साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची रौप्य महोत्सवी वाटचाल !
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. राष्ट्र आणि धर्म हिताच्या ज्या महन्मंगल उद्देशाने ते चालू झाले, त्याचे सिंहावलोकन करण्याची ही वेळ आहे आणि अर्थातच त्याच्या उद्देशाचे सार्थक झाल्याचे लक्षात येत आहे. हिंदूंवरील आक्रमणे आणि हिंदु धर्मावरील आघात थांबण्याचे नाव न घेता प्रतिदिन वाढतच असल्याची स्थिती आज समाजात दिसत आहे. असे असले, तरी त्या विरोधात आता हिंदू जागृत आणि संघटित होऊ लागले आहेत, असेही चित्र आता निर्माण आहे. गेली काही वर्षे हिंदूंमध्ये होत असणार्या या वैचारिक परिवर्तनाच्या कार्याची पायाभरणी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने २५ वर्षांपूर्वी झाली, असे निश्चितपणे म्हणू शकतो. चित्रपट विश्वाशी संलग्न विषयाची साप्ताहिके आणि मासिके वाचण्याची सवय असणार्या त्या काळात केवळ राष्ट्र आणि धर्म हितार्थ निघालेल्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वेगळेपण धर्माभिमानी आणि देशभक्त जनतेच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. आज जागरूक मराठी हिंदुत्वनिष्ठ जनतेमध्ये हिंदुत्वाच्या विचारांचा परिपोष झाला असून त्याचा पाया त्या काळी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने घातला. निःस्पृह वृत्तीचे साधक त्यांची साधना म्हणून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचकांच्या हातात सुपुर्द करून जात, तेव्हा ‘हेच राष्ट्र-धर्मासाठी काहीतरी करू शकतात’, असे हिंदुत्वनिष्ठ वाचकांना वाटत असे अन् ते आता सार्थ ठरत आहे !
‘पेड न्यूज’ आणि ‘बे्रकिंग न्यूज’च्या आजच्या काळात अत्यंत संयत आणि तरीही अतिशय वस्तूनिष्ठ पत्रकारिता करत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने केवळ राष्ट्र आणि धर्म यांविषयक सूत्रांना प्राधान्य दिले. सध्याच्या विज्ञापनांच्या युगात आर्थिक हानी सोसूनही गुटखा, मद्य यांसारखी समाजविघातक विज्ञापने न छापण्याचे धोरण कायम ठेवून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने गेली २५ वर्षे तत्त्वनिष्ठता सांभाळली आहे.
व्यावसायिक अनुभव नसतांना, आर्थिक पाठबळ नसतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची मशाल गेली २५ वर्षे अखंड तेवत रहाणे, हा निवळ चमत्कार आहे. ‘संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा यांमुळेच हे शक्य आहे’, यावर आमची दृढ श्रद्धा आहे. ही एकच गोष्ट ‘सनातन प्रभात’चे वेगळेपण लक्षात येण्यासाठी पुरेशी आहे.
१. अध्यात्मशास्त्र समजावून सांगणारे !
मनुष्यजन्माचा उद्देश, व्यक्तीच्या व्यष्टी जीवनात, तसेच आदर्श समाज आणि राष्ट्ररचनेसाठी आवश्यक असणारे साधनेचे महत्त्व; काळानुसार आवश्यक साधना कोणती आणि ती कशी करावी ? आदींविषयक सातत्याने दिशादर्शन साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने केले. मन, बुद्धी आणि विज्ञान या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ म्हणजे आध्यात्मिक जगाची ओळख करून देणारे हे एकमेवाद्वितीय साप्ताहिक आहे. बुद्धीवाद्यांसाठी विज्ञाननिष्ठ प्रयोगांच्या आधारे सात्त्विक गोष्टींचे महत्त्व पटवून देऊन आणि ‘जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करावे ?’, हे सांगून आदर्श समाजरचनेचा उद्घोष करणारे हे एकमेव नियतकालिक आहे.
२. धर्मशिक्षणाचे दुसरे नाव…!
