होमिओपॅथी चिकित्सापद्धतीची ७ मूलभूत तत्त्वे !
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !
‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
११ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘होमिओपॅथी म्हणजे काय ? आणि होमिओपॅथीचे जनक डॉ. हानेमान’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/709910.html
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
३. होमिओपॅथी चिकित्सापद्धतीची मूलभूत तत्त्वे (Cardinal Principles of Homeopathy)
प्रत्येक शास्त्र काही मूलभूत तत्त्वांवर आधारित असते. होमिओपॅथीही पुढील ७ मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.
३ अ. साम्यतेचे तत्त्व (Law of Similia) : होमिओपॅथीमध्ये देण्यात येणारी औषधे वनस्पती, प्राणी, खनिजे यांसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून बनलेली असतात. आधी ही औषधे निरोगी व्यक्तींना देऊन त्या औषधांमध्ये ‘निरोगी व्यक्तींमध्ये कोणती विशिष्ट लक्षणे निर्माण करण्याची क्षमता आहे ?’, याची बारकाईने नोंद केली जाते. निरोगी व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या या लक्षणांना त्या ‘औषधाची लक्षणे’ किंवा ‘औषधाचे गुणधर्म’, असे संबोधले जाते. जेव्हा एखाद्या रुग्णामध्ये निर्माण झालेली लक्षणे आणि एखाद्या औषधाची लक्षणे यांमध्ये साम्य दिसून येते, तेव्हा ते औषध त्या रुग्णाला देण्यात येते आणि ते औषध त्या रुग्णातील आजार बरा करते.
३ आ. साधेपणाचे तत्त्व (Law of Simplex) : होमिओपॅथीच्या या मूलभूत तत्त्वानुसार रुग्णामध्ये विविध लक्षणे दिसत असली, तरी रुग्णाला बरे करण्यासाठी एका वेळी एकच औषध द्यायचे असते. होमिओपॅथीमध्ये देण्यात येत असलेल्या औषधांना आधी निरोगी व्यक्तीवर एका वेळी एकच औषध देऊन औषधामुळे त्या व्यक्तीमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात याची नोंद करून ती सिद्ध केलेली असतात. त्यामुळे तशी लक्षणे असणारा आजार झाल्यावर ते एकच औषध देणे अपेक्षित आणि पुरेसे असते.
३ इ. किमानतेचे तत्त्व (Law of Minimum) : या तत्त्वानुसार शरिराची स्वतःला बरे करण्याची प्रक्रिया कार्यरत करण्यासाठी आवश्यक औषधाची किमान मात्रा द्यायची असते. परिणाम दिसून येण्यासाठी आवश्यक होमिओपॅथी औषधाची किमान मात्रा ही कोणत्याही आजारावर सर्वाधिक परिणामकारक मात्रा (dose) असते; कारण होमिओपॅथी औषध बिघडलेल्या अवयवांवर कार्य करत नसते, तर ते व्यक्तीच्या निष्प्रभ झालेल्या चैतन्य शक्तीवर (Vital Force वर) कार्य करत असते. चैतन्य शक्ती पूर्ववत् कार्यक्षम झाली की, ती स्वतःच त्या व्यक्तीमध्ये विविध स्तरांवर झालेले बिघाड दुरुस्त करते. चैतन्य शक्ती गतीमान (dynamic) आहे आणि दिलेले होमिओपॅथीचे औषधही गतीमान असते. त्यामुळे होमिओपॅथी चिकित्सापद्धतीमध्ये औषधाची त्या रुग्णात सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक किमान मात्रा देणे अपेक्षित आहे.
३ ई. औषधाच्या सिद्धीकरणाचे तत्त्व (Doctrine of Drug Proving) : होमिओपॅथीमधील सर्व औषधांची चाचणी (test) निरोगी व्यक्तींवर केली जाते. ही चाचणी (called a proving) कडक नियमांचे पालन करत केली जाते. निरोगी व्यक्तींना (called provers) औषध त्यांच्यात लक्षणे निर्माण होईपर्यंत प्रतिदिन दिले जाते. जेव्हा चाचणीत सहभागी व्यक्तींमध्ये नवीन लक्षणे निर्माण होणे बंद होते, तेव्हा औषध देणे बंद केले जाते. औषध घेणे बंद केल्यानंतर एकतर लक्षणे आपोआप बंद होतात किंवा त्यांना लक्षणांतून मुक्त करण्यासाठी त्या औषधावर ‘हारक परिणाम’ करणारे औषध (antidote) दिले जाते. त्यानंतर चाचणीत सहभागी प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या लक्षणांची माहिती घेऊन तिची एकत्रित तपशीलवार नोंद केली जाते. या लक्षणांची नोंद ‘औषधाची लक्षणे’ अशी केली जाते, ‘आजाराची लक्षणे’ अशी नाही. अशा प्रत्येक चाचणीतून काही सामायिक लक्षणे दिसून येतात, जी त्या औषधाच्या गुणधर्मांचा गाभा असतात आणि त्या औषधाच्या अभ्यासात सर्वाधिक योगदान देतात. काही व्यक्तींमध्ये वेगळी आणि क्लिष्ट लक्षणे दिसून येतात. त्यांचीही नोंद ठेवली जाते. जेव्हा या औषधाच्या लक्षणांशी, म्हणजेच त्या औषधाच्या गुणधर्मांशी साम्य असलेली लक्षणे असलेला आजार एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा तिला हे औषध देता येते. जर एखादा आजार किंवा व्याधी यांची लक्षणे सर्वसाधारणतः त्या औषधामुळे निर्माण होणार्या लक्षणांशी मिळती-जुळती असतील, तर त्या औषधाने व्यक्तीचा आजार पूर्ण बरा होतो.
