सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर घेतलेल्या भेटीतील काही अनमोल क्षण अन् सूक्ष्मातील प्रयोग !
निज श्रावण शुक्ल षष्ठी (२२.८.२०२३) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केल्याला ९ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अतिशय अल्प असूनही पू. बाबांना (पू. पद्माकर होनप यांना) देहत्यागापूर्वी भेटायला आले होते आणि देहत्यागानंतर पार्थिवाचे दर्शन घ्यायला आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. बाबांच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे आणि त्यांनी पू. बाबांच्या संदर्भात केलेले सूक्ष्मातील प्रयोग पुढे दिले आहेत.
१. २८.१०.२०२२
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. बाबांच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे : परात्पर गुरु डॉक्टर पू. बाबांना भेटायला आले. त्या वेळी बाबा थोडा वेळ जागृतावस्थेत होते. तेव्हा ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलण्याला थोडाफार प्रतिसाद देत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. पू. बाबांच्या मनात कुठल्याही इच्छा राहिलेल्या नाहीत आणि त्यांच्या काही अपेक्षाही नाहीत.
२. त्यांनी जीवनाचे सार्थक केले.
३. त्यांच्या चेहर्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण दिसत नाही.
४. ‘ते आजारामुळे त्रासले आहेत’, असे त्यांच्या चेहर्याकडे पाहून वाटत नाही. त्यांचा चेहरा आनंदी वाटतो.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. पद्माकर होनप यांच्या शरिराकडे आणि चेहर्याकडे पाहून काय वाटते ?’, याविषयी करवून घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग : परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला प्रथम पू. बाबांच्या चरणांपासून कमरेपर्यंतच्या भागाकडे पहाण्यास सांगितले. त्यानंतर ‘पू. बाबांच्या चेहर्याकडे पाहून काय जाणवते ?’, हे अभ्यासण्यास सांगितले. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१ आ १. पू. बाबांच्या चरणांपासून कमरेपर्यंतच्या भागाकडे पहाणे
अ. ‘मला शांतीच्या लहरी जाणवल्या आणि माझे मन निर्विचार झाले.’ – श्री. राम होनप
आ. ‘मला शांत वाटले.’ – सुश्री (कु.) दीपाली होनप
१ आ २. पू. बाबांच्या चेहर्याकडे पहाणे
अ. ‘पू. बाबांचा चेहरा पाहून आमचा भाव जागृत झाला आणि आमच्या मनाला आनंद जाणवला.’
– श्री. राम होनप आणि सुश्री (कु.) दीपाली होनप
वरील उत्तरे योग्य असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले.
२. २९.१०.२०२२
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. बाबांच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे
१. परात्पर गुरु डॉक्टर पू. बाबांना भेटायला आले. त्या वेळी पू. बाबा झोपलेले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबा साधकांना मोठ्या प्रमाणात चैतन्य देत आहेत.’’
२. देहत्यागानंतर बाबांचे डोळे उघडे आणि वरच्या दिशेने होते. हे पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबांना वरील सूक्ष्मलोकातील सर्वकाही दिसत आहे.’’
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. पद्माकर होनप यांच्याकडे पाहून कोणता नामजप चालू होतो ?’, याविषयी घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग : मी (सुश्री (कु.) दीपाली होनप) परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘पू. बाबा श्वासोच्छ्वास करत असतांना त्यांच्या पोटाची हालचाल होत आहे. त्या हालचालीकडे पाहून मला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकू येत आहे आणि तो नामजप अतिशय तालबद्ध होत असल्याचे जाणवत आहे.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. बाबांकडे ५ मिनिटे पाहिले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘तुझे योग्य आहे. मी बाबांकडे पाहून सप्तदेवतांपैकी एकेका देवतेचा नामजप केला. ‘त्या देवतेची स्पंदने आणि बाबांकडून येणारी स्पंदने जुळतात का ?’, याचा मी अभ्यास केला. त्या वेळी ‘सप्तदेवतांच्या नामाची स्पंदने आणि बाबांकडून येणारी स्पंदने जुळत नाहीत’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी ‘निर्विचार’ हा जप केला. तेव्हा ती स्पंदने बाबांकडून येणार्या स्पंदनांशी जुळली.’’ प्रत्यक्षातही पू. बाबा त्या वेळी ‘निर्विचार’ हा जप करत होते.
त्यानंतर काही साधकांनीही हा प्रयोग केला. त्यांना प्रथम ‘पू. पद्माकर होनप यांच्याकडे पाहून सप्तदेवतांपैकी कोणत्या देवतेचा नामजप चालू होतो ?’, हा प्रयोग आणि नंतर ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’, ‘ॐ’ आणि ‘निर्विचार’ यांपैकी कोणता नामजप चालू होतो ?’, हा प्रयोग करण्यास सांगण्यात आले. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे सारणीत दिली आहेत.
