सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्याला अटक आणि सुटका
मडगाव (गोवा) रेल्वे पोलिसांनी १६ ऑगस्ट या दिवशी टाकली होती धाड
सावंतवाडी – रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी येथील तिकीट आरक्षण करणारा दलाल (तिकीट बुकींग एजंट) अक्षय नरेंद्र देशपांडे (रहाणार गोठण, सावंतवाडी) याच्या येथील कार्यालयावर गोवा येथील रेल्वे पोलिसांनी १६ ऑगस्ट या दिवशी धाड टाकून त्याला अटक केली. देशपांडे याला पोलिसांनी १७ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याची २५ सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने मडगाव (गोवा) येथून आलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली. त्यानंतर विविध प्रकारे चौकशी केल्यानंतर देशपांडे तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी काही तिकिटे आणि देशपांडे यांना कह्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली होती.