‘सनातन प्रभात’मधील लिखाण म्हणजे आम्ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो ! – अधिवक्ता दत्तात्रय सणस
सातारा येथे ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चा २५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
सातारा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष १९९८ पासून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. आज ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असून आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. हिंदुत्वासाठी अहोरात्र झटणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक असून समस्त हिंदूंच्या हक्काचे व्यासपीठ आहे. सनातन प्रभातमधील लिखाण म्हणजे आम्ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो, असे गौरोवोद़्गार अखिल भारतीय हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी काढले.
येथील श्रीनटराज मंदिर परिसरातील सभागृहात ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वाचकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे उपस्थित होते.
अधिवक्ता सणस पुढे म्हणाले की, ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणारे दैवी चैतन्य प्रत्यक्ष जाणवते. स्वा. सावरकर यांनी मांडलेली अखंड हिंदु राष्ट्राची संकल्पना ‘सनातन प्रभात’ नेटाने पुढे नेत आहे. गुरुदेव डॉ. आठवले यांनी भारतामध्ये लावलेल्या सनातन प्रभातच्या रोपट्याचा देश-विदेशांत प्रसार होऊन त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्ररक्षणासमवेतच धर्मशिक्षण आणि साधनेचे महत्त्व समाजमनावर बिंबवले जाते. साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक असावे ! नि:स्वार्थ वृत्तीने सेवा करणारे साधक, ही सनातन प्रभातची मोठी शक्ती आहे.
हिंदूंवरील आघातांविषयी परखड सत्य मांडणारे एकमेव नियतकालिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. रूपा महाडिक म्हणाल्या की, हिंदु धर्मावर आघात होत असतांना सध्याची ‘सेक्युलर’ वृत्तपत्रे केवळ बघ्याची भूमिका घेतांना आपल्याला दिसतात; मात्र ‘सनातन प्रभात’ हे देश-विदेशांतील हिंदूंवर होणार्या आघातांविषयी परखड सत्य मांडणारे एकमेव नियतकालिक आहे. सनातन प्रभातने कायमच प्रखर हिंदुत्वाच्या विचारांशी बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच आम्हा हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन प्रभात’चा मोठा आधार वाटतो.
श्री. राहुल कोल्हापुरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
वाचकांचे मनोगत
१. श्री. संभाजी कदम, सातारा – ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे साक्षात् भगवान श्रीविष्णूच आहेत. सनातन प्रभातमधील लिखाण म्हणजे श्रीविष्णूचाच संदेश आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घराघरात गेले पाहिजे. ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सण, उत्सव, व्रते साजरे करण्याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जाते. ‘सनातन प्रभात’मध्ये वाचकांना योग्य दृष्टीकोन दिला जातो.
२. श्री. मोहन शिंदे, कोरेगाव, सातारा – हिंदू जागृत होईल; मात्र धर्मशिक्षण देऊन धर्माविषयी हिंदूंना जागृत करण्याचे महान कार्य ‘सनातन प्रभात’ तळमळीने करत आहे. सनातन प्रभात केवळ वृत्तपत्र नसून हिंदूंना कृतीप्रवण बनवणारे नियतकालिक आहे. सनातन प्रभातमध्ये येणारी बातमी आपल्याला इतर कोणत्याही दैनिकात वाचायला मिळत नाही, हे सनातन प्रभातचे वैशिष्ट्य आहे.
३. श्री. प्रदीप साळवे, कोपर्डे, कराड – ‘सनातन प्रभात’मुळे साधनेतील अनमोल मार्गदर्शन मिळते. संसारात राहून साधना आणि संसारात राहून वैराग्य, हे सनातन प्रभातमुळेच शक्य होते. भाव, चैतन्य यांची अनुभूती मिळते. सनातन प्रभातमुळे संपूर्ण समाज क्रियाशील होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
याव्यतिरिक्त श्री. धनंजय शिंदे, श्री. विजय गाढवे, श्री. ओंकार डोंगरे आदी वाचकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ ! – राहुल कोल्हापुरे
मनोगत व्यक्त करतांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे म्हणाले की, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे ब्रीदवाक्य घेऊन सनातन प्रभात गेली २५ वर्षे अहोरात्र झटत आहे. ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज हा सनातन प्रभातचा गाभा आहे. हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारे सनातन प्रभात, हे एकमेव नियतकालिक आहे.