‘सनातन प्रभात’ लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य करते ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या प्रतिक्रिया
‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्याला माझ्याकडून पुष्कळ शुभेच्छा !
हे उत्तम असे साप्ताहिक आहे. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध विषयांवर उद्बोधक माहिती असते. मी एक सैन्याधिकारी आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने देशाची सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे देशाच्या नागरिकांसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, असे मला वाटते. तेव्हा जगभरात काय चालले आहे ? आणि एक सामान्य नागरिक देशाला पुढे नेण्यासाठी कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकतो ? या दृष्टीकोनातून विविध प्रकारची वृत्ते आणि विश्लेषणे या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध होतात. यासाठी मी त्यांचे कौतुक करतो. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ लोकांच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय हाताळते. त्या माध्यमातून ते लोकांचे उद्बोधन करण्याचे काम करत असते.
आता देशाची सुरक्षा हा केवळ सैन्य किंवा पोलीस यांचा विषय राहिला नाही, तर तो प्रत्येक देशभक्त नागरिकाचा विषय बनला आहे. आपण देशासाठी काय करू शकतो ? तसेच त्याला विविध पद्धतीने कसे सुरक्षित ठेवू शकतो ? ही भावना लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचे काम ‘सनातन प्रभात’ करत असते आणि त्याचे हे कार्य पुढेही चालू राहील. त्यामुळे देशभक्ती किंवा देशासाठी काही करायची भावना नागरिकांमध्ये निश्चित वाढेल. यासमवेतच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून जनजागृती हे अत्यंत महत्त्वाचे कार्यही होत राहील. ‘सनातन प्रभात’ सध्या मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित होते. पुढे ते अन्य भाषांमध्येही प्रकाशित होईल, याची मला खात्री आहे.’