शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना
५०० वर्षांनंतर मूळ जागी मूर्तीची स्थापना केल्याचा करणी सेनेचा दावा !
पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत चॅपेलसमोर (छोट्या चर्चसमोर) करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.
शंखवाळ (सांकवाळ) येथे पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी हे मंदिर पाडले. सध्या तेथे केवळ मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे. पोर्तुगिजांनी या भूमीच्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावचे प्रवेशद्वार) असे नामकरण केले. मंदिराच्या ठिकाणी वडाचे झाड होते, तसेच या ठिकाणी भूमीच्या उत्खननाच्या वेळी मंदिराचे दगड आणि श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती सापडली होती. हल्लीच या परिसरातील नदीच्या काठी श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती सापडली होती. वर्ष १९८३ मध्ये गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याने सर्व्हे क्रमांक २६६/२ मध्ये असलेले हे स्थळ ‘वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले. यानंतर चर्च संस्थेने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला. या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत चॅपेलसमोर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. समस्त हिंदूंनी या ठिकाणी भेट घेऊन देवीचे दर्शन घ्यावे आणि या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन देवीच्या भक्तांनी केले.
(सौजन्य : In Goa 24×7)
मूळ ठिकाणी श्री विजयादुर्गादेवीची स्थापना करणार्यांचे हार्दिक अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’
मूळ ठिकाणी श्री विजयादुर्गादेवीची स्थापना केल्याने मी करणी सेना आणि भक्तगण यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भक्तांच्या चिकाटीमुळे हे होऊ शकले.
ही जागा हडपण्यासाठी चर्च संस्थेने बेकायदेशीरपणे उभारलेले कपेल( चॅपेल). ! भक्तगणांचे हार्दिक अभिनंदन! श्रीविजयादूर्गा( फोंडा-केरीला स्थलांतरित) देवस्थान भक्तगणांचा पाठिंबा श्रीक्षेत्र शंखवाळ ला मिळेलच! पुन्हा एकदा शंखवाळच्या श्रीविजयादूर्गा भक्त गणांच्या चिकाटीला मानवंदना! pic.twitter.com/t8FIM9G0vP
— Subhash Velingkar (@SBVelingkar) August 18, 2023
ही जागा अनधिकृतपणे चर्च संस्था बळकावू पहात आहे. देवीच्या सर्व भक्तांचा या उपक्रमाला पाठिंबा मिळणार आहे. देवीचे सर्वांनी दर्शन घेतले पाहिजे, असे आवाहन ‘भारत माता की जय’ संघटनेचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.