स्मृतीभ्रंश होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांना न विसरलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !
वर्ष २०१४ मध्ये ठाणे येथील साधिका सौ. नम्रता ठाकूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांना ‘लिम्फोमा कॅन्सर’ झाला होता. त्यावर त्यांनी ‘किमोथेरपी’ (कर्करोगावरील औषधप्रणाली) घेऊन मात केली होती. आता वर्ष २०२३ मध्ये त्या रुग्णाईत झाल्यावर त्यांचा ‘एम्.आर्.आय.’ (टीप) केल्यावर त्याच कर्करोगाचा प्रसार (‘सेकंडरीज’ (secondaries)) त्यांच्या मेंदूमध्ये झाल्याचे लक्षात आले. या कर्करोगाच्या पेशी मेंदूत पसरतात, तेव्हा सर्वसाधारणपणे त्या रुग्णाला ‘स्मृतीभ्रंश होणे, अर्धांगवायू होणे, सतत अस्वस्थ वाटणे, अस्थिर होणे, प्रचंड वेदना होणे, उलट्या आणि सतत चिडचिड होणे’, असे त्रास होतात. रुग्ण व्यक्ती काही वेळा प्रचंड प्रमाणात आरडाओरडा किंवा वस्तूंची फेकाफेकी करते. त्यामुळे घरचे लोक आणि नातेवाईक यांनाही पुष्कळ मानसिक ताण येतो. रुग्णाच्या मेंदूतील ज्या अवयवाच्या पेशी कर्करोगाने बाधित झाल्या असतील, त्यानुसार रुग्णाला ‘दृष्टी जाणे, चेहर्याच्या स्नायूंना अर्धांगवायू (पॅरालाईज) होणे, ऐकू न येणे’, असे परिणाम भोगावे लागतात; मात्र गुरुकृपेने सौ. ठाकूर यांच्यावर असे कुठलेही परिणाम दिसून आले नाहीत. या लेखामध्ये सौ. ठाकूर यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
टीप : ‘एम्.आर्.आय.’ (Magnetic Resonance Imaging) हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.
‘देवाला आर्ततेने हाक मारल्यावर देव धावून येतो’, याची प्रचीती येणे‘१.८.२०२३ या दिवशी सौ. नम्रता सद़्गुरु अनुताईंना पुष्कळ आर्ततेने हाका मारत होती. ‘त्या माझी आई आहेत’, असे म्हणत त्यांना बोलावत होती. प्रत्यक्षात तेव्हा सद़्गुरु अनुताई एका शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथे गेल्या होत्या आणि ५.८.२०२३ या दिवशी त्या परत येणार होत्या; पण २.८.२०२३ या दिवशीच त्या परत आल्या आणि लगेचच नम्रताला भेटायला आल्या. सद़्गुरु अनुताईंना पाहून नम्रताला पुष्कळ आनंद झाला. अनुताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर ती शांत झोपली. तेव्हा ‘ती ध्यानात आहे’, असे मला वाटले. हा घटनाक्रम आणि हे दृश्य बघून माझी सून सौ. अनन्या मला म्हणाली, ‘‘हाक मारल्यावर देव त्वरित धावून येतो’, हे मी वाचले आणि ऐकले होते; पण आज हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले. सासूबाईंनी सद़्गुरु अनुताईंना आर्ततेने हाक मारल्यावर त्या लगेचच धावत आल्या !’’ – श्री. नंदकिशोर ठाकूर, नौपाडा, ठाणे. (११.८.२०२३) |
१. श्री. नंदकिशोर ठाकूर, नौपाडा, ठाणे.
(सौ. नम्रता ठाकूर यांचे यजमान, वय ६५ वर्षे)
१ अ. सौ. नम्रताच्या मेंदूत कर्करोगाची गाठ असल्याचे निदान होणे
१ अ १. सौ. नम्रताची प्रकृती बिघडणे आणि ‘तिला स्मृतीभ्रंश झाला आहे’, असे लक्षात येणे : ‘२४.६.२०२३ या दिवशी सौ. नम्रताला बारीक ताप आला होता. तिचे अन्न खाणे हळूहळू अल्प झाले होते आणि तिला सारखे ‘उलटी होत आहे’, असे वाटत होते; म्हणून आम्ही आमच्या कौटुंबिक आधुनिक वैद्यांकडून (फॅमिली डॉक्टरांकडून) तिच्यासाठी औषध आणले. नंतर काही तपासण्या केल्यावर त्यांनी औषध पालटून दिले; पण तरीही काहीच पालट झाला नाही; म्हणून आम्ही तिला रुग्णालयात भरती केले. ५ दिवस रुग्णालयात राहूनही तिच्या शारीरिक स्थितीत काहीच पालट झाला नाही. ३.७.२०२३ या दिवशी आम्ही तिला रुग्णालयातून घरी आणले. तेव्हा ‘तिला स्मृतीभ्रंश झाला आहे’, असे आमच्या लक्षात आले.
१ अ २. सद़्गुरु अनुताईंनी सांगितल्यानुसार कौटुंबिक आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन सौ. नम्रताला ‘न्यूरॉलॉजिस्ट’ना दाखवणेे, त्यानंतर तिचा ‘एम्.आर्.आय.’ काढल्यावर ‘तिच्या मेंदूत कर्करोगाची गाठ झाली आहे’, हे समजणे : मी सद़्गुरु अनुताईंना (सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांना) नम्रताच्या या स्थितीविषयी सांगितले. सद़्गुरु अनुताईंनी आम्हाला काही दिवस होमिओपॅथी औषधे घेऊन बघण्यास सांगितले आणि त्यासाठी आधुनिक वैद्या अंजली पाटील किंवा आयुर्वेदीय वैद्य उदय धुरी यांच्याशी बोलून घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही नम्रताला होमिओपॅथी औषध चालू केले. नम्रताला पुष्कळ थकवा होता आणि तिला अन्न अजिबात जात नव्हते. ते समजल्यावर आधुनिक वैद्या अंजली पाटील आमच्या घरी आल्या. त्यांनी नम्रताचे सर्व अहवाल पाहिले आणि आम्हाला आमच्या कौटुंबिक आधुनिक वैद्या दर्शना यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊन नम्रताला मज्जासंस्थेच्या विकारांवरील तज्ञांना (‘न्यूरोलॉजिस्ट’ना) दाखवले. तिचा ‘एम्.आर्.आय.’ काढला. तेव्हा ‘सौ. नम्रताच्या मेंदूमध्ये कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान झाले. २०.७.२०२३ या दिवशी आम्ही तिला पुन्हा रुग्णालयात भरती केले; पण ती उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे तिला घरी घेऊन आलो.
१ अ ३. आध्यात्मिक उपायांमुळे विस्मरण आणि शारीरिक त्रास अल्प होणे : घरी आणल्यावर ती आनंदी दिसू लागली. ती सतत प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद़्गुरु अनुताई यांचा धावा करत होती. सद़्गुरु अनुताईंकडून आम्हाला आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे नामजप येत होते. ते आम्ही सर्व जण करत होतो. काही साधकही नम्रतासाठी नामजप करत होते. त्याचा परिणाम, म्हणजे चमत्कार झाल्याप्रमाणे ‘हळूहळू नम्रताचे विस्मरण न्यून होत आहे’, असे आमच्या लक्षात आले. अनेक आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘अशा रुग्णाचे डोके प्रचंड दुखते’’; परंतु गुरुकृपेने नम्रताचे डोके जराही दुखत नव्हते.
१ अ ४. तिला अन्न देण्यासाठी १.८.२०२३ या दिवशी नळी लावली.
१ आ. सौ. नम्रताचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण !
१ आ १. रुग्णाईत असतांनाही इतरांचा विचार करणे : वर्ष २०१४ मध्ये नम्रताचे पोट बिघडले होते. त्याही स्थितीत ती स्वतःच ‘मॉप’ने सर्व साफसफाई करत असे. अंगात त्राण नसतांनाही ती स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करायची. आताही ती नैसर्गिक विधीसाठी स्वतःच भांडे घेण्याचा प्रयत्न करते. तिच्या प्रत्येक कृतीतून ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, हे मला शिकायला मिळाले.
