(म्हणे) ‘ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावे संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत !’ – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
सरस्वतीदेवीचा अप्रत्यक्ष अवमान केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांकडून विरोध
नाशिक – ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही-आम्ही क्षुद्र ! त्यानंतर मग अतीक्षुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील केवळ पुरुषांना, महिलांनाही नाही. (पुराणांमध्ये अनेक विदुषींचे उल्लेख आढळतात. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा आदी विदुषी वेद-शास्त्रांमध्ये पारंगत होत्या. भारतीय संस्कृतीने किंवा सनातन हिंदु धर्माने महिलांनाही शिक्षणाचे समान अधिकार दिले होते. केवळ ब्राह्मणद्वेषापोटी छगन भुजबळ असे बोलत आहेत, हे लक्षात येते. – संपादक) केवळ दीड टक्का लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित होते. (याचा पुरावा आहे का ? याउलट इंग्रज भारतात येण्यापूर्वी येथे ५०० हून अधिक गुरुकुले होती. अगदी रामायणाच्या काळातही क्षत्रिय वंशातील श्रीराम आणि खालच्या जातीतील निषादराज एकाच गुरुकुलात शिकत होते. असे असतांना समाजातील ब्राह्मण वर्गाविषयी समाजात द्वेष निर्माण करण्याच्या आणि त्याला वाळीत टाकण्याच्या हिंदुद्वेषींनी रचलेल्या व्यापक षड्यंत्राचाच भुजबळ एक भाग आहेत, हे लक्षात येते. – संपादक)
संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असून ब्राह्मण समाजात कुणीही शिवाजी-संभाजी नाव ठेवत नाही. त्यामुळे इतिहास मोडणार्यांच्या विरोधात आपल्याला उभे रहावे लागेल, असे वादग्रस्त विधान अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. समाजदिनानिमित्त ‘मराठा विद्या प्रसारक समाजा’च्या शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. या वेळी त्यांनी ‘ज्यांची आपण छायाचित्रे लावतो, त्यांनी किती शाळा केल्या ? त्यांनी सर्वांना का नाही शिकवले ? आपण आपले देव ओळखायला शिका’, अशी मुक्ताफळे उधळत भुजबळ यांनी पुन्हा सरस्वतीदेवीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘माता सरस्वतीचा अवमान करणे योग्य नाही. भारत देश हा हिंदु देवतांना मान्य करणारा असून कुणाच्या भावनांना ठेच लागेल, असे बोलू नये.’’
‘ब्राह्मण समाजात…’ छगन भुजबळ यांचं वादग्रस्त विधान #chhaganbhujbal #sambhajibhide #NCP pic.twitter.com/Y9stX1eiQn
— Mumbai Tak (@mumbaitak) August 20, 2023
छगन भुजबळ यांनी इतरांविषयी बोलण्याआधी त्यांच्या स्वतःच्या घरातील नावे पालटावीत. त्यांनी स्वतःच्या मुलांची नावे शिवाजी, संभाजी अशी का नाही ठेवली ? भुजबळांनी स्वतःचे नाव पालटावे आणि शिवाजी भुजबळ असे करून दाखवावे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावे ? असा प्रश्न करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणार्याला १ लाख रुपये पारितोषिक देऊ ! – विश्वनाथ देशपांडे, प्रदेशाध्यक्ष, परशुराम सेवा संघ
मुंबई – छगन भुजबळ जी ‘एबीटी’ नावाची संस्था चालवत आहेत. ती कर्वे नावाच्या ब्राह्मणाकडून भुजबळ यांनी ढापलेली आहे. याविषयी न्यायालयात खटला चालू आहे. आता तुम्हाला क्षमा नाही. जो कुणी तरुण भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला आम्ही १ लाख रुपये पारितोषिक देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वनाथ देशपांडे यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवरून केली आहे.
जो तरुण छगन भुजबळ च्या कानाखाली मारेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ – विश्वजीत देशपांडे प्रदेशाध्यक्ष परशुराम सेवा संघ @abpmajhatv @News18lokmat @zee24taasnews @Dev_Fadnavis @mieknathshinde https://t.co/BfOOCWLNrv
— vishwajeet Deshpande (@vishwa_desh) August 20, 2023
या वेळी श्री. विश्वनाथ देशपांडे म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांच्या नावाने छगन भुजबळ यांनी धंदा चालवला आहे. महात्मा फुले यांनी जी शाळा काढली त्यामध्ये ब्राह्मणांचा सहभाग होता. या शाळेसाठी भिडे नावाच्या ब्राह्मणाने वाडा दिला तो चालला. या शाळेत आलेल्या पहिल्या ४ विद्यार्थीनी ब्राह्मणच होत्या. ब्राह्मणांनी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य केले. छगन भुजबळ यांनी ‘सरस्वतीदेवीने शाळा कुठे स्थापन केल्या आहेत ? ज्यांनी शाळा स्थापन केल्या ती आमची दैवते आहेत. आम्ही त्यांची पूजा करतो’, अशी आक्षेपार्ह विधाने केली. यापूर्वीही भुजबळ यांनी अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने केली आहेत. उपरती झाल्यावर त्यांनी क्षमायाचना केली. भुजबळ यांनी कुणाची पूजा करावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ब्राह्मण समाजाविषयीही भुजबळ यांनी अवमानकारक विधाने केली आहेत. ‘दीड टक्के ब्राह्मणांच्या हातात शिक्षणव्यवस्था होती’ असे विधानही भुजबळ यांनी केले. ‘ब्राह्मणांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही’, असे भुजबळ यांना म्हणायचे आहे. याविषयी भुजबळ यांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. ‘महाभारत’, ‘रामायण’ या ग्रंथांचे लेखक कोण आहेत, याचा भुजबळांनी अभ्यास करावा. ब्राह्मण समाजात ‘शिवाजी’, ‘संभाजी’ नाव असलेले शेकडोजण मी दाखवून देईन; परंतु कोणत्याही समाजात ‘छगन’ नाव मी कधीच ऐकलेले नाही. ‘डिक्शनरी’ मध्ये ‘छगन’ या शब्दाचा अर्थ अगदी लांछनास्पद आहे. त्यांच्या नावाप्रमाणे भुजबळ यांचा कारभारही अत्यंत लांचनास्पद आहे.’’