घरी आणल्यानंतर त्या काही प्रमाणात सर्वांना ओळखू लागल्या. त्या सतत श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात राहू लागल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक पालट होऊ लागला. ‘त्या गुरुचरणी शरण गेल्या आहेत’, असे जाणवत होते. एखाद्या मुलाला आईची ओढ लागावी, त्याप्रमाणे त्यांना सद़्गुरु अनुताईंना (सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांना) भेटण्याची ओढ लागली. त्यांना ‘सद़्गुरु अनुताई माझ्यासाठी औषध घेऊन मला भेटायला येतील’, अशी निश्चिती वाटत होती आणि झालेही तसेच ! सद़्गुरु अनुताई ठाकूरकाकूंच्या भेटीसाठी आल्या आणि जिवा-शिवाची भेट झाली ! सद़्गुरु अनुताईंना भेटून जणू ठाकूरकाकूंचे ध्यान लागले !
१ ई. सौ. ठाकूरकाकूंनी आर्ततेने केलेल्या अनुसंधानामुळे भगवंतालाही (सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनाही) भेटायला यावे लागणे : हे क्षण अनुभवतांना संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपोआप माझ्या मनात आला, ‘भेटीलागी जीवा । लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस । वाट तुझी ॥’ हा सर्व प्रसंग पाहून मला वाटले, ‘ठाकूरकाकूंचे अनुसंधान किती तीव्रतेचे असेल की, साक्षात् भगवंतालाही त्यांच्या भेटीसाठी यावे लागले !’
‘कृपाळू भगवंता, ‘अनुसंधान कसे साधायचे ? श्री गुरूंप्रतीची तीव्र ओढ किंवा तळमळ कशी हवी ?’, याचे हे उत्तम उदाहरण असून त्यातून तू आम्हाला शिकवत आहेस. कृतज्ञता गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ! कृतज्ञता !
१ उ. श्री. ठाकूर यांनी औदुंबर वृक्षाला प्रार्थना करून प्रसाद स्वरूपात त्याचे एक पान आणून ते सौ. नम्रता यांच्या डोक्यावर ठेवल्यावर त्यांना सर्व स्मरण होऊ लागणे : ६.८.२०२३ या दिवशी मला ठाकूरकाकूंच्या स्थितीविषयी सांगितल्यावर ठाकूरकाका म्हणाले, ‘‘मागील ४ – ६ मासांपूर्वी आमच्याकडे एक उंबराचे (औदुंबराचे) झाड आले आहे. मागील २ – ४ दिवसांपासून मी त्याच्यासमोर जाऊन प्रार्थना करतो आणि त्याचे एक पान प्रसाद म्हणून आणून ते नम्रताच्या डोक्यावर ठेवतो. त्याचा परिणाम म्हणून नम्रताला आता बर्यापैकी सर्व स्मरण होऊ लागले आहे.’’ हा अद़्भुत चमत्कार ऐकून ‘ही सर्व देवाची लीला आहे’, असे मला वाटले. देवाचरणी कोटीशः कृतज्ञता !
१ ऊ. रुग्णाईत स्थितीत स्मृतीभ्रंश झाल्यावर मायेतील सर्व गोष्टींचा विसर पडलेल्या; पण श्री गुरु, सद़्गुरु, साधना आणि सेवा यांना न विसरणार्या सौ. नम्रता ठाकूर ! : ‘माझा ठाकूरकाकूंशी सेवेच्या निमित्ताने संपर्क होतो’, हे ठाकूरकाकांना ठाऊक आहे. त्यामुळे ते मला म्हणाले, ‘‘नम्रता तुम्हाला ओळखते का पाहूया का ? तुम्ही बोलता का तिच्याशी ?’’ तेव्हा मी प्रार्थना करून ठाकूरकाकूंशी बोलले, ‘‘आपण सेवा कधी चालू करायची ? आध्यात्मिक नामजपादी उपाय देण्याचे नियोजन कधी करायचे ?’’ तेव्हा त्या पटकन् म्हणाल्या, ‘‘हो, हो. आपल्याला सेवा करायचीच आहे. आपण सेवा चालू करूया. सेवेत कधीही खंड पडू द्यायचा नाही.’’
