बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सिग्नल रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम’ कार्यान्वित होणार !
-
वाहतुकीचे नियम मोडणार्यांना ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना देणार !
-
नाशिक पोलिसांचा प्रयत्न !
नाशिक – नाशिक शहरात बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी ‘सिग्नल रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम’ बसवली आहे. ही यंत्रणा आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल. यात नियम तोडणार्या वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे ‘रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम’द्वारे संबंधित चालकांना ई-चलन (E Challan) दिले जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून या यंत्रणेचेे काम अंतिम टप्प्यात असून सर्व सिग्नलवर लवकरच ऑनलाईन दंड आकारणी चालू केली जाणार आहे.
शहरातील विविध भागांतील ४० जागांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याचे फुटेज थेट नियंत्रण कक्षात पहाता येते. सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनधारकांना ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडल्यास त्याविषयीच्या सूचना केल्या जाणार आहेत. याची चाचणीही घेण्यात आली आहे.