हिमाचल प्रदेशात हाहा:कार : आतापर्यंत ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी !
|
शिमला (हिमाचल प्रदेश) – गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. दोन्ही राज्यांत अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या ४ दिवसांत ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन निवारण दलाच्या अनेक तुकड्या शिमल्यासह पूर्ण राज्यात बचावकार्य करण्यात सज्ज आहेत. वायूसेनेचे हेलीकॉप्टर्सही या कार्यात साहाय्य करत आहेत. राज्यातील व्यास नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
राजधानी शिमल्यातच हाहा:कार !
शिमल्यातील समरहिल आणि कृष्णानगर भागांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून येथील अनेक घरे अन् झाडे कोसळतांनाचे भयावह व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. खेळण्यातील पत्त्यांसारख्या इमारती कोसळत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समरहिल क्षेत्रातील शिवमंदिरापाशी झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
संभाव्य भूस्खलनापासून बचाव करण्याच्या प्रयत्नांत राज्यातील नुरपूरमध्ये ४१५ लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. कांगडा येथेही अशाच प्रकारे युद्धस्तरावर प्रयत्न चालू आहेत. येथील लोकांच्या घरात पाणी घुसले आहे.
उत्तराखंड राज्यातही मोठ्या प्रमाणात भूस्खलन !
उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग येथे शेकडो श्रद्धाळू फसले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. मदमहेश्वर घाटातही अशा प्रकारे साहाय्य कार्य चालू आहे. राज्यातील जोशीमठ आणि पौडी येथेही झालेल्या भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली. पंजाबच्या गुरुदासपूर आणि रूपनगर येथील व्यास नदीला आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.