‘नाटो’ देशांनी बेलारूसवर आक्रमण केले, तर अणूबाँबने प्रत्युत्तर देऊ !
बेलारूसचे राष्ट्रपती अॅलेक्झँडर लुकाशेंको यांची धमकी !
वॉर्सा (पोलंड) – जर आमच्या देशावर कुणी आक्रमण केले, तर आम्ही अणूबाँबचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी धमकी बेलारूसचे राष्ट्रपती अॅलेक्झँडर लुकाशेंको यांनी ‘नाटो’ देशांना दिली आहे. बेलारूसची सरकारी वृत्तसंस्था ‘बेल्टा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणि पोलंडशी असलेला तणाव, या पार्श्वभूमीवर लुकाशेंको यांनी ही धमकी दिली आहे. लुकाशेंको हे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे जवळचे मित्र आहेत. रशियाने बेलारूसमध्ये काही अणूबाँब ठेवले आहेत. ‘जर बेलारूसने नाटो देशांवर अणूबाँबद्वारे आक्रमण केले, तर तिसरे महायुद्ध चालू होईल’, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Belarus President Alexander Lukashenko says he could use nukes in the event of “aggression” from nearby NATO members like Poland, Latvia and Lithuania. https://t.co/Mycsnec0sg
— The Washington Times (@WashTimes) August 18, 2023
१. लुकाशेंको पुढे म्हणाले की, जर युक्रेनने आमच्यावर आक्रमण केले नाही, तर आम्ही या युद्धात सहभागी होणार नाही; मात्र रशिया आमचा मित्र देश असल्याने आम्ही त्याला सतत साहाय्य करत राहू.
२. ‘नाटो’चे सदस्य देश असलेले पोलंड, लिथुआनिया आणि लाटविया यांनी आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला योग्य प्रत्युत्तर देऊ. यात अणूबाँबचाही समावेश आहे. आम्ही अणूबाँब कुणाला घाबरवण्यासाठी आणलेले नाहीत. आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही शांत बसणार नाही आणि वाटही पहाणार नाही. आमच्या संरक्षणासाठी आमच्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करू.