यातून ‘ठाकूरकाकूंनी श्री गुरु, सद़्गुरु अनुताईं, साधना, आणि सेवा यांचा किती ध्यास घेतला आहे’, ते ठाकूरकाकांच्या आणि माझ्या लक्षात आले. त्यांच्या पेशीपेशीत साधना भिनली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचे विस्मरण झाले, तरीही त्यांना साधना आणि सेवा यांचे जराही विस्मरण झाले नव्हते. ही देवाचीच लीला आहे. त्यांना आपल्या कुटुंबियांचा विसर पडला; पण गुरुमाऊलींचा विसर कधीच पडला नाही. ‘ठाकूरकाकूंनी स्वतःमध्ये साधनेचे संस्कार किती रुजवले असतील ?’, याची मला जाणीव झाली.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे), ही केवळ आपलीच कृपा ! या सेवेच्या माध्यमातून आपण मला हे अनुभवयाला दिल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’
२. श्रीमती स्वाती कुलकर्णी, नौपाडा, जिल्हा ठाणे.
२. ‘भाव तिथे देव’ या उक्तीप्रमाणे सौ. नम्रता ठाकूर यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी असलेल्या सततच्या अनुसंधानामुळे त्यांच्या घरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : ‘एकदा मी सौ. नम्रता ठाकूर यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. मी नुकतीच एका शिबिरासाठी गोव्याला जाऊन आले होते; म्हणून मी त्यांना म्हणाले, ‘‘आम्हाला गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सत्संग लाभला.’’ तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘गुरुदेव काय म्हणाले ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘गुरुदेवांनी व्यष्टी साधना वाढवायला सांगितली आहे.’’ त्याच वेळी खोलीतील साधिकेने आरती लावली; म्हणून मी डोळे मिटून मनातल्या मनात आरती म्हणायला लागले. त्या क्षणी मला तिथे ‘पिवळा झब्बा घातलेले गुरुदेव नम्रतावहिनींच्या उशापाशी उभे आहेत’, असे दिसले. नंतर मला ‘त्यांच्या घरातच गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवले. ‘नम्रतावहिनी सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे ठाकूरकाकांनी सांगितल्यावर मला या अनुभूतीचे कारण कळले. ‘नम्रतावहिनींमधील भावामुळे तिथे गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘भाव तिथे देव’ या वचनाची अनुभूती नम्रतावहिनींमुळे मला घेता आली. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. सौ. कल्पना कार्येकर, मुंबई (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे)
३ अ. ‘अनुसंधानातील आर्तता कशी असायला हवी ?’, हे शिकता येणे : ‘सौ. नम्रता ठाकूर या कर्करोगाने गंभीर रुग्णाईत आहेत. त्यांचे प.पू. गुरुदेव आणि सद़्गुरु अनुराधाताई यांच्याशी सतत अनुसंधान असते. सद़्गुरु अनुताई रामनाथी (गोवा) येथे शिबिरामध्ये व्यस्त होत्या आणि त्या ५.८.२०२३ या दिवशी ठाणे येथे येणार होत्या; पण २.८.२०२३ या दिवशीच त्या खास ठाकूरकाकूंना भेटण्यासाठी रामनाथी येथून आल्या. ठाकूरकाकूंच्या अनुसंधानातील तीव्र आर्ततेमुळे त्यांना यावे लागले. ‘अनुसंधान कसे असायला हवे आणि आर्तता कशी असायला हवी ?’, हे मला या प्रसंगातून शिकता आले.
३ आ. सद़्गुरु अनुराधा वाडेकर भेटायला आल्यावर सौ. ठाकूरकाकूंना पुष्कळ आनंद होऊन समाधान वाटून त्या ध्यानात जाणे : नम्रताताई पुष्कळ आतुरतेने सद़्गुरु अनुतार्ईंची वाट पहात होत्या. त्यांना भेटायला येणार्या सर्वांनाच त्या ओळखत नसत; मात्र सद़्गुरु अनुताई नम्रताताईंना भेटायला गेल्यावर नम्रताताईंनी सद़्गुरु अनुतार्ईंना लगेचच ओळखले. त्यांना पाहून नम्रताताईंची भावजागृती झाली. त्यांच्या चेहर्यावरील भाव एकदम पालटले आणि त्यांचा चेहरा पुष्कळ आनंदी दिसू लागला. ‘आपली आईच आपल्याला भेटायला आली आहे’, असा भाव त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. त्यांचा आनंद त्या शब्दांत व्यक्त करू शकत नव्हत्या; मात्र ‘एवढ्या दिवसांची प्रतीक्षा संपली’, असा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. ‘सद़्गुरु अनुताईंची भेट झाल्यावर लगेचच त्या ध्यानावस्थेत गेल्या’, असे जाणवले.
३ इ. ‘साधनेमुळे श्री गुरु प्रारब्ध भोगण्यासाठी बळ कसे देतात ?’, हे लक्षात येणे : खरेतर, सौ. ठाकूरकाकूंच्या या दुखण्यात वेदनांची तीव्रता एवढी प्रचंड असते की, सर्वसामान्य व्यक्ती त्या वेदना सहनच करू शकत नाही; पण ठाकूरकाकूंना या वेदना जाणवतही नव्हत्या. ते पाहून आधुनिक वैद्यही म्हणाले,
‘‘गेल्या १० वर्षांत मी असा रुग्ण पाहिला नाही. केवळ त्यांचे गुरुच त्यांना बळ देत आहेत आणि त्यांची काळजी घेत आहेत.’’ यातून मला श्री गुरु आणि साधना यांचे महत्त्व लक्षात आले. ‘साधनेने प्रारब्ध भोगण्याची क्षमता कशी वाढते ? श्री गुरु आध्यात्मिक बळ पुरवतात, म्हणजे नेमके काय करतात ?’, याची मला जाणीव झाली.
३ ई. त्रासदायक शक्तीचे आवरण काढण्याचे गांभीर्य लक्षात येणे : सौ. ठाकूरकाकू गंभीर रुग्णाईत असूनही त्या स्वत:वरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढतात. त्यांची आवरण काढतांनाची छायाचित्रे आणि चित्रीकरण मी पाहिले. ते पाहून मला स्वतःचीच लाज वाटली. अशा स्थितीतही ठाकूरकाकू आवरण काढतात आणि मी मात्र थोडेसे आवरण काढल्यासारखे करते आणि ‘हात दुखतात’, या विचाराने आवरण काढणे थांबवते. आता ‘मी आवरण काढण्याचा कंटाळा केला, तर गुरुकृपेने माझ्या डोळ्यांसमोर ठाकूरकाकूंचा चेहरा येऊन माझ्याकडून आवरण काढले जाईल’, असे मला वाटले.’
४. सौ. शैला घाग, नौपाडा, ठाणे.
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील नितांत श्रद्धा अनुभवता आणि शिकता येणे : ‘वर्ष २०१४ मध्ये त्यांचे कर्करोगाचे निदान झाल्यावर ‘आपल्याला गंभीर दुखणे झाले आहे’, असे दडपण त्यांनी घेतले नाही. त्या एकच म्हणायच्या, ‘परम पूज्य आहेत, ते बघतील.’ वर्ष २०१८ मध्येही पुन्हा कर्करोगाने रुग्णाईत झाल्यावरही जे शारीरिक भोग आहेत, ते त्या सकारात्मक राहून स्वीकारत होत्या. ‘त्यांचा हसतमुख चेहरा आणि खळखळून हसणे’ यांकडे बघून सर्वांना चांगले वाटत असे. त्यांची परम पूज्यांवर नितांत श्रद्धा आहे. ‘माझी श्री गुरूंवर श्रद्धा आहे’, असे नुसते बोलणे नसून ‘प्रत्यक्षात श्री गुरूंवर श्रद्धा कशी असावी ?’, हे गुरुमाऊलीने मला नम्रतावहिनींकडून शिकवले.
४ आ. रुग्णाईत असतांनाही आनंद जाणवणे : सौ. ठाकूरवहिनी सतत परम पूज्यांच्या अनुसंधानात असतात. साधारणपणे रुग्णाईत व्यक्तीला भेटल्यावर आपल्या मनाची एक वेगळी स्थिती होते. रुग्णाचे दुखणे पाहून दुःख वाटून ताण येतो; मात्र ठाकूरवहिनींना त्या रुग्णाईत असतांना भेटल्यावरही मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ११.८.२०२३)
|