श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना आरंभ !
सोलापूर – येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्सव समिती यांच्या वतीने १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवारी ज्या भाविकांना प्रत्यक्ष श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेता येणार नाही, अशा भक्तांसाठी प्रत्येक सोमवारी ‘डिजिटल स्क्रिन’द्वारे श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाची सोय केलेली आहे.
श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होत असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांतून अनेक भक्त दर्शनासाठी प्रतिवर्षी येतात. या सर्व भक्तांच्या निवासाची, तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी दैनंदिन स्वच्छतेपासून वाहनतळापर्यंतचे योग्य नियोजन श्रावणमास समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. चारही श्रावण सोमवारी योगसमाधीवर अत्यंत नयनरम्य फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ही सजावट अनुक्रमे सोमनाथ केंगनाळकर, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, शिवानंद कोनापुरे आणि भारत तेलसंग यांच्याकडून केली जाणार आहे.