प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड यांना पोलिसांनी केली अटक
नीलिमा चव्हाण यांचे मृत्यू प्रकरण
चिपळूण – तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी त्या काम करत असलेल्या बॅंकेतील प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) संग्राम गायकवाड यांना नीलिमा यांच्यावर कामाचा दबाव आणल्याचा गुन्हा नोंद करून अटक केली आहे. २९ जुलै या दिवशी बेपत्ता झाल्यानंतर १ ऑगस्ट २०२३ या दिवशी दाभोळच्या खाडीत नीलिमा चव्हाण यांचा मृतदेह आढळला होता.
आजवर पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात नीलिमा यांच्या व्हिसेरा अहवालामध्ये कोणत्याही प्रकारचे वीष दिसून आलेले नाही, तसेच मृत्यूचे अंतिम कारण हे बुडल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अन्वेषणात पोलीस यंत्रणेला अद्यापही संशयास्पद काही आढळून आलेले नाही.
चिपळूण : निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणात दापोली बँकेतील प्रोजेक्ट मॅनेजरला अटक https://t.co/QooxOAwnuo #chiplun #dapoli #kokan #konkan #ratnagiri #nilimachavan
— KokanKattaLive (@kokankattaLive) August 18, 2023
नीलिमा यांचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी केलेल्या फिर्यादीनुसार प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ कोल्हापूर) हा नीलिमा हिला ऑफिसमध्ये तिच्या कामाविषयी १५ दिवसांचे लक्ष्य (टार्गेट) पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असतांनाही फोन करत असे. स्वत:च्या मुलीस दिवसाला ४-५ ‘डी-मॅट’ खाती उघडण्यासाठी जाणूनबुजून दबाव आणत होता. नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करूनही तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याविषयी धमकी दिली होती आणि यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती. या फिर्यादीनंतर पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली आहे.