शिवप्रेमींच्या वतीने गोवा राज्यभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ !
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण
म्हापसा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे.
करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली, त्या ठिकाणी शिवप्रेमींनी त्याच दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा बसवला. या नवीन पुतळ्याला १४ ऑगस्ट या दिवशी दुग्ध-जलाभिषेक घालून या अभियानाला प्रारंभ झालेला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे. फर्मागुडी येथील कार्यक्रमाला ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमामुळे आज आमची मंदिरे आणि धर्मपरंपरा टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि यामुळेच छत्रपती शिवरायांचा सन्मान झाला पाहिजे. या उद्देशाने ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवले जात असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे.
कोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक : कार्यक्रमाला आमदार प्रवीण आर्लेकर यांची उपस्थिती
कोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शिवप्रेमींनी दुग्धाभिषेक केला. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या वेळी गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी अभियानाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे गोमंतकाचे आराध्य दैवत आहे आणि यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज वर्ष १६६७ आणि १६६८ असे दोनदा गोमंतकात आले. वर्ष १६६८ मध्ये त्यांनी गोवा पोर्तुगिजांच्या अत्याचारी राजवटीतून मुक्त करण्यासाठी ३०० सैनिक नेमले होते. फितुरीमुळे हा लढा पुढे ढकलण्यात आला आणि दुर्दैवाने आम्हाला १९ डिसेंबर १९६१ पर्यंत गोवा मुक्त होण्यासाठी थांबावे लागले.’’
डिचोली येथेही नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्ध-जलाभिषेक करण्यात आला. यापुढे हे अभियान डिचोलीनंतर म्हापसा, पणजी, कोरगाव, पेडणे, वाळपई, आमोणा, नावेली, सांखळी आदी अनेक ठिकाणी राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
म्हापसा शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पोलीस संरक्षण
करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर म्हापसा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी पोलीस संरक्षण ठेवण्यात आले आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि म्हापसा येथील पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.