(सारणी बाजूच्या स्तंभात दिली आहे.)
३. ३०.१०.२०२२
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या चरणांपासून डोक्यापर्यंत काही अंतरावरून हात फिरवल्यावर काय जाणवते ?’, याविषयी केलेला सूक्ष्मातील प्रयोग : पू. बाबांनी देहत्याग केल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर पू. बाबांच्या खोलीत आले. तेव्हा त्यांनी पू. बाबांच्या चरणांपासून डोक्यापर्यंत काही अंतरावरून हात फिरवला. त्यानंतर त्यांनी पू. बाबांचे आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र यांपासून काही अंतरावर हात ठेवून सूक्ष्मातून प्रयोग केला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘बाबांच्या चरणांच्या ठिकाणी माझा हात गरम झाला; कारण त्यांतून शक्तीचे प्रक्षेपण होत आहे. त्यांच्या चरणांपासून डोक्यापर्यंत हात नेत असतांना गरम जाणवण्याचे प्रमाण न्यून होऊन गारवा जाणवण्याचे प्रमाण वाढले. बाबांच्या चेहर्याकडे पाहून आनंद जाणवत आहे. त्यांचे आज्ञाचक्र आणि सहस्रार यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे अन् ते हाताला जाणवत आहे.’’ नंतर काही साधकांनीही हा प्रयोग केला. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
३ अ १. (सुश्री) कु. दीपाली होनप
अ. ‘पू. बाबांच्या चरणांच्या ठिकाणी उष्णता जाणवली आणि तेथून डोक्यापर्यंत गारवा वाढत गेल्याचे जाणवले. ‘त्यांचे आज्ञाचक्र आणि सहस्रार यांतून पुष्कळ चैतन्य बाहेर पडत आहे’, असे जाणवले.’
३ अ २. सौ. आरती पुराणिक
अ. ‘पू. काकांच्या तळपायाजवळ पुष्कळ उष्णता जाणवली. जसजसा मी माझा हात तळपायांपासून त्यांच्या चरणांच्या बोटांपर्यंत नेत होते, तसतसे माझ्या हाताला थंड (वातानुकूलन यंत्र लावल्यावर जसे थंड वाटते तसे) वाटू लागले.
आ. त्यांच्या चरणांच्या बोटांपासून मी माझा हात त्यांच्या अनाहतचक्रापर्यंत नेल्यावर मला तिथे पोकळी जाणवली. पू. काकांच्या छातीच्या ठिकाणी मला २ – ३ फूट रुंदीच्या पिवळ्या प्रकाशाचे वलय दिसले. त्या पिवळ्या प्रकाशात मला श्री विठ्ठलाचे दर्शन झाले. मी हा प्रयोग ३ वेळा करून पाहिला आणि तिन्ही वेळा मला श्री विठ्ठलाचेच दर्शन झाले.
इ. पू. काकांच्या अनाहतचक्रापासून सहस्रारापर्यंत हात नेतांना मला काहीच जाणवले नाही. ‘निर्गुण तत्त्व कार्यरत असल्याने काहीच जाणवले नाही’, असे मला वाटले.
ई. हा प्रयोग चालू असतांना मला तेथे पू. होनपकाका उभे असल्याचे जाणवले. ‘संशोधनासाठी सूक्ष्मातील प्रयोग होत असल्याचे पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला वाटले.’
३ अ ३. श्री. सत्यकाम कणगलेकर
अ. ‘प्रयोग करण्यासाठी मी पू. काकांच्या देहाच्या शेजारी उभा असतांना ‘पू. काका उठून माझा हात धरत आहेत’, असे मला जाणवले.
आ. त्यांच्या तळपायाजवळ माझा हात धरला असता मला माझ्या हाताच्या तळव्यावर शक्तीची स्पंदने जाणवली. त्यांच्या तळपायांच्या समोर माझ्या हाताचा तळवा धरल्यावर माझ्या संपूर्ण हाताला झिणझिण्या येऊ लागल्या.
इ. मी माझा हात त्यांच्या चरणांकडून देहाच्या दिशेने वर वर नेत असतांना माझ्या हाताला झिणझिण्या येतच होत्या.
ई. मी माझा हात त्यांच्या मणिपूरचक्रापर्यंत नेल्यावर माझा हात निर्वात पोकळीतून जात असल्याचे मला जाणवत होते. त्या वेळी माझ्या हाताला कसलाही स्पर्श जाणवत नव्हता.
उ. जसजसा मी माझा हात त्यांच्या मणिपूरचक्रापासून आज्ञाचक्राच्या दिशेने नेला तसतशा माझ्या हाताला वातावरणातील संवेदना जाणवू लागल्या आणि गारवा जाणवू लागला. या संपूर्ण वेळेत माझे मन निर्विचार स्थितीत होते.
