अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
मुंबई, १९ ऑगस्ट (वार्ता.) – समाजात सत्य विचार रुजवण्यासाठी शस्त्र नव्हे, तर लेखणी हेच प्रभावी शस्त्र आहे. वृत्तपत्रामध्ये असलेल्या सृष्ट (चांगल्या) विचारांमध्ये दुष्ट विचारांना नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. लेखणीच्या माध्यमातून मानवाच्या बुद्धीमध्ये चांगल्या विचारांचे रोपण करून ते अंत:करणामध्ये पाझरत जाईल, याची काळजी घ्यायची असते. ‘सनातन प्रभात’ मागील अडीच दशके हे उल्लेखनीय काम करत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी केले. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. माटुंगा येथील लक्ष्मीनारायण बाग सभागृहात आयोजित सोहळ्यात व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली अभय वर्तक उपस्थित होत्या.
शंखनाद आणि विघ्नहर्ता श्री गणेश, भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करून सोहळ्याला आरंभ झाला. शीव, मुंबई येथील श्री मुरलीधर मंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती श्री. श्रेयस लवाटेगुरुजी आणि ऋग्वेद गुरुकुल, वायंगणीचे वेदमूर्ती श्री. अभिजित चित्रे गुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी मान्यवर वक्तेही उपस्थित होते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वैशिष्ट्य विषद करणारी ध्वनीचित्रफीत या वेळी ‘प्रोजेक्टर’वर दाखवण्यात आली. सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम आणि सनातन संस्थेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी केले.
श्री. दुर्गेश परुळकर यांचे मार्गदर्शन !
१. महर्षि नारदमुनी हे जगातील पहिले वार्ताहर आहेत. तीनही लोकांमध्ये भ्रमण करून चांगल्या कार्याचे कौतुक करण्याचे आणि चुकीच्या घटनांची नोंद देवांपर्यंत पोचवण्याचे काम ते करत होते. ती ईश्वरी सत्ता होती. न्याय, नैतिकता आणि सत्य यांचे समाज अन् राष्ट्र यांच्यात आधिक्य असते, तेव्हा त्याला ‘ईश्वरी राज्य’ असे म्हणू शकतो. असे ‘ईश्वरी राज्य’ आणण्याचे कार्य नारदमुनींनी त्या काळात केले.
२. आधुनिक काळात ‘सनातन प्रभात’ने हे दायित्व स्वेच्छेने स्वीकारले आहे. साधारणपणे कोणतेही नियतकालिक हे चित्रपटांविषयीची माहिती, ललित लेख अशा विशिष्ट विषयांना वाहिलेले असते. त्यात करमणूक असते; मात्र ‘सनातन प्रभात’चे वार्तांकन वैशिष्ट्यपूर्ण असते. यामध्ये मनोरंजनाला प्राधान्य न देता शास्त्र, नैतिकता, धर्म, न्याय, राष्ट्रशिक्षण, सण-उत्सव यांविषयी प्रबोधन केले जाते.
…त्यामुळे सनातन प्रभातचा अभिमान वाटतो !
नारदमुनींची ‘कळलाव्या’ अशी अपकीर्ती करण्यात आली. चांगल्या लोकांचीच नेहमी अपकीर्ती केली जाते. शेतात पौष्टिक पिकाची लागवड करण्यासाठी प्रथम त्यातील तण काढावे लागतात. सृष्टांचा (चांगले) प्रसारप्रचार करण्यासाठी दुष्टांना विरोध करावा लागतो. अन्यायाला उत्तर देण्यासाठी सत्याचा प्रसार करावा लागतो. नारदमुनींनी सत्याचा प्रसार केला. त्यामुळे ‘सनातन प्रभात’चा अभिमान वाटतो. वृत्तपत्रातून हिंदु संस्कृतीचे शिक्षण देता येते, हे ‘सनातन प्रभात’ने दाखवून दिले. त्यामुळे सनातन प्रभात हे नारदमुनींचे वंशज आहे.
