भविष्यवाणी : चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

  • कर्नाटकातील कोडी मठाचे श्री शिवानंद स्वामीजी यांचे भविष्य कथन

  • मुसळधार पाऊस, भूकंप आणि सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जगात मृत्यूंचे प्रमाण वाढण्याचेही केले भाकित !

बेळगाव – भारताच्या चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेविषयी सध्या जगभरात चर्चा चालू आहे. अशातच कोडीमठाचे प्रसिद्ध संत श्री शिवानंद स्वामीजी यांनी यासंदर्भात भाकीत वर्तवले आहे. ते म्हणाले की, चंद्रावर पाऊल ठेवणारा देश होण्यास सिद्ध असलेल्या भारताची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी होणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणारा भारत हा पहिला देश होणार आहे, असे ते या वेळी म्हणाले.

कोडीमठाचे संत श्री  शिवानंद स्वामीजी

स्वामीजी पुढे म्हणाले की, श्रावण मासाच्या मध्यकाळात जगाला धुऊन काढणारा पाऊस पडणार आहे. भूकंपासारख्या घटना घडणार आहेत. सुनामी येऊन मृत्यूंचे प्रमाण वाढणार आहे. जागतिक स्तरावर युद्धाची स्थिती निर्माण होणार आहे. वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीविषयी मात्र स्वामींनी काहीही सांगितले नाही.

कोडीमठाचे स्वामी शिवानंद स्वामी यांनी केलेली भाकिते !

१. जागतिक विषारी वायूचा भारतावर दुष्परिणाम होईल. मोठी महानगरे भूकंपाचा घास होतील. अचानक लोकांचा मृत्यू होईल. पाऊस, पूर, भूकंप, प्रवाहात वाहून जाणे इत्यादींमुळे केवळ भारतच नव्हे, तर जगाला धक्का बसून जग त्रस्त होणार आहे.

२. पावसामुळे न्यूनतम २ देशांना पुष्कळ धोका आहे. भारतही पुढील काही दिवसांत जलप्रलयाचा साक्षीदार होईल, अशी लक्षणे आहेत.

३. भारताच्या दक्षिण भागात समृद्धी येेणार आहे.

४. देवावर विश्‍वास ठेवणार्‍यांना कोणताही त्रास होणार नाही. विश्‍वास नसणार्‍यांना त्रास होईल. काहींचा विश्‍वास असूनही प्रकृती नियमानुसार त्रास होऊ शकतो.

५. पैशाच्या मागे लागलेला माणूस देवाला विसरला आहे. देवावर विश्‍वास ठेवून जगायला हवे. हा विश्‍वास गमावल्याचा परिणाम आपण बघत आहोत.

६. सध्याचे राजकारण संपल्यास पुढे कर्नाटक राज्यात महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.