नवी मुंबईत भव्य तिरंगा दुचाकी फेरी !

सहस्रावधी राष्ट्रप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

नवी मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – नवी मुंबई भाजपच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या फेरीत सहस्रावधी राष्ट्र्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या वेळी गणेश नाईक म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान आहे. हा अभिमान वृद्धींगत होऊन मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासानुसार देश जेव्हा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल, त्या वेळी भारत जगाचे नेतृत्व करणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येकाने आपले घर, कार्यालय सर्वच ठिकाणी ध्वजसंहितेचे पालन करून सन्मानाने तिरंगा ध्वज फडकवावा. आपल्या सर्वांच्या मनामध्ये तिरंग्याविषयी सन्मान आणि अभिमान असावा. भविष्यकाळात भारत जगाला सुरक्षितता आणि निर्भयता प्रदान करेल.’’