धावडशी (जिल्हा सातारा) येथे श्री ब्रह्मेंद्र स्वामी पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ !
सातारा, १८ ऑगस्ट (वार्ता.) – श्रीक्षेत्र धावडशी येथील ‘श्री देव भार्गवराम देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांचा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २६ ऑगस्ट या कालावधीत होत आहे. श्रावण शुक्ल प्रतिपदा ते श्रावण शुक्ल नवमी या कालावधीत या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. विलास बुवा गरवारे, ह.भ.प. संदीप मांडके, ह.भ.प. सौ. रोहिणी परांजपे, ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे, ह.भ.प. सौ. स्मिता आजेगावकर, ह.भ.प. भास्कर बुवा काणे यांचा समावेश आहे. तरी श्रीक्षेत्र धावडशी आणि पंचक्रोशीतील समस्त भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.