सनातनचा हात धरा म्हणजे कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पुणे येथे उत्साहात साजरा !
पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता) – ‘सनातन प्रभात’च्या आजवरच्या या प्रवासाचे सिंहावलोकन केल्यास त्याची अनेक रूपे आणि वैशिष्ट्ये डोळ्यासमोर येतात. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक मुखे असणार्या श्रीकृष्णाप्रमाणे ‘सनातन प्रभात’ आहे. नामजप, धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, मंदिरातील सुधारणा इत्यादी सर्व समस्यांवरील उपाय तसेच स्वभावदोष आणि ‘मी’पणा नाहीसा करणारे, असे हे वृत्तपत्र आहे. श्रीकृष्णाचे जसे अलंकार आहेत, तसेच शस्त्रेही आहेत. देशद्रोह्यांना उघडे करणे, धर्मद्रोह्यांना पळवून लावणे, सनदशीरपणे लोकचळवळ उभी करणे, हे कार्यही ‘सनातन प्रभात’ करते. स्वतःला कोणतेही श्रेय न घेता सारे श्रेय ते श्रीकृष्णाला देतात. सनातनचा हात धरा म्हणजे कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही, असे परखड प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी केले. कोथरूड येथील अश्वमेध कार्यालय येथे १८ ऑगस्ट या दिवशी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी उपस्थित होते. पुणे येथील सनातनचे संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची या सोहळ्याला वंदनीय उपस्थिती लाभली. प्रारंभी प्रार्थना करून श्लोक म्हणण्यात आला.
वेदमूर्ती राजेंद्र आरेकर आणि रघुनाथ जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते मिळून २०० हून अधिक जणांची उपस्थिती सोहळ्याला लाभली. ‘सनातन प्रभात’च्या वतीने श्री. चैतन्य तागडे यांनी विचार मांडले. श्री. नागेश जोशी यांनी ‘सनातन प्रभात’ समाजाला कसे लाभदायी आहे ? याविषयी मार्गदर्शन केले.
वितरकांचा सत्कार
सौ. सुनीता महाडिक आणि श्री. गिरीश धूत यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या वेळी ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे आणि ‘पेण टाईम्स न्यूज’चे संपादक श्री. अजय सोनावणे, विश्व हिंदू परिषदेचे आणि ‘हिंदू बोध’ मासिकाचे माजी संपादक श्री. विवेक सिन्नरकर, तसेच भाजपचे माजी नगरसेवक जयंत भावे, उद्योजक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय कार्यकर्ते विश्राम कुलकर्णी, भाजपच्या माजी नगरसेवक सौ. मंजुश्री खर्डेकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री. संदीप खर्डेकर, गोपरिषदेचे श्री. अक्षय महाराज भोसले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
क्षणचित्रे
१. श्री. संदीप खर्डेकर यांनी सनातन संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा आणि ग्रंथ भेट दिले.
२. जे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, त्यांनी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.
३. या वेळी साप्ताहिक सनातन प्रभातच्या नियतकालिकांचा कक्षही लावण्यात आला होता. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
४. भाजपचे माजी नगरसेवक श्री. जयंत भावे आणि उद्योजक श्री. विश्राम कुलकर्णी यांनी ‘आपले साधक नियमित, सातत्याने संपर्कात रहातात, पाठपुरावा करतात’, असे कौतुक केले. ‘तुमचे एवढे संघटन असल्यामुळे हे एवढे मोठे कार्य शक्य आहे’, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी नियतकालिकांच्या माध्यमातून केलेली जागृती आणि मिळालेले यश याविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली, तसेच ‘सनातन प्रभात’चे वाचक, वितरक यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. केतन पाटील यांनी केले. श्लोक म्हणून सोहळ्याची सांगता झाली.
वाचकांचे अभिप्राय
१. सौ. नूतन शहा – विविध सदरांच्या माध्यमातून सकारात्मकता, चैतन्य आपल्या घरात येते. इतर नियतकालिकांपेक्षा ‘सनातन प्रभात’ हे पुष्कळ वेगळे आहेत. कारण याला श्रीकृष्णाच्या नामाची चौकट आणि सुरक्षाकवच लाभलेले आहे.