ऊ. प्रयोग करत असतांना माझ्या मनाला पुष्कळ शांतता जाणवत होती. त्या वेळी माझे ध्यान लागल्यासारखे वाटत होते. ‘कोणत्याही हालचाली न करता किंवा न बोलता एकाच स्थितीत शांत रहावे’, असे मला वाटत होते.’
३ अ ४. सौ. जान्हवी रमेश शिंदे
अ. ‘पू. काकांच्या तळपायांसमोर हात धरल्यावर चरणांतून उष्णता येत असल्याचे जाणवले. एखाद्या जिवंत माणसाच्या शरिरातून जशी उष्णता बाहेर पडतांना जाणवते, तसे मला वाटत होते.
आ. माझा हात त्यांच्या चरणांच्या बोटांच्या पुढे नेताक्षणी मला गारवा जाणवू लागला. तेथून पुढे हात नेत असतांना मला गारवा वाढत गेल्याचे जाणवले.
इ. त्यानंतर पुढच्या पुढच्या चक्रांकडे जातांना माझे शरीर आणि डोळे यांभोवतालचा, तसेच माझ्या त्या त्या चक्रांच्या ठिकाणचाही गारवा वाढत गेला. माझे मन अधिक निर्विचार होत गेले आणि श्वास मंद होत गेला.
ई. त्यांच्या सहस्राराकडे हात जाताक्षणी माझी सुषुम्ना नाडी चालू झाली आणि मला स्थिर वाटले.
उ. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘ते जिवंत आहेत’, असे मला वाटत होते. मला त्यांच्या डोळ्यांची हालचाल जाणवत होती.’
३ अ ५. कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
अ. ‘पू. काकांच्या तळपायांजवळ पुष्कळ उष्णता जाणवली. जसजसा मी माझा हात त्यांच्या तळपायांपासून त्यांच्या चरणांच्या बोटांपर्यंत नेत होते, तसतसे माझ्या हाताला थंड जाणवू लागले, तसेच माझे शरीरही थंड होऊ लागले. मी ‘खोलीत कुठे वातानुकूलन यंत्र लावले आहे का ?’, हे पाहू लागले; पण तेथे वातानुकूलन यंत्र नव्हते.
आ. जसजसा मी माझा हात त्यांच्या चरणांपासून डोक्यापर्यंत नेत होते, तसतसे माझ्या मनाला शांत शांत जाणवत होते.
इ. मी माझा हात त्यांच्या अनाहतचक्राकडे नेल्यावर ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.
ई. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर मला आनंद जाणवत होता आणि त्यांचे डोळे हलत असून ‘ते आता आपल्याशी काहीतरी बोलतील’, असे मला जाणवत होते. मी आधीही काही साधकांना त्यांच्या मृत्यूनंतर जवळून पाहिले आहे; पण एवढी सजीवता मला कधी जाणवली नव्हती.’
३ आ. पू. पद्माकर होनप यांचा हात आणि पाय यांच्या ठशांकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेला प्रयोग : देहत्यागानंतर पू. बाबांचे हात आणि पाय यांचे ठसे अभ्यासाच्या दृष्टीने घेण्यात आले. ते पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबांच्या चरणांच्या ठशातून शक्तीचे आणि हाताच्या ठशातून आनंदाचे प्रक्षेपण होत आहे, तसेच ‘बाबा आशीर्वाद देत आहे’, असे जाणवते.’’ (‘आम्हालाही असे जाणवले.’ – सुश्री (कु.) दीपाली होनप आणि श्री. राम होनप)
परात्पर गुरु डॉक्टर खोलीतून निघतांना म्हणाले, ‘‘आज सकाळपासून मला बाबांच्या भेटीसाठी येण्याची इच्छा सतत होत होती. ‘या सूक्ष्मातील प्रयोगांतून देवाला मला खूप काही शिकवायचे होते; म्हणून मला ही ओढ लागली होती’,
हे समजले.’’
– सुश्री (कु.) दीपाली होनप आणि श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी आणि धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. पद्माकर होनप यांना अंत्यसमयी ‘मुलांची काळजी पुढे देव घेईल’, याविषयी आश्वस्त करणे !परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. पद्माकर होनप यांची अंत्यसमयी भेट घेतली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला मुलांची (कु. दीपाली, श्री. सुरेंद्र आणि श्री. राम) यांची काळजी वाटत नाही ना ? त्यांची काळजी करू नका. ती देव घेईल.’’ या प्रसंगी माझ्या मनात विचार आले, ‘देव सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहे. गुरूंनी आपला भार कायमचा देवावर सोपवला आहे. गुरूंनी हा मोठा आशीर्वाद दिला आहे.’ त्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२३) |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |