नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणार्या दूषित, रक्तमिश्रीत पाण्याविषयी ठोस कारवाई करावी ! – नागरिकांची मागणी
आज मोर्चा काढून उपोषण करण्याची नागरिकांची चेतावणी !
नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणारे दूषित आणि रक्तमिश्रीत पाण्याविषयी योग्य ती कारवाई करावी म्हणून ४ ऑगस्ट, तसेच त्यापूर्वी अनेक वेळा नागरिकांनी वेळावेळी अर्ज आणि निवेदने दिलेली आहेत; परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. श्रावण मासात हिंदु धर्मीय प्रवरा नदीचे पाणी अंघोळीसाठी, तसेच देवपूजेसाठी वापरतात. प्रवरा नदीचे पाणी हे बहिरवाडी, देवगड, टोका प्रवरासंगम या तीर्थस्थळांना मिळत असून या ठिकाणचे नागरिकही हेच पाणी पूजेसाठी वापरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नकळतपणे धर्म भ्रष्ट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे १९ ऑगस्ट या दिवशी आम्ही हिंदु धर्मीय दूषित पाणी, तसेच इतर समस्या यांकरता मोर्चा काढून उपोषण करणार आहोत, अशा माहितीचे निवेदन येथील नागरिकांच्या वतीने नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक, तसेच तहसीलदार यांना देण्यात आली. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? – संपादक)
प्रवरा नदीच्या स्वच्छतेसह, थोर स्वातंत्र्यसैनिक यांची कोनशिला मोहिते चौकात म्हणजेच तिरंगा चौकात मोठा उपक्रम घेऊन लावण्यात यावी. यासह इतर काही प्रश्नांवर मोर्चा काढून उपोषण करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.