राष्ट्र-धर्माच्या पुनरुत्थानासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे, हा ‘सनातन प्रभात’चा केंद्रबिंदू ! – सौ. रूपाली वर्तक, उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’
‘सनातन प्रभात’ हे समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत आहे. हिंदूंच्या देवता, धर्म, धर्मग्रंथ, हिंदु धर्मीय, संत, राष्ट्रपुरुष आदींवर मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी हिंदूंवरील आघातही निधर्मी प्रसारमाध्यमांनी गेली अनेक वर्षे समोर येऊ दिले नाहीत. मणीपूरमधील दंग्याचे वृत्तांकन हे सध्याच्या काळातील याचे उत्तम उदाहरण आहे. लव्ह जिहादसारख्या गोष्टींचा अलीकडच्या काळात अतिरेक झाल्यावर आता कुठे माध्यमे ‘लव्ह जिहाद’ हा शब्द वापरू लागली आहेत. १८ वर्षांपूर्वी जेव्हा ‘लव्ह जिहाद’ हा शब्द लोकांना ठाऊक नव्हता, तेव्हाही ‘सनातन प्रभात’ने या विषयाचे गांभीर्य उदाहरणांसहित समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.
हिंदूंना धर्मशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात ‘सनातन प्रभात’चा मोलाचा वाटा आहे. आजपासून २५ वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा जणू अघोषित गुन्हा होता. अशा काळात ‘ईश्वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’, हे शब्द जर समाजात खर्या अर्थाने कुणी रूढ केले असतील, तर ते ‘सनातन प्रभात’ने ! सनातन प्रभातला अपेक्षित असे हिंदु राष्ट्र हे राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरील आहे. सनातन प्रभातला जीवनाचे, समाजाचे आणि अंतिमतः राष्ट्राचे आध्यात्मिकरण अपेक्षित आहे. समाज आणि राष्ट्र यांच्या प्रत्येक अंगाचे आदर्श व्यवस्थापन हिंदु राष्ट्रात अपेक्षित आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रत्येक अंगाचे संरक्षण अन् नंतर त्यांचे पुनरुत्थान करण्यासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे, हा ‘सनातन प्रभात’चा केंद्रबिंदू आहे.
उच्च कोटीच्या संतांनी नियतकालिक काढणे ही इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना !
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सनातन प्रभात’ मागील २५ वर्षे कार्यरत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांनी नियतकालिक काढणे आणि ते चालवणे ही जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना आहे. वाचकांकडून साधना करून घेणारे ‘सनातन प्रभात’ हे जगातील एकमेवाद्वितीय वृत्तपत्र आहे.
वाचकाला ‘धर्मबोध’ करून देण्यात ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
गेल्या काही वर्षांपासून देशभरात हिंदुत्वाचे वारे वहात असल्याचे चित्र आहे; पण जेव्हा ‘हिंदुत्वाचा पुरस्कार करणेही अपराध वाटावा’, अशी स्थिती होती, तेव्हा ‘सनातन प्रभात’ने निर्भिडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना प्रसिद्धी देऊन ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे विशेष योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिकाही ‘केसरी’प्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे.
‘साधना’ हा मानवी आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असून साधनेमुळे व्यक्तीमध्ये किती परिवर्तन होऊ शकते, याविषयीच्या अनुभूती ‘सनातन प्रभात’मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होतात. साधना म्हणजे काय, ती कृतीत आणण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, याविषयीचे जे लेख प्रसिद्ध होतात, तेही दिशादर्शक असतात. ‘हिंदु धर्म महान आहे’, असे नेहमी म्हटले जाते; पण या महानतेची प्रचीती स्वतः धर्माचरण किंवा साधना केल्याविना येऊ शकत नाही. त्यासाठी वाचकाला ‘धर्मबोध’ करून देण्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान अतुलनीय आहे.
राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी समर्पित होण्याचे विचार देणारे ‘सनातन प्रभात’ ! – प्रीतम नाचणकर, मुंबई (‘सनातन प्रभात’चे वार्ताहर)
मागील १३ वर्षांपासून सनातन प्रभात नियतकालिकांसाठी पूर्णवेळ वार्तांकन करणारे ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘सनातन प्रभात’मध्ये वृत्तांकनाची सेवा करण्यापूर्वी मी खासगी आस्थापनामध्ये नोकरी करत होतो. राष्ट्र-धर्म यांवरील आघात, देवतांच्या विडंबनाच्या घटना, सामाजिक समस्या यांविषयीच्या बातम्या ‘सनातन प्रभात’साठी पाठवत होतो. त्या वेळी नोकरी, करिअर, प्रपंच हे विचार मनात होते; मात्र खासगी आस्थापनात नोकरी करण्याऐवजी सर्वशक्तीमान ईश्वराची का करू नये ? असे मला वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या तेजस्वी विचारांमुळे राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पूर्णवेळ सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पूर्णवेळ वार्ताहर सेवा करण्याची संधी मिळाली. संकुचित विचारांतून बाहेर काढून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी समर्पित होण्याचे विचार देणारा हा ‘सनातन प्रभात’ आहे.
