सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भावभेटीत अनुभवलेले भावमोती !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याशी सर्व धर्मप्रचारक संत आणि आश्रमात निवासाला असणारे संत यांची भावभेट
‘एकदा धर्मप्रचारक संत आणि रामनाथी आश्रमात निवासाला असणारे सर्व संत यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याशी भेट होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले म्हणाले, ‘‘आजचा सत्संग वेगळाच जाणवत आहे. सर्व आनंदी आहेत. आपण आता डोळे मिटूया आणि ‘काय वेगळे जाणवते ?’, ते अनुभवून सांगूया.’’
२. सर्व संतांना पुष्कळ आनंद होणे
आम्ही सर्वांनी डोळे मिटले आणि नंतर काय जाणवले, ते मी सांगितले. ‘आज धर्मप्रचारक संतांची भावभेट आहे.’ नंतर आम्हाला समजले की, ‘आज भेटीत रामनाथी आश्रमात निवासाला असणारे सर्व संतही असणार आहेत.’ तेव्हा आनंदात वाढ झाली. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता आश्रमात आल्यावर रामनाथी आश्रमात निवासाला असणारे सर्व संत उपस्थित होते. त्यांना पाहून आणि भेटून आनंदात अधिक वाढ झाली.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ‘डोळे मिटूया आणि काय वेगळे जाणवते ?’, ते अनुभवण्यास सांगितल्यावर परमोच्च आनंद अनुभवता येऊन भावाश्रू येणे
त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आल्या. तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शुभागमन झाले. त्यांनी डोळे बंद करायला सांगितल्यावर आनंदाचा परमोच्च क्षण गाठल्याचे जाणवले आणि डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’ सर्वच संतांनी आनंद झाल्याचे सांगितले. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘अन्य वेळी जेव्हा मी साधकांना भेटतो, तेव्हा साधक सत्संगाच्या शेवटी आनंद अनुभवतात. आज सत्संगाचा आरंभच आनंदाने झाला आहे.’’
४. नवीन प्रक्रियेतून साधकनिर्मितीचे महत्त्व शिकायला मिळणे
त्यानंतर ते म्हणाले, ‘‘कुणाला काही सांगायचे आहे का ?’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘आतापर्यंत माझा ओढा कार्याकडे होता. ‘धर्मसभा, शिबिरे आणि धर्मशिक्षणवर्ग कसे वाढतील ?’, याकडे लक्ष रहायचे. त्यामुळे साधक निर्मितीकडे दुर्लक्ष होत होते. या शिबिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले, ‘‘आता साधकांची साधनावृद्धी आणि नवीन साधक निर्मिती हे ध्येय घेऊया.’’ त्या दिशेनेच त्यांनी वर्षभराचे नियोजन करवून घेतले. या नवीन प्रक्रियेतून साधक निर्मितीचे महत्त्व शिकायला मिळाले.’’
५. प्रसारात विविध ठिकाणी गेल्यावर विविध प्रकारचे त्रास होतांना त्यावर आश्रमातील संत अनेक घंटे नामजपादी उपाय करत असल्याबद्दल सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
नंतर मी सांगितले, ‘‘आम्ही संत प्रसारात विविध ठिकाणी जातो. तेव्हा पाऊस येणे, उन्हाचा त्रास आणि साधकांच्या अडचणी, असे विविध अडथळे येतात. काही वेळा माझी प्रकृती ठीक नसते. अशा वेळी आश्रमातील संत आमच्यासाठी अनेक घंटे नामजपादी उपाय करतात. त्यामुळे आज उपस्थित असणार्या आणि आश्रमात निवासाला असणार्या सर्व संतांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.’’
या वेळी शिबिराचा आरंभ होण्यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या होत्या, ‘‘या वेळच्या दोन्ही शिबिरांतून साधकांनी ताण न घेता आनंद अनुभवायचा आहे.’’ त्याप्रमाणे साधकांनी आनंद अनुभवला. आरंभ आणि शेवट आनंदाचा करून देणारी ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची कृपा अनुभवता आली.’
– (पू.) अशोक पात्रीकर, अमरावती
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |