प्राचीन स्मारकांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणार !
मुंबई – राज्यातील प्राचीन स्मारकांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिलेल्या ३०० पदांपैकी गट ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील १०९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. राज्याच्या पयर्टन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून ही भरतीप्रक्रिया होणार आहे.
कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणारे मनुष्यबळ १ वर्ष किंवा सुधारित आकृतीबंध अंतिम होईपर्यंत कार्यरत रहाणार आहे. राज्यातील प्राचीन स्मारकांच्या झालेल्या दुरवस्थेसाठी पुरातत्व विभागातील रिक्त पदे हेही एक महत्त्वाचे कारण होते. याविषयी राज्यातील गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्याकडून सरकारकडे वेळोवेळी अनेक तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या भरतीप्रक्रियेमुळे प्राचीन स्मारकांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी मनुष्यबळ प्राप्त होणार आहे. कनिष्ठ अभियंता, तंत्र साहाय्यक, संशोधन साहाय्यक, साहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, राखणदार, चित्रकक्ष साहाय्यक, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी, माळी, स्वच्छता कर्मचारी आदी विविध १९ पदांवरील कर्मचार्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे ! |