नम्र, परिपूर्ण सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेलेे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) !
‘वर्ष २००५ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागले. एप्रिल ते जून २००६ या कालावधीत मला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली, तसेच वर्ष २०१९ पासून मी त्यांच्या समवेत विधीच्या संदर्भातील सेवा करत आहे.
श्रावण शुक्ल प्रतिपदा (१७.८.२०२३) या दिवशी अधिवक्ता रामदास केसरकर यांचा ७१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
अधिवक्ता रामदास केसरकर यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. सेवाकेंद्रात रहायला आल्यावर सुखासीन रहाणीमानाचा त्याग करून साधी रहाणी स्वीकारणे : अधिवक्ता केसरकाका ठाणे येथे अधिवक्ता म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांचे रहाणीमान सुखासीन होते; पण ते सनातनच्या सेवाकेंद्रात रहायला आल्यावर त्यांनी सुखासीन रहाणीमानाचा त्याग करून साधी राहणी स्वीकारली.
१ आ. काटकसरी : त्यांना सेवेसाठी जवळच्या ठिकाणी जायचे असल्यास ते पायी जात असत आणि दूर अंतरावर जायचे असल्यास सायकल वापरत असत.
१ इ. ते आश्रमातील लहान-मोठ्या सर्व साधकांशी नम्रतेने आणि आपुलकीने बोलतात.
१ ई. पत्नीकडे ‘साधक’ या भावाने पहाणे : कुडाळ सेवाकेंद्रात असतांना माझा पू. केसरकरकाकूंशीही (सनातनच्या १२१ व्या संत पू. (कै.) प्रमिला केसरकर यांच्याशीही) संपर्क यायचा. त्या वेळी काका पू. काकूंशी आदराने बोलायचे. तेव्हा ‘ते पत्नीकडे साधक म्हणून पहातात’, हे माझ्या लक्षात आले.
१ उ. ते प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात.
१ ऊ. त्यांच्या बोलण्यात नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव जाणवतो.
२. अधिवक्ता केसरकर यांच्या समवेत सेवा करतांना आलेल्या अनुभूती
२ अ. काकांकडून आनंदाच्या लहरी येत असल्याचे जाणवणे : मी काकांच्या समवेत संगणकावर टंकलेखन करण्याची सेवा करत असे. तेव्हा मला त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी येत असल्याचे जाणवत असे. त्या वेळी मला वाटायचे, ‘हे सर्व न्यायालयीन कामकाजाविषयी आहे, तरी आनंदाच्या लहरी कशा काय जाणवतात ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘काका भावपूर्ण सेवा करतात. त्यामुळे तसे जाणवते.’
२ आ. काका घेत असलेल्या सत्संगात चैतन्य आणि आनंद जाणवणे : काका कुडाळ येथे समाजातील व्यक्तींसाठी सत्संग घेत असत. मीसुद्धा त्या सत्संगाला जात असे. सत्संग संवादात्मक असायचा. मला त्या सत्संगात चैतन्य जाणवायचे आणि पुष्कळ आनंद मिळायचा. त्या वेळी ‘काकांच्या तळमळीमुळे सत्संग चैतन्यमय होतो’, असे मला जाणवलेे.
‘हे गुरुमाऊली, ‘आपण मला केसरकरकाकांसारख्या साधकांच्या समवेत सेवा करण्याची आणि शिकण्याची संधी दिलीत’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१३.८.२०२३)
‘निर्विचार’ हा नामजप चालू केल्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर यांना आलेल्या अनुभूती
१. ‘निर्विचार’ हा नामजप चालू केल्यावर मन निविर्र्चार स्थितीत रहाणे
‘१४.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नम:।’ असा नामजप करण्यासंदर्भात सांगितले होते. मी गुर्वाज्ञापालन म्हणून त्या दिवसापासून ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला. हा नामजप दिवसभरात अधिकाधिक केल्यानंतर ३ मासात ‘माझे मन निविर्र्चार स्थितीत राहू लागले’, असे मला जाणवले, तसेच वर्तमानात राहून सेवा करणे सुलभ झाल्याचे माझ्या लक्षात आले.
२. ‘एखाद्या वस्तूकडे पाहून काय वाटते ?’, हे प्रयोग करून अनुभवणे
त्यानंतर मी ‘एखाद्या वस्तूकडे पाहून काय वाटते ?’, असा प्रयोग केला असता ‘आनंददायी वस्तूकडे पाहून मला आनंद होत नाही, तसेच दुःखदायक वस्तूकडे पाहून दुःखही होत नाही’, अशी माझ्या मनाची स्थिती झाली असल्याचे माझ्या लक्षात आले.
३. ‘एखादा प्रसंग घडल्यावर काय वाटते ?’, हे प्रयोग करून अनुभवणे
या प्रयोगानंतर काही मासांनी देवाने मला विचार सुचवला, ‘एखादा प्रसंग घडल्यावर काय वाटते ?’, ते पहा.’ या संदर्भात प्रयोग केला असता ‘आनंददायी प्रसंग घडल्यावर मला आनंद होत नाही, तसेच दुःखदायक प्रसंग घडल्यावर दुःखही होत नाही’, अशी माझ्या मनाची स्थिती झाली असल्याचे माझ्या लक्षात आले.
४. श्री गुरुकृपेनेच त्यांच्या वचनाची अनुभूती घेता येणे
गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे ‘साधकांनी निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नम:।’ हे नामजप केल्यामुुळे त्यांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होईल’, या वचनाची मला श्रीगुरुकृपेने अनुभूती घेता आली, तसेच ‘गुरुदेवांनी ‘ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नम:।’ हा नामजप ‘गुरुकृपायोगानुसार साधनामार्ग’ यातील शेवटचा नामजप असल्याचे का सांगितले आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.’
– अधिवक्ता रामदास केसरकर (आताची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार, गोवा. (१.६.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |