मार्च २०२३ पासून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याचे स्थान डोक्यावर येणे, म्हणजे ते स्थान मेंदूशी, म्हणजे कृतींशी संबंधित असणे
१. एखाद्या अवयवामध्ये विकार (आजार) उत्पन्न होण्याचे मुख्य कारण, म्हणजे शरिराच्या चक्रांवर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण
‘नामजपादी उपाय करतांना शरिराची षड्चक्र आणि सहस्रार महत्त्वाची असतात. आपल्या अवयवांना कार्य करण्यासाठी जी ऊर्जा (प्राणशक्ती) पुरवली जाते, ती या षड्चक्र आणि सहस्रार यांच्या माध्यमातून; कारण आपले अवयव कुठल्या ना कुठल्या एका चक्राशी जोडलेले असतात. अवयवांना ऊर्जा मिळण्यामध्ये सातत्याने अडथळा निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये विकार (आजार) उत्पन्न होतात. मनुष्याला जे विकार होतात, त्याचे मुख्य कारण ‘आध्यात्मिक त्रास’ हे असते आणि विविध आध्यात्मिक त्रासांपैकी ‘वाईट शक्तींचा त्रास’ हे कारण मुख्यत्वे असते. वाईट शक्ती मनुष्याला त्रास देण्यासाठी एका किंवा काही चक्रांवर आक्रमण करून त्यांमध्ये त्रासदायक शक्ती (काळी शक्ती) साठवतात. त्यामुळे त्या चक्राशी किंवा चक्रांशी संबंधित अवयवांना प्राणशक्ती अल्प मिळून त्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणजेच त्या अवयवांमध्ये विकार उत्पन्न होतात.
२. अवयवामध्ये निर्माण झालेला विकार दूर करण्यासाठी हातांच्या बोटांची ‘मुद्रा’करून त्या मुद्रेने शरिरावर ‘न्यास’ आणि ‘नामजप’ करत चक्राला ऊर्जा पुरवून त्यातील त्रासदायक शक्ती दूर करावी लागणे
एखाद्या अवयवाला ऊर्जा मिळण्यामध्ये अडथळा आल्यामुळे त्याच्यामध्ये उत्पन्न झालेला विकार दूर करण्यासाठी त्या अवयवाशी संबंधित चक्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून, म्हणजेच त्या चक्राला ऊर्जा पुरवून त्यातील त्रासदायक शक्ती दूर करावी लागते. चक्राला ऊर्जा पुरवण्यासाठी पंचमहाभूतांपैकी योग्य त्या महाभूताशी हाताच्या संबंधित बोटांची ‘मुद्रा’ करून त्या चक्रावर ‘न्यास’ करावा लागतो, तसेच त्या पंचमहाभूताशी संबंधित ‘नामजप’ही करावा लागतो. अशा प्रकारे उपाय केल्यास अवयव पुन्हा चांगल्या प्रकारे कार्यरत होतात.
३. काळानुसार उपायांच्या वेळी न्यास करण्याच्या मुख्य स्थानामध्ये होत गेलेले पालट
३ अ. सूक्ष्म घडामोडी कळण्यासाठी आज्ञाचक्र महत्त्वाचे असल्याने साधकांच्या आज्ञाचक्रावर वाईट शक्ती मुख्यत्वे आक्रमण करत असणे : गेली काही वर्षे साधकांना उपाय शोधून देतांना असे लक्षात आले की, न्यास करण्याचे स्थान एक तर केवळ आज्ञाचक्र मिळते किंवा आज्ञाचक्र आणि त्याच्या जोडीला अन्य एक चक्र मिळते. अध्यात्म हे सूक्ष्म घडामोडींशी संबंधित आहे. ते कळण्यासाठी आज्ञाचक्र महत्त्वाचे असते. त्यामुळे वाईट शक्ती मुख्यत्वे साधकांच्या आज्ञाचक्रावर आक्रमण करतात.
३ आ. आपण डोळ्यांद्वारे सर्व जग पहात असल्याने त्यांद्वारे चांगली किंवा वाईट शक्ती सहजतेने शरिरात ग्रहण होणे; म्हणून आज्ञाचक्रावर उपाय करण्यापेक्षा डोळ्यांवर उपाय करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे एक वर्षापूर्वी लक्षात येणे : एक वर्षापूर्वी माझ्या असे लक्षात आले की, आज्ञाचक्रावर उपाय करण्यापेक्षा डोळ्यांवर उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे; कारण आपण डोळ्यांद्वारे सर्व जग पहात असल्याने त्यांद्वारे चांगली किंवा वाईट शक्ती सहजतेने आपल्या शरिरात ग्रहण होते. डोळे हे तेजतत्त्वाशी संबंधित असतात. तसेच असेही लक्षात आले की, आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना कुंडलिनीचक्रांमधील त्रासदायक शक्ती दूर केली, तरी डोळ्यांमध्ये त्रासदायक शक्ती शिल्लक रहातेच. त्यामुळे शेवटी डोळ्यांवर उपाय केले की, शरिरातील त्रासदायक शक्ती पूर्णपणे दूर होते.
३ इ. मार्च २०२३ पासून उपायांचे मुख्य स्थान ‘डोक्याची डावी बाजू’ हे येत असणे; कारण वाईट शक्तींनी साधकांच्या कृतींवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर आक्रमण करणे चालू केलेले असणे : मार्च २०२३ पासून उपाय शोधतांना असे लक्षात आले की, उपायांचे मुख्य स्थान ‘आज्ञाचक्र’ किंवा ‘डोळे’ नाही, तर ‘डोक्याची डावी बाजू’ आहे आणि तेथे उपाय केले, तर ते जास्त परिणामकारक होत आहेत. डोक्याचा भाग हा मेंदूशी संबंधित असतो. मेंदू हा आपल्या कृतींचे नियमन करतो. त्यामुळे वाईट शक्ती साधकाच्या मेंदूवर आक्रमण करून त्याच्या कृतींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच गेली २ दशके वाईट शक्ती साधकांवर अधिकतर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्या; पण आता साधकांची साधना वाढल्याने त्या हरत आहेत. त्यांची शक्ती अल्प होऊ लागल्याने त्या आता साधकांना शारीरिक त्रास देऊ लागल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे वाईट शक्तींनी साधकांच्या कृतींवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर आक्रमण करणे.
अशा प्रकारे वाईट शक्तींनी काळानुसार साधकांवर आक्रमण करण्यामध्ये कितीही पालट केले, तरी गुरुकृपेने योग्य ते उपाय मिळत आहेत. त्यामुळे वाईट शक्तींवर मात करता येत आहे. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.५.२०२३)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |