लांजा येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा
लांजा – १४ ऑगस्ट या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने लांजा येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला.
१४ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत देशाचे २ तुकडे करून फाळणी करण्यात आली. ही फाळणी धर्माच्या आधारावर करण्यात आली होती. दुसर्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तेही खंडित स्वातंत्र्य मिळाले. याचे शल्य प्रत्येक भारतियाच्या मनामध्ये कायमच राहील. जोपर्यंत फाळणी झालेला भाग पुन्हा भारतात येत नाही, तोपर्यंत अखंड भारत संकल्प दिन आपण साजरा करायचा आहे. त्या निमित्ताने आपण शपथ घ्यायची आहे, असे आवाहन संकल्प पदयात्रेच्या समारोपाप्रसंगी डॉ. समीर घोरपडे यांनी केले.
विश्व हिंदु परिषदेच्या महिला विभागाच्या श्रीमती मराठे म्हणाल्या की, भारत पाकिस्तान फाळणी झाली, त्या वेळेस ६ लाख हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. हिंदूंची समृद्ध संस्कृती उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामुळे हिंदु धर्माची प्रचंड हानी झाली. ही झालेली हानी परत भरून काढता येणार नाही; पण देशाचे असेच तुकडे होत राहिले, तर मात्र प्रत्येकाच्या जीविताला धोका संभवतो. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी धर्मयोद्धा व्हायलाच पाहिजे.
श्रीराममंदिर लांजा येथे भारतमातेचे पूजन करून पदयात्रा चालू झाली. बसवेश्वर चौक, बाजारपेठ मार्गे साठवली तिठ्यातून केदारलिंग मंदिर येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेचे सूत्रसंचालन विश्व हिंदु परिषद लांजा प्रखंड मंत्री प्रियवंदाताई जेधे यांनी केले.
या पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्तपणे ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते. पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता. या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.