नवीन असूनही तत्परतेने रुग्ण साधिकेसमवेत रुग्णालयात जाणारी आणि इतरांचा विचार प्रथम करणारी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील कु. नेहा डाके (वय १७ वर्षे) !
१. एका साधिकेची रक्तातील साखर अल्प होऊन ती बेशुद्ध पडणे आणि सकाळच्या वेळी त्या साधिकेसमवेत त्वरित रुग्णालयात जाण्यास दुसरी साधिका उपलब्ध नसणे : २१.७.२०२३ या दिवशी सकाळी ६.३० वाजता देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील एका वयस्कर साधिकेची रक्तातील साखर अल्प झाली. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. त्यांची वैद्यकीय तपासणी करायला मला बोलावले होते. मी त्या साधिकेला तपासून त्यांच्यावर प्रथमोपचार केले; परंतु तरीही त्या सर्वसामान्य स्थितीला येत नव्हत्या. त्यामुळे ‘त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करायला हवे’, असे माझ्या लक्षात आले. त्यासाठी त्यांच्या समवेत त्यांचे पती आणि कुणीतरी साधिका जाणे आवश्यक होते. हा प्रसंग सकाळी लवकर घडल्यामुळे रुग्णाईत साधिकेसमवेत पाठवण्याकरता अन्य साधिका उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे अडचण येत होती.
२. कु. नेहा हिने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्ण साधिकेला साहाय्य करणे : कु. नेहा डाके त्या रुग्ण साधिकेच्या बाजूच्या खोलीमध्ये रहाते. आपत्कालीन स्थिती असल्यामुळे आणि वेळही अल्प असल्यामुळे मी कु. नेहाला विचारले, “तू रुग्णाईत साधिकेसमवेत रुग्णालयात जाणार का ? त्या वेळी तिने एका क्षणाचाही विलंब न करता ‘हो’, असे सांगितले. ती नुकतीच उठली होती; परंतु तातडी लक्षात घेऊन ‘प्रातर्विधी व्हायचे आहेत’, असा विचारही तिने केला नाही. प्राप्त परिस्थितीत कसलाही विचार न करता ती रुग्णाईत साधिकेसमवेत रुग्णालयात गेली. पनवेल येथील रुग्णालय तिच्यासाठी नवीन होते, तसेच रुग्णाईत साधिकेची स्थिती पाहिल्यास ‘कुणीही घाबरेल’, असेच सर्व वातावरण होते. कु. नेहाच्या या कृतीतून ‘परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित साहाय्य करणे, वैयक्तिक अडचणींचा विचार न करणे, इतरांना साहाय्य करण्याची तळमळ, असे अनेक गुण मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
३. सनातनच्या आश्रमात प्रथम रहायला आलेली असतांना आणि कुणालाही ओळखत नसतांना कु. नेहाने रुग्णाईत साधिकेला साहाय्य करणे : प्रत्यक्षात कु. नेहा डाके ही आश्रमात पहिल्यांदाच रहायला आली आहे. ती सौ. मनीषा पिंपळे यांच्या बहिणीची मुलगी आहे. कु. नेहा हिला २ वर्षांपूर्वी साधना समजली. साधनेत नवीन असतांना आणि आश्रमातील कुणालाही ओळखत नसतांना तिने रुग्ण साधिकेसाठी केलेल्या या कृतीतून आम्हा सर्वांनाच शिकण्यासारखे आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने कु. नेहा हिच्यातील गुणांचे मला दर्शन झाले. ‘असे गुण आम्हा साधकांमध्येही येऊ देत, अशी गुरुदेवांच्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२७.७. २०२३)