हिंदू जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही शक्ती हिंदूंच्या परंपरांशी खेळू शकणार नाही ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, स्वस्तिक पीठाधीश्वर, मध्यप्रदेश
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘पशूप्रेम केवळ हिंदू यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही ?’
मुंबई – उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (पी.एफ्.ए.)चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्यांची हत्या केली जाते. प्रतिदिन सहस्रो गायींची हत्या होत असते. जैन समाजाच्या शोभायात्रांत ‘इंद्र-इंद्राणी’च्या भूमिकेत असलेले घोडे आणि हत्ती यांवर सवारी केली जाते. तेव्हा त्याला विरोध केला जात नाही. भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये हत्तीवर सवारी या परंपरेविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि भविष्यातही ही शोभायात्रा परंपरेनुसारच काढली जाईल. हिंदु जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही शक्ती हिंदूंच्या परंपरांशी खेळ करू शकणार नाही, असे स्पष्ट मार्गदर्शन उज्जैन येथील ‘स्वस्तिक पिठा’चे पीठाधीश्वर परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पशूप्रेम केवळ हिंदु यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते मार्गदर्शन करत होते.
प्रतिदिन गायीची हत्या होत असतांना कथित पशूप्रेमी संघटना कुठे असतात ? – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्मातच सण-उत्सवांत पशूंची पूजा होते, तर अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांत पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. हिंदूंच्या सण-उत्सवांत मनुष्य आणि पशू यांमध्ये समन्वय साधला जातो अन् एकमेकांत प्रेम निर्माण केले जाते; मात्र यावरही आक्षेप घेतला जातो. ‘हिंदु धर्मातील सण-उत्सवांत प्राण्यांशी क्रूरतेचा व्यवहार केला जातो’, असे खोटे चित्र निर्माण केले जाते. हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा यांना लक्ष्य केले जाते. ‘पेटा’ (PETA), ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (पी.एफ्.ए.) या संस्था केवळ कुत्रा, मांजरी, घोडा यांच्या रक्षणासाठी काम करतांना दिसतात; मात्र प्रतिदिन गायींची हत्या केली जाते, त्या वेळी या संस्था धावून येत नाहीत. तेव्हा केवळ गोरक्षक धावून येतात. अशा संस्थांच्या पशूच्या व्याख्येत गाय बसत नाही का ? हिंदु धर्मात जे पूजनीय प्राणी आहेत, त्यांच्यासाठी हे काही करणार नाहीत, हे यांच्या षड्यंत्राद्वारे स्पष्ट होत आहे.
पशूंविषयीचे जुने कायदे रहित करून भारतीय संस्कृतीवर आधारित नवीन कायदे सरकारने करावेत !
ज्याप्रमाणे जुनी दंडसंहिता सरकारने रहित करून ‘भारतीय न्याय संहिता’ आणली आहे, त्याप्रमाणे पाश्चात्त्य विचारधारेने प्रेरित असलेले पशूंविषयीचे वर्ष १९६० पासून चालत आलेले जुने कायदे रहित करून भारतीय संस्कृतीने विचारधारेने प्रेरित असलेले नवीन कायदे सरकारने आणले पाहिजेत, असेही श्री. नागेश जोशी म्हणाले.
हिंदु संस्कृती, परंपरा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराजहिंदूंच्या सहिष्णुतेचा, उदारतेचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांवर कुणी आक्षेप घेत असेल, तर हिंदूंनी एकजुटीने त्याला विरोध केला पाहिजे. तसेच हिंदु संस्कृती, परंपरा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. |