१ आ २. अहं अल्प असणे : एकदा आम्ही दोघे रामनाथी (गोवा) आश्रमात गेलो होतो. तेव्हा श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन होण्याआधी आम्हा उभयतांमध्ये बोलणे झाले. ती मला म्हणाली, ‘‘तुम्हाला सूक्ष्मातील कळते; पण मला काही कळत नाही.’’ प्रत्यक्ष सत्संगामध्ये श्री गुरूंनी सूक्ष्मातील सर्व प्रयोग घेतले. नम्रता त्याची पटापट उत्तरे देत होती आणि मला काहीच कळत नव्हते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्री गुरूंची कृपा असल्याविना काही कळत नाही.’ त्यामुळे ‘मला सूक्ष्मातील कळते’, हा माझा अहं न्यून झाला. गुरुकृपेने नम्रताला सूक्ष्मातील कळायला लागल्यावरही तिने ते कधीच जाणवू दिले नाही. ‘आता रुग्णाईत असतांना स्मृतीभ्रंश होऊनही तिला सूक्ष्मातील कळत आहे’, हे माझ्या लक्षात आले. याचा अर्थ ‘ती कधीही दुसर्याला ‘आपल्याला कळते’, हे दाखवत नव्हती. ‘तिच्यात थोडाही अहं नाही’, याची मला जाणीव झाली.
१ आ ३. स्मृतीभ्रंश झाला असतांनाही अंतरातून साधना चालू असणे : कुणाचेही काही पैसे देणे बाकी असेल, तर ती मला ते लगेच देण्यास सांगत असे. त्यातून ‘कुणाशीही देवाण-घेवाण हिशोब रहायला नको’, असा तिचा प्रयत्न असायचा. रुग्णाईत असतांना तिला काही कळत नसूनही ती कुणाचे पैसे द्यायचे राहिले असतील, तर ते देण्याची मला आठवण करून देते. त्यातून तिच्या अंतरंगात साधना मुरली असून ‘स्मृतीभ्रंश झाला असतांनाही ती अंतरातून साधना करत आहे’, याची मला जाणीव झाली.
१ आ ४. कृतज्ञताभाव !
अ. आमची नात कु. अनिशाने (वय ४ वर्षे) तिच्या उशाशी २ खेळणी ठेवली होती. रात्री ती खेळणी बघितल्यावर नम्रता म्हणाली, ‘‘अनिषाने माझ्या रक्षणासाठी ही खेळणी ठेवली आहेत.’’
आ. एकदा तिने आम्हा सर्वांना जवळ बोलावून हात जोडायला सांगून आमच्याकडून प्रार्थना करून घेतली. नंतर तिने ‘तुम्ही सर्व जण माझी पुष्कळ चांगली सेवा करत आहात’, यासाठी कृतज्ञता !’,
असे म्हणून आम्हा कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
१ आ ५. भाव
अ. नम्रताने ‘माझा ग्रंथ द्या’, असे सांगितल्यावर तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दिला. नम्रताने त्यातील परम पूज्य आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे लगेच ओळखली.
आ. ती ‘सद़्गुरु अनुताई आणि परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्यासाठी औषध घेऊन येणार आहेत’, असे सतत म्हणत होती.
इ. दैनिक ‘सनातन प्रभात’ जवळ घेतल्यावर तिला त्यातून ‘परम पूज्यांचा स्पर्श जाणवून तिला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवत होते.
१ इ. शिकायला मिळालेली सूत्रे
१ इ १. ‘साधनेतील प्रत्यक्ष कृती कशी करायची ?’, ते शिकता येणे : प्रथम माझी स्थिती बहिर्मुख होती. ‘दुसरा कसा आहे ?’, ‘त्याचा हेतू कसा आहे ?’, आणि ‘तो कसा वागतो ?’, असे मी इतरांचे स्वभावदोष पहात असे. नम्रताकडून मला ‘मी अंतर्मुख व्हायला पाहिजे’, हे शिकता आले. नंतर मी माझे स्वभावदोष आणि त्यामुळे होणार्या चुका पहायला लागलो. तेव्हा नम्रताने मला सांगितले, ‘‘नुसते अंतर्मुख होऊन चालणार नाही. ‘स्वतःमध्ये पालट होत आहे किंवा एखादा स्वभावदोष न्यून होत आहे ना ?’, तेही पाहिले पाहिजे. त्याच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी गुरुचरणी पूर्ण शरणागतभाव निर्माण व्हायला हवा. ‘सर्वकाही गुरुदेवच करून घेत आहेत’, असा भाव निर्माण व्हायला हवा.’’ तिच्या वागण्यातून-बोलण्यातून आणि तिच्या कृतीतून मला ते शिकता आले.
१ इ २. साधकाला चुकीची खंत वाटल्यावर चुकीसाठी योग्य स्वयंसूचना बनवून देणे : माझे काही चुकले असल्यास ती माझी चूक सांगायची; पण चूक सांगून गप्प बसायची. काही वेळाने माझे चिंतन झाल्यावर मी त्या चुकीवर स्वयंसूचना (टीप) लिहून तिला दाखवून ‘ती बरोबर आहे का ?’, असे विचारत असे. तेव्हा ती मला योग्य सूचना लिहून देत असे. एकदा मी तिला म्हणालो, ‘‘मी विचारल्यावरच तू मला सांगतेस.’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘तुम्हाला तुमच्या चुकीची खंत वाटल्यावर तुम्ही असे विचारता; म्हणून मी सांगते.’’
यावरून ‘समोरच्याला चुका केव्हा आणि कधी सांगायच्या’, हेही तिला कळत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
टीप : स्वतःकडून चूक झाल्यावर ‘तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी अंतर्मनाला दिलेली सूचना.
१ इ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा आणि भक्ती यांमुळे कुठल्याही प्रसंगात स्थिर असणे : ‘कुठलाही प्रसंग असो किंवा कुठलीही घटना असो, सर्व प्रसंगांत ती स्थिर असते. मी तिला विचारले, ‘‘तू इतकी स्थिर कशी रहातेस ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘गुरुदेव काळजी घेणार आहेत’, याची मला निश्चिती असते.’’ तिच्या बोलण्यात मला तिची श्री गुरूंवरील दृढ श्रद्धा आणि भक्ती जाणवत होती.
‘हे गुरुदेव, मला तिच्याकडून पदोपदी अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. ती माझ्या समवेत राहून मला अध्यात्म जगायला शिकवत आहे. ‘आपण माझ्या जीवनात अशी साधिका पत्नी म्हणून दिलीत’, यासाठी तिच्या आणि आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. कु. मयुरी नंदकिशोर ठाकूर, नौपाडा, ठाणे. (सौ. नम्रता ठाकूर यांची लहान मुलगी)
२ अ. स्मृतीभ्रंश झालेला असतांना सर्व बोलणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी असणे : ‘आईला स्मृतीभ्रंश झाला होता. एक दिवस ती म्हणाली, ‘‘चला, सिद्धतेला लागा, परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आले आहेत, बाबांना इस्त्री केलेला सदरा घालायला सांग, पूजेचे ताट सिद्ध कर, त्यात हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले ठेव, हार कर, अनन्याला (सुनेला) नैवेद्याचे ताट सिद्ध करायला सांग, त्यांना उशीर होत आहे, लवकर करा.’’ तेव्हा जणू ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तिला प्रत्यक्ष भेटायला आले आहेत’, असे तिच्या बोलण्यातून जाणवत होते आणि ती त्याप्रमाणे ती आम्हाला सूचना देत होती. तिची परम पूज्यांवरील भक्ती पाहून आम्हालाही आनंद होत होता. ‘अशी आई आम्हाला मिळाली’, यासाठी श्री गुरुचरणी कृतज्ञता !’
