एटा (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयात कपाळावर टिळा लावण्यास प्राचार्यांनी विरोध केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
प्राचार्यांनी आरोप फेटाळला !
एटा (उत्तरप्रदेश) – येथील रामपूरमधील आर्.बी.एल्. इंटर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पूजा करणे, कपाळावर टिळा लावणे आणि मनगटावर लाल दोरा बांधणे याला प्राचार्य आणि एक शिक्षक यांनी विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी शाळेत जाऊन याविषयी जाब विचारला. याची माहिती पोलिसांनी मिळताच ते शाळेत पोचले. या वेळी प्राचार्य शाळेत उपस्थित नव्हते. पालकांनी पोलिसांसमोर आरोप केला, ‘शाळेमध्ये जातीच्या आधारे विरोध केला जात आहे.’ पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून आम्ही चौकशी करत आहोत. जर कुणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
या प्रकरणाविषयी प्राचार्य मनोज कुमार यांनी आरोप केला की, शाळेला अपकीर्त करण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचण्यात आले आहे. मी सुटीवर होतो. माझ्या अनुपस्थितीत येथे निदर्शने करण्यात आली. मी स्वतः मनगटावर लाल दोरा बांधतो आणि कपाळावर टिळा लावतो, तसेच विद्यार्थ्यांनाही धार्मिक कृती करण्यास सांगतो. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप निराधार आहे.