सिंधुदुर्ग : तलाठ्यांना त्यांचे प्रतिदिनचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याचे आदेश
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी एका तलाठ्याकडे २ किंवा त्याहून अधिक सजांचे (गावांचे) दायित्व आहे. त्यामुळे तलाठी आपल्या गावात कोणत्या दिवशी असणार हे गावकर्यांना ठाऊक नसल्याने गावकर्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आता तलाठ्यांना त्यांच्या कामाचे नियोजन वेळापत्रकासह ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ठळकपणे दिसेल, असे लावण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
(सौजन्य : Majha Solapur News Channel)
राज्यात ५ सहस्र ७४४ तलाठ्यांची पदे संमत झाली आहेत; पण त्यातील ४ सहस्र ६४४ पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन तलाठ्यांची नियुक्ती होईपर्यंत एका तलाठ्याकडे अनेक गावांचा कार्यभार रहाणार आहे. तलाठी हे पद गावातील महसूल विभागाचे महत्त्वाचे पद आहे. विविध प्रकारचे दाखले, उतारे देणे, भूमीच्या नोंदी घेणे, यासह पीक पहाणी, दुष्काळ, अतीवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत पंचनामे करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
या पार्श्वभूमीवर, तसेच रिक्त पदांमुळे होणारी ग्रामस्थांची असुविधा टाळण्यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून तलाठ्यांना त्यांचे प्रतिदिनचे वेळापत्रक गावातील इतर शासकीय इमारतींवर दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या वेळापत्रकात तलाठ्यांनी त्यांचे, तसेच मंडल अधिकारी आणि नायब तहसीलदार यांचे भ्रमणभाष क्रमांक नोंदवावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.