‘धर्मशिक्षणाचे दुसरे नाव म्हणजे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आहे’, असे म्हटले, तरी अतिशयोक्ती होणार नाही. हिंदूंना त्यांच्या देवता, धर्म, सण, व्रते, परंपरा, संस्कृती, धार्मिक विधी, संस्कार आदींविषयीचे धर्म आणि अध्यात्मशास्त्र सांगून त्यांना धर्मशिक्षित करणारे, हे एक विरळा साप्ताहिक आहे. धर्मशास्त्र समजल्याने धर्माभिमान जागृत झालेले साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक देवतांचे विडंबन रोखण्यासारख्या धर्मजागृतीपर कृती करण्यास उद्युक्त झाले आणि नकळतपणे राष्ट्र-धर्म कार्यासाठी क्रियाशील झाले !
३. कृतीशील वाचकांची मांदियाळी !
सण-व्रते धर्मशास्त्रानुसार साजरे करू लागणारे, टिळा लावण्यासारख्या कृतींना आरंभ करणारे, धर्मानुसार वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्राधान्य देणारे, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये; म्हणून काळजी घेणारे, चिनी वस्तूंची खरेदी टाळणारे अशा राष्ट्र-धर्म कार्यात आपापल्या परीने सहभागी होणार्या वाचकांची मांदियाळीच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने निर्माण केली.
४. वैशिष्ट्यपूर्ण सदरे !
लहान मुलांसाठी बोधपर गोष्टी, आध्यात्मिक शब्दकोडे, संतांविषयीचे लिखाण, सूक्ष्मातील प्रयोग, ‘फलक प्रसिद्धी’ अशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण सदरे या साप्ताहिकात वेळोवेळी देण्यात आली आणि येत आहेत. ‘फलक प्रसिद्धी’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध होणार्या चौकटीच्या साहाय्याने गावोगावी प्रबोधनपर फलक लागून व्यापक स्तरावर राष्ट्र-धर्म यांविषयी जनप्रबोधन होते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य म्हणजे त्याने एकूणच लिखाणातून ‘सध्या कलियुगांतर्गत कलियुगातील धर्म विरुद्ध अधर्माचा लढा हा सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर चालू असून त्यात आपल्याला नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहून आपले धर्मकर्तव्य (साधना) करायचे आहे’, हे २५ वर्षांपूर्वीपासून जनतेच्या मनावर बिंबवण्यास आरंभ केला अन् वैचारिक परिवर्तनाचे व्रत घेऊन स्वतःही त्यातील एक शिलेदार बनून ते लढत राहिले !
५. विरोधकांना चपराक !
एका ध्येयनिष्ठेने वाटचाल करणार्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाढत्या प्रसिद्धीच्या झोतात अनेक अडचणी आणि अडथळेही आले. राष्ट्र-धर्म तेजाच्या मशालीची धग ज्यांना सोसवली नाही, त्यांनी याला विरोध चालू केला. सत्यान्वेषी आणि सडेतोड लिखाण हे वैशिष्ट्य असणार्या ‘सनातन प्रभात’ला काही समाजकंटकांनी विरोध केला. काहींना वाटले याला विदेशातून निधी येतो, तर काहींनी त्याला जातीयवादी म्हणून त्याची हेटाळणी केली, कुणी बंदीची भीती दाखवली, तर कुणी जाळण्याचा प्रयत्न केला; परंतु ‘सनातन प्रभात’ने त्याचे राष्ट्र आणि धर्म निष्ठ रहाण्याचे ब्रीद कायम ठेवले अन् विरोधकांनाही अतिशय संयतपणे; परंतु परखडपणे उत्तरे दिली. ‘सनातन प्रभात’ची लेखणी अनेक अडचणींतून तावून सुलाखून निघाली; कारण ईश्वरी अधिष्ठान, प्रखर राष्ट्राभिमान, व्यापक मानवहिताचा उदात्त हेतू अन् आंतर्बाह्य पारदर्शकता हेच तिच्या दौतीतील घटक आहेत !
६. पूर्वीची स्थिती !
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधून आरंभीच्या काळात भेसळ करणारे, वजन काट्यांत फसवणारे आदी समाजद्रोही घटकांविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला गेला. सनदशीर मार्गाने भ्रष्टाचार्यांच्या विरोधात तक्रार करण्यास प्रबोधन करण्यात आले. ‘राष्ट्र आणि धर्म हानी म्हणजे नेमके काय ? आणि ती कशी टाळावी ?’ याविषयी दिशादर्शन केले. मनोरंजनाची नियतकालिके वाचण्याची सवय असलेल्या समाजासाठी हे प्रबोधन नवीन होते; परंतु त्याच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना थेट भिडणारे होते. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, रस्त्यांवरील खड्डे आणि दिवे यांच्या समस्यांपासून ते राष्ट्रावरील संकटांपर्यंत अनेक विषय यात हाताळले जात आहेत.
