मणीपूर हिंसाचारातील १७ प्रकरणांची चौकशी सीबीआय करणार

सीबीआयच्या ५३ अधिकार्‍यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) ५३ अधिकार्‍यांना नियुक्त केले आहे. यात २९ महिलांचाही समावेश आहे. इतक्या संख्येने महिला अधिकार्‍यांना चौकशीमध्ये सहभागी करून घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्वांना देशातील सीबीआयच्या विविध कार्यालयांतून एकत्र करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या चौकशीमध्ये मणीपूरमधील कोणत्याही अधिकार्‍याला सहभागी करण्यात आलेले नाही. सीबीआयवर पक्षपाताचा आरोप होऊ नये; म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. मणीपूर हिंसाचारातील १७ प्रकरणांची चौकशी सीबीआयकडून करण्यात येणार आहे. यांपैकी ८ प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मणीपूर हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.