२. श्री. संदीप खर्डेकर (भाजपचे शहर उपाध्यक्ष) – तुमचे कार्य पुष्कळ छान आहे. तुम्हाला कधीही काहीही साहाय्य लागले, तर मला सांगा. आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी कधीही तत्पर राहू. तुम्ही सगळे मिळून एवढे मोठे कार्य करता, ते कौतुकास्पद आहे असा अभिप्राय त्यांनी दिला.
आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी त्वरित भेट देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची ‘फ्रेम’ सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव यांना भेट दिली.
३. श्री सोमनाथ लोहाट – खरे हिंदुत्व म्हणजे काय ? आणि त्याविषयीची जागृती आणि कृती ‘सनातन प्रभात’मुळे समजली. साप्ताहिक सनातन प्रभात चालू केल्यावर वास्तूमध्ये सकारात्मक पालट झाले, सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य वास्तूमध्ये आले. लव्ह जिहाद, लँड जिहाद, तसेच हिंदूंवर होणारे अत्याचार हे प्रसारमाध्यमे किंवा अन्य कोणत्याही वृत्तपत्रातून मांडले जात नाही; पण सनातन प्रभातमध्ये ते निर्भिडपणे, परखडपणे मांडले जाते, त्यामुळे वाचकांमध्ये जागृती होते.
४. सौ. अक्षदा नारकर – साप्ताहिकाच्या माध्यमातून साधनेसाठी दिशा मिळाली. अडचणी आणि त्रासांमुळे डगमगून न जाता, तळमळीने शरण जाऊन कसे प्रयत्न करायचे ? संकटांवर कशी मात करायची ? हा दृष्टिकोन साप्ताहिक सनातन प्रभातमधून मिळाला. आपल्याला त्यातून सद्गुरु आणि संतांचे मार्गदर्शनही मिळते.
हिंदुत्वाचा योद्धा म्हणजेच ‘सनातन प्रभात’ ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्माचा विचार अग्रस्थानी ठेवून गेली २५ वर्षे कार्य करणारे एकमेव नियतकालिक, हिंदुत्वाचा योद्धा म्हणजेच सनातन प्रभात ! स्वातंत्र्यलढ्यात जे जनजागृतीचे जे कार्य ‘केसरी’ने केले, तेच कार्य आज ‘सनातन प्रभात’ करत आहे. ‘सनातन प्रभात’ समाजाला आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना योग्य दिशादर्शन देण्याचे कार्य, यासह साधनाही सांगणारे एकमेव नियतकालिक आहे.
बीजरूपाने विचार मांडून त्याचे चळवळीत रूपांतर करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात‘ने केले ! – चैतन्य तागडे
बीजरूपाने विचार मांडून त्याचे चळवळीत रूपांतर करण्याचे कार्य सनातन प्रभातने केले. हिंदु राष्ट्राचे ध्येय गाठण्यासाठी ईश्वरी बळाची आवश्यकता आहे आणि म्हणून साधनाविषयक मार्गदर्शन केले जाते. पुरोगामी आणि धर्मद्रोही यांना ‘सनातन प्रभात’ने उघड केले आहे.
सन्मान
सनातनच्या १२३व्या संत सौ. मनीषा पाठक यांचा सन्मान सौ. मधुरा शिंदे यांनी केला. वेदमूर्ती राजेंद्र आरेकर आणि रघुनाथ जोशी यांचा सन्मान श्री. विजय पवार यांनी केला. श्री. विद्याधर नारगोलकर यांचा सत्कार श्री. प्रमोद मुळे यांनी केला. श्री. नागेश जोशी यांचा सत्कार श्री. सुनील सप्रे यांनी केला. श्री चैतन्य तागडे यांचा सत्कार श्री. अविनाश गराडे यांनी केला.
सहकार्य
श्री. जयंत आणि सौ. स्वाती नातू यांनी ‘अश्वमेध सभागृह’ उपलब्ध करून दिले.