रागाच्‍या भरात शिक्षकांवर आक्रमण करणारा अल्‍पवयीन विद्यार्थी अटकेत !

सध्‍याच्‍या पिढीमधील संयम नष्‍ट होत असल्‍याचे दर्शवणारे उदाहरण !

मीरा-भाईंदर (ठाणे) – येथे एका अल्‍पवयीन विद्यार्थ्‍याने त्‍याच्‍या शिक्षकावर चाकूने आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. पीडित शिक्षक राजू ठाकूर हे खासगी शिकवणीवर्ग चालवतात. तिथे आरोपी विद्यार्थी शिकण्‍यासाठी येत होता. काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी आरोपी विद्यार्थ्‍याला एका मुलीसमवेत बोलतांना पाहिले होते. त्‍यांनी मुलीसोबत न बोलण्‍यास आणि वेळेवर अभ्‍यास करण्‍यास विद्यार्थ्‍याला सांगितले. (इतकेही शिक्षकांनी विद्यार्थ्‍यांना सांगायचे नाही का ? शिक्षकांप्रती विद्यार्थ्‍यांच्‍या मनात आदर किंवा धाकच राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! – संपादक) याचा राग आल्‍याने त्‍याने चाकूने शिक्षकांच्‍या पाठीवर वार केले. हा प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये चित्रीत झाला आहे.

शिक्षकांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. पोलिसांनी घटनास्‍थळावरून गुन्‍ह्यात वापरलेला चाकू जप्‍त केला आहे. सध्‍या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे अन्‍वेषण करत आहेत.