आयर्विन पुलाचे काम करणार्या ११० वर्षीय लक्ष्मीबाईंना माजी महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने सदनिका प्रदान !
सांगली – आयर्विन पुलाच्या बांधकामाच्या वेळी काम करणार्या ११० वर्षीय लक्ष्मीबाई पुजारी यांना माजी महापौर सौ. संगीता खोत यांच्या पुढाकाराने हक्काचे घर म्हणजे सदनिका मिळाली आहे. १८ ऑगस्टला महापालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात लक्ष्मीबाई यांना सदनिकेची कागदपत्रे देण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुंभार, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांसह अन्य उपस्थित होते.
वर्ष १९२९ मध्ये बांधून पूर्ण झालेल्या आयर्विन पुलाच्या बांधकामावर काम करणार्या लक्ष्मीबाई यांना सदनिका मिळाल्यावर भावाश्रू तरळले. या प्रकरणी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी प्रशासनाकडे या संदर्भात विशेष पाठपुरावा केला; मात्र त्यासाठी कुंभार यांना ४ वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले.