‘एल्गार’ प्रकरणात ‘कबीर कला मंच’ संघटनेशी संबंधित पुण्यातील तिघांना अटक !
पुणे – कोरेगाव भीमा येथील लढाईस २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे येथील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी एल्गार परिषद झाली होती. या परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. एल्गार परिषद प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून ‘एन्.आय.ए.’ने ‘कबीर कला मंच’ या संघटनेशी संबंधित तिघांना अटक केली आहे. सागर गोरखे, रमेश गायचोर यांना ७ ऑगस्टला, तर ज्योती जगताप हिला ८ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तुषार दामगुडे यांनी यापूर्वी तक्रार दिली होती.
या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवीवर हिरा राव, वर्णन गोन्साल्विस, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली येथील जंगलात शस्त्र प्रशिक्षण !
गोरखे आणि गायचोर यांच्यावर वर्ष २०११ मध्ये ठाणे पोलिसांनी नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर काही मास दोघे पसार होते. वर्ष २०१३ मध्ये त्यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली होती. ए.टी.एस्.च्या अन्वेषणात त्यांनी गडचिरोली येथील जंगलात शस्त्र प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले होते. नक्षलवादी संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे यांच्या संपर्कात ते असल्याचा दावा अन्वेषण पथकातील अधिकार्यांकडून करण्यात आला आहे.