वंदनीय उपस्थितीसनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती या सोहळ्याला लाभली. विशेष उपस्थितीव्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. मेधा दुर्गेश परुळकर याही या वेळी उपस्थित होत्या. वैशिष्ट्यपूर्ण१. मागील २१ वर्षांपासून सनातन प्रभातच्या वर्गणीदारांना घरोघरी जाऊन अंक वितरण करणारे मुंबईतील वरळी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. अनिल म्हात्रे आणि मागील १८ वर्षांपासून सनातन प्रभातच्या वर्गणीदारांना नियमितपणे अंक वितरण करणारे नवी मुंबईतील ऐरोली येथील सनातनचे साधक श्री. समाधान साळुंखे यांचा श्री. दुर्गेश परूळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन केल्यामुळे आलेले अनुभव वाचक सर्वश्री अशोक दाभोलकर, जगदीश कुळकर्णी आणि सखदेव पाटील यांनी व्यक्त केले. सोहळ्याचे ‘सनातन प्रभात’च्या ‘यूट्यूब’ वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सोहळ्याचा समारोप ‘सर्वेपि सुखिनः सन्तु…’ या श्लोकाने करण्यात आला. |
वाचकांचे मनोगत
श्री. अशोक दाभोलकर, अंधेरी, मुंबई – सनातन प्रभातच्या माध्यमातून मी आणि माझी पत्नी सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेलो. साप्ताहिकातील मजकुराचा आरंभी नीट अर्थबोध होत नव्हता. साधनेला आरंभ केला, तेव्हा हळूहळू मजकूर लक्षात येऊ लागला आणि आनंद मिळू लागला. आम्ही इतरांनाही सनातन प्रभातविषयी सांगण्यास आरंभ केला. त्यामुळे आम्हाला अधिक आनंद मिळू लागला. केवळ आणि केवळ सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याच कृपेने हे नियतकालिक चालू असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अध्यात्मप्रसार होत आहे. ‘सनातन प्रभात’मुळेच आमचे जीवन यशस्वी झाले.
श्री. जगदीश कुलकर्णी, कल्याण – माझे वडील आणि सासरे यांच्यामुळे मी सनातन प्रभातशी जोडले गेलो. त्यातील साधनेची माहिती वाचून साधना समजली आणि पुढे माझी साधना चालू झाली. ‘सनातन प्रभात’मुळे हिंदु धर्मावरील आघात आणि राष्ट्रविरोधी घटना लक्षात आल्या. योग्य दृष्टीकोन ‘सनातन प्रभात’मधून मिळू लागले. राष्ट्र आणि धर्म यासाठी कार्य करू इच्छिणार्या प्रत्येक राष्ट्रभक्ताला योग्य दिशा ‘सनातन प्रभात’मधून मिळते.
श्री. सुखदेव पाटील, ऐरोली, नवी मुंबई – मी धार्मिक असल्याने मी सतत ‘भगवद्गीता’ समवेत ठेवतो. हा ग्रंथ जेव्हा वाचतो, तेव्हा ‘त्यातील वचनांचे पालन करणारे एकमेव नियतकालिक ‘सनातन प्रभात’ आहे’, असे सतत मला जाणवते. ‘सनातन प्रभात’मुळे आमच्या घरातील सर्वांची साधना चालू झाली आणि साधनेला गती मिळाली. सनातन प्रभातचे कार्यक्रम हे ईश्वरी कार्य आहे. या कार्यात अडथळे आले, तरी ते दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची निश्चिती होते. हे वर्तमानपत्र एखाद्या दिवशी घरी आले नाही, तर माझ्या मनाला रूखरुख लागते.
‘सनातन प्रभात’ला माहिती पाठवणे आता झाले अजून सोपे !राष्ट्र-धर्माच्या उत्थानासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिके गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. ‘सनातन प्रभात’ हे प्रत्येक हिंदूचे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळेच वाचक त्यांना दैनंदिन व्यवहारातील प्रशासन किंवा शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीही माहिती पाठवणे आता अजून सोपे झाले आहे. वाचक ही माहिती ‘सनातन प्रभात’ला आता व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारेही पाठवू शकतात. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक : ९१५२५ ६९३२५ |