होमिओपॅथीचे जनक डॉ. हानेमान यांनी आपल्या हयातीत अनुमाने १०० औषधांचे सिद्धीकरण केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी हे कार्य चालू ठेवले आणि आता४ सहस्रांहून अधिक होमिओपॅथी औषधांचे सिद्धीकरण पूर्ण झालेले आहे अन् ती प्रक्रिया निरंतर चालू आहे.
३ उ. जुनाट (दीर्घकालीन) आजारांचा सिद्धांत (Theory of Chronic Diseases) : डॉ. हानेमान यांनी साम्यतेच्या तत्त्वानुसार औषधे देण्यास आरंभ केल्यानंतर बर्याच रुग्णांचे आजार लगेच आणि पूर्ण बरे झाले; परंतु काही जणांविषयी ‘आजार काही कालावधीनंतर पुन्हा पुन्हा डोके वर काढतात’, असे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी ‘हे आजार छोट्या कालावधीचे (acute) नसून ते दीर्घकालीन किंवा जुनाट (chronic) आहेत’, हे जाणून ‘अशा जुनाट आजारांसाठी अधिक सखोल परिणाम करणारे व्यक्ती-विशिष्ट (constitutional) असे औषध देणे आवश्यक आहे’, या निष्कर्षाप्रत ते आले. व्यक्ती-विशिष्ट औषध दिल्यास जुनाट आजारांसाठी होमिओपॅथी औषध अत्यंत गुणकारी आहे.
३ ऊ. औषधांची गुणप्रभावन पद्धती (Doctrine of Drug Dynamisation) : होमिओपॅथीमधील औषधे नैसर्गिक वस्तूंपासून बनलेली असतात; परंतु ती ज्या नैसर्गिक स्थितीत आढळतात, त्याच स्थितीत त्यांचा औषध म्हणून उपयोग होत नाही. मूळ नैसर्गिक वस्तूवर गुणप्रभावन प्रक्रिया (dynamisation or potentisation) केल्यानंतर त्यात मूळ वस्तूचा स्थूल (crude) भाग फारच नगण्य प्रमाणात रहातो. त्यानंतर ते औषध सिद्धीकरणासाठी एखाद्या निरोगी व्यक्तीला दिले, तर तिच्यामध्ये अधिक सूक्ष्म (finer) लक्षणे दिसून येतात. रेतीपासून ‘सिलिशिया’, हे एक महत्त्वपूर्ण औषध बनवले जाते; परंतु जर कुणी मूठभर रेती ग्रहण केली, तर त्याचा ‘सिलिशिया’ प्रमाणे औषधी परिणाम दिसून येत नाही. रेतीमधील सुप्त औषधी गुणधर्मांचे प्रकटीकरण होण्यासाठी गुणप्रभावन पद्धतीचा उपयोग केला जातो.
३ ए. चैतन्य शक्तीचा सिद्धांत (Theory of Vital Force) : होमिओपॅथीनुसार व्यक्तीच्या शरिराचे कार्य प्रामुख्याने तिच्यामधील चैतन्य शक्ती (Vital Force) चालवते. या शक्तीवाचून व्यक्ती मृतवत् होते. या निरामय चैतन्य शक्तीवर आजार निर्माण करणार्या घटकांचा परिणाम होऊन ती शक्ती निष्प्रभ होते. त्यामुळे शरिराचे विविध अवयव आणि संस्था यांचे कार्य कोलमडते आणि आजाराची स्थिती निर्माण होते. होमिओपॅथीमधील हा एक महत्त्वाचा मूलभूत सिद्धांत असल्यामुळे आजाराची निर्मिती आणि त्याच्या उपचारामध्येही या सिद्धांतानुसार विचार केला जातो. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये बिघडलेल्या अवयवांना पूर्ववत् करण्यासाठी नाही, तर चैतन्य शक्ती पूर्ववत् करण्यासाठी औषध दिले जाते. पूर्ववत् झालेली चैतन्य शक्तीच आजार निर्माण करणार्या घटकांचा प्रभाव नष्ट करून शरिराला पुन्हा मूळ निरोगी स्थितीत घेऊन येते.’
तज्ञ वैद्यकीय सल्ला किंवा बाजारात औषधे उपलब्ध नसतांनाही स्वतःवर किंवा इतरांवर होमिओपॅथी चिकित्सापद्धतीनुसार किमान तरी उपचार करता यावे, या हेतूने या ग्रंथात लिखाण करण्यात आले आहे.
आगामी ‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत. |