३. श्री. अंकुर नंदकिशोर ठाकूर, ठाणे (सौ. नम्रता ठाकूर यांचा मुलगा)
३ अ. गंभीर रुग्णाईत असतांनाही अंतरातून साधना चालू असणे : ‘एकदा आईला मी उठवून दिवाणावर बसवले आणि ‘तिचा मागे तोल जाऊ नये’, यासाठी तिच्या पाठीला माझी पाठ लावून बसलो. तेव्हा मला तिच्या पाठीत काहीतरी वेगळी शक्ती जाणवली. एक दिवस घरातील आम्ही सर्व जण तिच्या जवळ असतांना तिने हात जोडले आणि आमच्याकडून प्रार्थना करून घेतली. ती प्रार्थना म्हणत होती आणि आम्ही सर्व जण तिच्या मागून म्हणत होतो. प्रार्थना झाल्यावर तिने कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर एक दिवस आम्ही सर्व जण तिच्या जवळ असतांना अकस्मात् तिने आमच्याकडून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असा जयघोष करून घेतला. यातून ‘ती गंभीर रुग्णाईत असतांनाही तिची अंतरातून साधनाच चालू आहे’, असे आम्हाला जाणवले आणि कृतज्ञता व्यक्त झाली.’
४. सौ. अनन्या अंकुर ठाकूर, नौपाडा, ठाणे. (सौ. नम्रता ठाकूर यांची सून)
४ अ. प्रेमळ, इतरांचा विचार करणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या सासूबाई ! :‘माझे लग्न होऊन मी या घरात आले, तेव्हापासूनच आईंनी (सासूबाईंनी) मला ‘सून’ म्हणून कधीच वागवले नाही. त्या मला त्यांची मुलगीच मानायच्या. त्यांनी त्यांची मते माझ्यावर कधीच लादली नाहीत. त्या रुग्णाईत असतांनाही सेवा करायच्या. साधकांना नामजपादी उपाय सांगायच्या. ‘माझ्यामुळे कधी कुणाला त्रास होऊ नये’, असे त्यांना नेहमीच वाटतेे. त्यामुळे रुग्णाईत असतांनाही त्या स्वतःची कामे स्वतःच करायच्या. स्मृतीभ्रंश होऊनही त्या कधीही प.पू. गुरुदेव, सद़्गुरु अनुताई आणि त्यांची सेवा विसरल्या नाहीत. त्यांची श्री गुरूंवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) अढळ श्रद्धा आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनाक ११.८.२०२३)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानामुळे रुग्णाईत स्थितीतही शांत आणि स्थिर असलेल्या सौ. नम्रता ठाकूर !
१. अखंड ईश्वराच्या अनुसंधान असणे
‘१९.७.२०२३ या दिवशी मी सौ. ठाकूरवहिनींना (सौ. नम्रता ठाकूर यांना) भेटायला गेले होते. तेव्हा त्या शांत आणि स्थिर होत्या. त्यांच्यावर कर्करोगाचे कुठलेेही दडपण नव्हते. ‘त्या आनंदी असून ईश्वराच्या अखंड अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ‘माझाही आतून नामजप चालू आहे’, असे मला जाणवले. त्या सतत परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), ब्रह्मोत्सव, साधक यांविषयीच बोलत होत्या. नम्रतावहिनींचा गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) असलेला भाव बघून माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यांनी ‘वैयक्तिक मायेचे पाश तोडले आहेत. ही केवळ गुरुदेवांची अपार कृपा आणि प्रीती आहे’, असे मला जाणवले.
२. गंभीर रुग्णाईत असतांनाही गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर आनंदी आणि स्थिर असणे
माझ्या ४० वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत मी अनेक दीर्घ दुखणे झालेले रुग्ण बघितले; पण सौ. ठाकूरवहिनींसारखा या गंभीर परिस्थितीचा स्वीकार करून गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भाव यांच्या बळावर आनंदी अन् स्थिर असलेला रुग्ण पाहिला नाही.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अंजली पाटील, कळवा, जिल्हा ठाणे.