गायनातील आठवा स्‍वर ‘सुगम स्‍वर’, यासंदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण

‘गायनात सात स्‍वर प्रचलित आहेत. मला देवाच्‍या कृपेमुळे सूक्ष्मातून गायनातील आठव्‍या स्‍वराचे सूक्ष्मातून ज्ञान मिळाले. ते आणि या विषयीचे विश्‍लेषण पुढे दिले आहे –

१. ‘सुगम स्‍वरा’चा अर्थ

‘सुगम नादा’प्रमाणे ‘सुगम स्‍वर’ असतात. यातील ‘सु’ म्‍हणजे ‘उत्तम’, ‘ग’, म्‍हणजे गायलेला आणि ‘म’ हा ‘तत्त्वांचा अनुभव’, या अर्थाने आहे. जेव्‍हा गायकाला स्‍वरांतील तत्त्वांचा अनुभव उत्तम रितीने होतो, तेव्‍हा त्‍याला ‘सुगम स्‍वर’, असे म्‍हणतात.

श्री. राम होनप

२. ‘सुगम स्‍वरा’चे स्‍थान

संगीतात सात स्‍वर प्रधान आहेत. ‘सुगम स्‍वर’ हा आठवा स्‍वर आहे. हे स्‍वर ‘अनुभूतीजन्‍य’ आहेत.

३. ‘सुगम स्‍वरा’चे आठवे स्‍थान असण्‍यामागील कारण

गायक सात स्‍वरांचा अभ्‍यास करतांना त्‍याला उपासनेची जोड देतो. त्‍याचे फळस्‍वरूप त्‍याला ‘सुगम स्‍वरा’ची अनुभूती येते. त्‍यामुळे त्‍याला आठवे स्‍थान दिले आहे.

४. ‘स्‍वर’ आणि ‘सुगम स्‍वर’, यांतील भेद

स्‍वरांमध्‍ये शब्‍द आणि त्‍याचे गायन आहे. ‘सुगम स्‍वरा’त ‘शब्‍द’ त्‍याचा ‘अर्थ’ आणि त्‍यातील ‘तत्त्वे’ यांचे ज्ञान गायकाला होते. हे ज्ञान होण्‍यासाठी गायकाला साधना करावी लागते.

५. प्राचीन ऋषींचे ‘सामगान’

हे ‘सुगम स्‍वरा’त असणे

‘सामगाना’मध्‍ये स्‍वर आहेत. ऋषींना त्‍या स्‍वरांचा अर्थही ठाऊक होता. त्‍या स्‍वरांत देवतांचे ‘रूप’, ‘गुण’ आणि ‘कार्य’ हे सुप्‍त स्‍वरूपांत दडलेले असते. त्‍या काळी ऋषींना त्‍या त्‍या स्‍वरांतील तत्त्वांची अनुभूती येत होती. ऋषींना गायनातील आठव्‍या स्‍वराचे ‘ज्ञान’ होते आणि त्‍यातून त्‍यांना अनुभूती येत होती. ‘स्‍वर’, ‘अर्थ’ आणि ‘तत्त्वे’ यांची एकाच वेळी अनुभूती, म्‍हणजे ‘सुगम स्‍वर’ होय.

६. गायकाच्‍या गायनातून ‘सुगम स्‍वरा’ची निर्मिती कधी होते ?

गायकाच्‍या ‘विशुद्ध’चक्राची शुद्धी झाल्‍यावर त्‍याच्‍या गायकीतून ‘सुगम स्‍वरा’ची निर्मिती होते.

श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०२३)

‘सुगम स्‍वरा’ विषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे प्राप्‍त झालेल्‍या ओव्‍या

‘सुगम स्‍वर’ आळवला । त्‍याने ब्रह्मरस चाखला ॥
जाणूनि स्‍वरांचे विज्ञान । अनुभवी ते ब्रह्मज्ञान ॥ १ ॥

स्‍वरांचे शास्‍त्र, आहे अगम । (टीप -१) ‘सुगम’ स्‍वर होई सत्‍वर उपासनेने ॥
शिवाचा तो महिमा । स्‍वरांचा तो अधिष्‍ठाता ॥ २ ॥

शिवस्‍पर्शाचा अनुभव । स्‍वरमार्गे ॥

कैलासीचा तो महाराणा । ‘स्‍वरांजय’ तो अनंता ॥

स्‍वरांचा अमृतरस । शिवकंठात विलसी ॥

उपासनेने होई विशुद्धाची शुद्धी । अंती अलौकिक स्‍वरांची निर्मिती ॥

सुगम स्‍वराचा जन्‍म । अनुभवयास येई ॥

सूक्ष्मत्‍वाचा अनुभव सत्‍वर येई ॥

टीप १ – बुद्धीपलीकडील

वरील ओव्‍यांचा अर्थ 

ज्‍या गायकाला ‘सुगम स्‍वरा’चे ज्ञान झाले. त्‍याला ‘ब्रह्मरसा’ची अनुभूती येते. गायकाने साधना करत स्‍वरांचे ‘विज्ञान’ जाणल्‍यास त्‍याला ब्रह्मज्ञानाचा अनुभव होतो. ‘स्‍वरांचे शास्‍त्र समजणे’, हे गायकाच्‍या बुद्धीपलीकडील आहे. त्‍याने साधना केल्‍यास त्‍याला दैवी अशा आठव्‍या स्‍वराचे, म्‍हणजे ‘सुगम स्‍वरा’चे ज्ञान होते.

भगवान शिवाचा महिमा अलौकिक आहे. तो स्‍वरांचा अधिष्‍ठाता आहे. गायकाला स्‍वरांद्वारे शिवस्‍पर्शाची, म्‍हणजे शिवतत्त्वाची अनुभूती घेता येते. शिव कैलासाचा महाराणा आहे. त्‍याने स्‍वरांना जिंकले आहे, म्‍हणजे तो ‘स्‍वरांजय’ असून ‘अनंत’ही आहे.

स्‍वरांमध्‍ये अमृतरस असून तो भगवान शिवाच्‍या कंठात आहे. गायकाने उपासना केल्‍याने त्‍याच्‍या विशुद्ध चक्राची शुद्धी होते आणि शेवटी त्‍याच्‍या गायनातून अलौकिक स्‍वरांची निर्मिती होते. त्‍यातून दैवी ‘सुगम स्‍वरा’चा जन्‍म होतो. त्‍याने गायकाला लवकरच सूक्ष्म अशा ईश्‍वराची अनुभूती येते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०२३)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक