सिंधुदुर्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्र चालू करण्यास होणार्‍या विलंबाच्या निषेधार्थ आडाळी ते बांदा मार्गावर मोर्चा !

८ कि.मी. अंतराच्या मोर्च्यात शेकडो ग्रामस्थांचा सहभाग

मोर्च्यात सहभागी ग्रामस्थ आणि समित्यांचे कार्यकर्ते

दोडामार्ग – तालुक्यातील आडाळी येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना वितरित करून हे क्षेत्र कार्यान्वित करण्यात महाराष्ट्र राज्य आद्यौगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) आणि राज्यशासन यांच्याकडून होणार्‍या विलंबाच्या निषेधार्थ रविवार, २० ऑगस्ट या दिवशी आडाळी ते बांदा या ८ कि.मी. मार्गावर लक्षवेधी मोर्चा (लाँगमार्च) काढण्यात आला होता. या मोर्च्यात शेकडो युवक, युवती यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 (सौजन्य : abp majha)

आडाळी येथे ७२० एकर क्षेत्रात वर्ष २०१३  मध्ये ‘एम्.आय.डी.सी.’कडून औद्यागिक क्षेत्रास मान्यता मिळाली. एम्.आय.डी.सी., शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. परिणामी येथील बेरोजगारांना काम मिळत नसून त्यांना रोजगारासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे, असा आरोप करत आडाळी स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी’ संस्था संचलित आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’ स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याला भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता.

या मोर्च्यात आडाळीचे सरपंच पराग गावकर, प्रवीण गावकर, ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे सतीश लळीत, भाजपचे माजी आमदार राजन तेली, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक महेश सारंग, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.