कोकण रेल्वेमार्गावर २३ ऑगस्टला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी – रत्नागिरी ते वैभववाडी रोड या स्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी बुधवार, २३ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत ‘मेगाब्लॉक’(अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे.
यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दादर–सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’ गाडीचा वेग रोहा-रत्नागिरी या स्थानकांच्या दरम्यान अडीच घंटे नियंत्रित केला जाणार आहे.
२२ ऑगस्टला थिरूवनंतपूरम् सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उडुपी-कणकवली या स्थानकांच्या दरम्यान ३ घंटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे. २३ ऑगस्टला सुटणारी सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेस या गाडीचा वेग सावंतवाडी ते कणकवली स्थानकांच्या दरम्यान ३० मिनिटांसाठी नियंत्रित ठेवला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळांत होणार्या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.