७. वैचारिक क्रांतीचे माध्यम !
‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्यापूर्वी अनेक गोष्टी सर्वसामान्य समाजाला ज्ञातच नव्हत्या’, असे अभिप्राय वाचकांकडून आले. त्यांपैकी काही महत्त्वाच्या म्हणजे ‘काँग्रेस पक्षाने केलेली देशाची अनन्वित हानी’, ‘नेहरू सरकारची राष्ट्र-धर्म विरोधी धोरणे’ आणि त्यामुळे ‘राष्ट्र आणि हिंदू यांची कधीही भरून न निघणारी अपरिमित हानी’, ‘मेकॉले शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम’ आदी. निधर्मीवादामुळे झालेली लोकशाहीची विदारक स्थिती आणि ‘आदर्श राष्ट्ररचनेसाठी पितृशाहीचे आणि धर्मनिष्ठ राज्यव्यवस्थेचे महत्त्व’ याचा अभ्यास या निमित्ताने समाजासमोर सर्वप्रथम मांडला गेला. या सर्व विषयांची मुद्देसूद आणि स्पष्ट, तसेच उदारहरणांसहित केलेली मांडणी समाजात एक वैचारिक घुसळण आरंभ होण्यास कारणीभूत ठरली.
८. हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणे !
राष्ट्र-धर्म यांवरील जनजागृती करण्यात सर्व नियतकालिकांमध्ये ‘सनातन प्रभात’चा हात कुणी धरू शकणार नाही. सर्व प्रकारच्या ‘जिहादां’ना सर्वप्रथम वाचा फोडणारे हे साप्ताहिक ‘हिंदुत्वाचे रक्षक’ आहे. आज सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे मोर्चे निघत आहेत; परंतु अडीच दशकांपूर्वी ‘हिंदु’ शब्द उच्चारणेही जातीयवादी समजले जात असतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंवरील आघातांविषयी आवाज उठवण्यास सर्वप्रथम आरंभ केला. गोवंशप्रेमी, धर्मांतरे रोखणारे किंवा लव्ह जिहाद उघडे पाडणारे, सार्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे व्यासपीठ त्यांचे वाटू लागले. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध सांप्रदायिक यांच्यामध्ये एक समत्वाचा धागा निर्माण करण्यास ‘सनातन प्रभात’च्या प्रयत्नांना आता यश येतांना दिसत आहे. कीर्तनकार, मठप्रमुख, व्याख्याते आदींनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होणारी राष्ट्र-धर्म विषयक वृत्ते, तसेच ‘नमस्कार कसा करावा ?’, ‘वाढदिवस तिथीनुसार का साजरा करावा ?’ आदी धर्माचरणविषयक लेख यांच्या आधारे समाजाला राष्ट्र-धर्माविषयी सांगण्यास आरंभ केला.
९. वैश्विक हिंदु राष्ट्राचे उद्गाते होवो !
‘केसरी’ हे वृत्तपत्र ‘असंतोषा’चे जनक बनले, तर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ ‘हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विचारां’चे जनक बनले आहे ! ‘हिंदु’ शब्दही उच्चारणे कठीण होते, अशा काळात ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीचे उदात्त ध्येय उराशी बाळगून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ कार्यरत राहिले. गावोगावच्या हिंदूंना संघटीत होण्यासाठी प्रेरणा देत राहिले. हिंदुत्वनिष्ठांच्या मनातील सात्त्विक संतापाला वाचा फोडत राहिले आणि त्यांची न्याय्य बाजू हिरिरीने मांडत राहिले ! आज कालौघात चोहोबाजूंनी हिंदु राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आहे. हा आवाज उद्या बुलंद होणारच आहे; परंतु साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य म्हणजे ते हिंदूंच्या मनावर हे रुजवत आहे की, केवळ ‘राजकीय’ स्वरूपाचे नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरील आदर्श असे रामराज्यसदृश हिंदु राष्ट्र हिंदूंना अपेक्षित आहे.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची उद्देशपूर्ती भविष्यकाळात होईलच; परंतु त्याहीपुढे जाऊन त्याला ‘वैश्विक हिंदु (आर्य) राष्ट्र’ बनवण्याच्या विशाल ध्येयाने आगामी काळात घोडदौड करत रहाता येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.